दुबई ट्रिप करून आम्ही परतलो आणि पुढच्या आठवडाभरात युद्धाची ठिणगी पडली. यात सुरक्षित आणि समृद्ध अशा दुबई वर हल्ला झाला या बातमीमुळे आम्ही सुखरूप घरी आलो ना?? असे जवळच्या सगळ्यांनीच विचारले. बातमी ऐकताच आपण खरोखरच सुखरूप आलो ही देवाची कृपा आहे हे जाणवले. भारत सरकारच्या आणि दुबई सरकारच्या यशस्वी प्रयत्नांमुळे तिथे असलेले सर्व पर्यटक सुरक्षित परतले हे जरी खरे असले तरी काही काळासाठी तरी बंद झालेली विमानसेवा, होत असलेले हल्ले हा सगळा शारीरिक आणि मानसिक ताण निदान आम्हाला सहन करावा लागला नाही हे निश्चित.
दुबई खूप आवडते ती बऱ्याच कारणांमुळे. तिथे कायदे आहेत, नियम आहेत पण ते आमलात आणण्यासाठी कोणीही दबाव आणत नाही, तिथे वावरताना पोलीस, सुरक्षा रक्षक दिसले नाहीत आणि तरीही सगळं काही शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असतं. तिथे नियमांचे कडक निर्बंध आहेत पण स्वयंशिस्तीचे पालन करण्याचे संस्कार आहेत हे जास्त भावले. इथे कोणीही नियम मोडत नाही कोणी लक्ष ठेवणारे नाही, चलन फाडणारे, दंड वसूल करणारे चौकाचौकात गर्दी करून उभे दिसत नाही. रस्त्यावर ओव्हरटेक करणं नाही, स्पीड लिमिट चे बोर्ड लावले आहेत ते फोलो करणं हे सगळं तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या वागण्यात बिंबले आहे. आपल्या आसपास सगळेच शिस्तीत वागणारे आहेत म्हणल्यावर आपोआपच बाकी आजुबाजूच्या लोकांना तसे वागावे लागते म्हणून असेल कदाचित. भारतीय संस्कृतीत स्वयंशिस्त कमी पडते हे निश्चित. तिथे गाडी चालवताना सुद्धा आपण आजूबाजूला असलेल्या सुंदर इमारती बघू शकतो हे इथले वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कारण गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी लागत नाही 😀. प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक समृद्धी यामुळे छान प्लॅन करून आखिवरेखिव असे सुंदर वसलेले शहर अशी साधी सोपी ओळख दुबई साठी पुरेशी आहे. हे सगळं करताना, विकासाच्या दिशेने वाटचाल करताना इथले राजकारणी एकमेकांना सहकार्य करतात. सात एमरिट्स आणि त्याचे सात प्रमुख एकत्रित निर्णय घेतात हा सुद्धा संस्कारांचा एक भाग आहे. अनावश्यक विषयावर राजकारणी चर्चा करत शक्ती, पैसा, वेळ यांचा व्यय करण्यात धन्यता मानली जात नाही. आर्थिक समृद्धी असल्याने कदाचित निर्णय घेणं शक्य झाले हे जरी खरे असले तरी नुसते पैसे असणं पुरेसं नाही. सात एमरिट्स नी एकत्र येऊन एक मत होणं ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. एका घरात सगळ्यांचे एकमत होणं ही आजकाल स्वप्नवतच गोष्ट असताना छोट्या छोट्या बंदरांना एकत्र करून आखिवरेखिव आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे ही सोपी गोष्ट नाही. इथे कोणताही कारखाना नाही, स्वतःचे असे प्रोडक्शन नाही जे काही आवश्यक आहे ते सगळेच बाहेरच्या देशातून मागवले जाते आणि तिथलेच पर्यटक त्या वस्तू दुबईत येऊन खरेदी करतात हे मजेशीर आहे. इथे सोन्याच्या खाणी नाहीत तरीही इथे गोल्ड सुक मार्केट आहे. खऱ्या अर्थाने भव्य असे सोन्याचे दागिने इथे बघायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. सोन्याचे दागिनेच नाही तर सोन्याचा मास्क, स्कार्फ, अंगभर असा हार असे सुंदर कलाकुसर असलेले दागिने, कपडे, पर्स दिसतात तेही शुद्ध सोन्याचे. इथे पैसा असेल तर तुम्ही मुबलक प्रमाणात खरेदी करू शकता फसवणूक होण्याची सुतराम शक्यता नाही. याचे कारण म्हणजे दर्जा (quality), शुद्धता उत्तम असणार, हा दुबईने दिलेला विश्वास. ही विश्वासार्हता सुद्धा या संस्कारांचा एक भाग आहे. कोणी कोणाला फसवत नाही, इथे चोरी होत नाही या गोष्टी अभिमानाने तिथे फिरताना तिथले गाईड सांगतात. प्रत्येक इमारतीचे खास असे वैशिष्ट्य आहे, प्रत्येक इमारत बघण्यासारखी आहे. रचनात्मक आणि कलात्मक बांधकाम एकसंधता हे सगळं अगदी मनाला आणि डोळ्यांना सुखावणारं आहे. इथे फिरताना सुरक्षित वाटतं स्थळ,काळ, वेळ याचं दडपण जाणवत नाही. रस्त्यावर फिरताना गर्दी नसली तरी एकटं फिरताना भिती वाटत नाही. या सगळ्यामुळेच कदाचित मूळ लोकांपेक्षा बाहेरुन आलेले लोक सुरक्षित फील करतात आणि इथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करत असतात अर्थात त्या संदर्भातील नियम वेगळे आहेत जे तुम्हाला जाणून घ्यावे लागतात. आपला नसला तरीही परका न वाटणारा देश म्हणून दुबई निश्चित आवडण्यासारखी आहे. सगळ्या जगात खाल्ले जाणारे पदार्थ इथे मिळतात हे अजून एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळे इथे जेवणाचे हाल होत नाही शुद्ध शाकाहारी, पुणेरी पदार्थांपासून अगदी उत्तम असे मांसाहारी पदार्थ इथे मिळतात.
थोडक्यात सात एमरिट्स एकत्र येऊन संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेण्याचे सामर्थ्य आपल्या समृद्ध आणि सुसंस्कृतपणा मुळे दुबईने सिद्ध केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हाच स्वयंशिस्तीचा पाठ आपल्या पुढच्या पिढीला मिळावा आणि आपला सुसंस्कृत भारत खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावा अशी अपेक्षा.

