सई गेल्या महिन्यात चोवीस वर्षीची झाली आणि पंचवीस चालू झाले. घरात आता तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. सईने MBA केलं आणि तिला चांगला जॉब मिळाला होता. खरंतर आता लग्न करण्याची योग्य वेळ होती पण अजूनही सईला खूप घाई होते आहे असे वाटत होते. थोडा अनुभव मिळाला तर अजून चांगले package मिळेल अशी तिला आशा होती त्यामुळे घरात लग्नाचा विषय निघाला की ती चिडचिड करून टाळत होती. सईची आज्जी हे सगळं काही दिवसांपासून बघत होती. आज सई उठून आत गेल्यावर थोड्यावेळाने आजी तिच्या खोलीत गेली. तशी आजीची आणि सईची छान गट्टी असायची पण आजपर्यंत लग्न या विषयात आजीने फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. आजी खोलीत आली आणि तिने दरवाजा लोटला. सई जवळ हळूच टेकत आजी म्हणाली, ” काय सईबाई कोण तुझ्या मनात सांग माझ्या कानात.” सई थोडी लाजली पण तो विषय झटकून म्हणाली, ” काय गं आजी काहीही काय, शी बाई तू पण ना?? आजी खरंच असं काही नाही गं पण मला ना अजून लग्न नाही करायचंय इतक्यातच. आत्ता कुठे चांगली नोकरी मिळाली आहे, अजून अनुभव मिळाला तर छान संधी मिळतील पुढे, कळतंय का तुला मी काय म्हणते आहे ते??” ” हं … असं का? बरं पण मग मला सांग किती दिवस घ्यावा लागेल हा अनुभव कि काय ते??” ” अगं आजी असं कसं सांगता येईल?? ” ” अच्छा म्हणजे तसं सांगता येत नाही! मग सई जे कधी होईल आणि होईल की नाही हे माहीत नाही त्याची वाट बघत राहायचं आणि निसर्गानं दिलेलं बाईपणाचं वरदान ताटकळत ठेवायचं??..” “काय म्हणायचं आहे आजी तुला काही समजेल असं बोल कसलं वरदान ? बाईपण काय??” तीचा उडालेला गोंधळ बघून आजी छानसं हसली आणि म्हणाली,” अगं पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी आमचं लग्न बाईपण आलं की लाऊन द्यायचे म्हणजे पाळी सुरू झाली की गं, पण काळ बदलला मुलगी शिकली पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे म्हणून लग्नाचे वय 16 वरून 18 आणि आता तर म्हणे 21 करणार आहेत. असो तर हे झालं सरकार दरबारी पण प्रत्यक्षात मात्र मुली आणि मुलंही घोडनवरा आणि घोडनवरी झाले की मग बोहल्यावर चढतात तोवर दोघांनाही 30\35 ओलांडले असते. तू म्हणशील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर ना?? पण आता असं बघ योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आवश्यक असतं बरोबर ना?? मुली 30 वर्षांच्या आत आई झाल्या तर त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगले असते शिवाय दुसरे मूल हवं की नको हे ठरवण्यासाठी वेळ मिळतो मुलांचं संगोपन करताना , त्यांचे निर्णय घेताना समजून घेणे सोपे जाते. पाल्य आणि पालक यांच्या मध्ये वयाची दरी कमी होते वयातलं अंतर कमी असल्यामुळे मुलांशी बोलताना त्यांना समजून घेताना अडचणी येत नाहीत. तू म्हणशील मी तर अजून लग्न नाही म्हणते आहे आणि ही पोहोचली मुलांपर्यंत, हो ना? ” सईच्या उत्तराची वाट न पाहता आजी पुढे म्हणाली, ” सई कसं आहे ना, आधी शिक्षण, मग नोकरी, मग पुढे अजून चांगली नोकरी हे सगळं चालूच राहणार आहे अगदी अनंत काळापर्यंत पण वय सुद्धा पुढे सरकत राहणार आहे. योग्य वयात लग्न झालं की नवरा आणि बायकोला चांगले मित्र बनायला वेळ मिळतो, योग्य वेळी मुलांचा विचार करता येतो. एकमेकांना समजून घेताना आणि हळूहळू नातं फुलवायला मिळतं मग आईबाबा होण्याचा प्रवास सोबतीने आणि आनंदाने साजरा करता येतो. नाहीतर उशीर झाला तर दवाखान्याच्या चकरा माराव्या लागतात आणि आनंदाने होणार प्रवास कष्टाचा होतो. सुदृढ आणि निरोगी पालक होणं सुदृढ बालक हे ते निसर्गानं दिलेलं बाईपणाचं वरदान, सहज मिळते म्हणून त्याची कदर केली जात नाही मग पश्चात्ताप होतो. सई बाळा लग्न फक्त दोन व्यक्तींच नाही तर दोन कुटुंबांना जोडतं , चांगली कुटुंब असतील तर चांगला समाज आणि चांगला समाजच चांगला देश घडवू शकतो हे लक्षात ठेव, सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांचा वारसा पुढे नेण्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी ही तुझ्यासारख्या तरुण तरुणींची आहे हे तुला विचार केला की नक्की पटेल. आजकाल तर दोन मुलं तर सोडाच पण एक मुल सुद्धा नको आहे या पिढीला मग काय ते प्राणी पाळायचे fad आलंय. काय बाई तरी एकएक मुलामाणसांची बरोबरी प्राण्यांशी?? नाही म्हणजे प्राणी पाळावेत पण मुलांना option म्हणून नाही ना?? अशाने समाज माणसांचा कमी आणि पाळीव प्राण्यांचा होईल ना?? तसंही माणूस प्राणी माणुसकी सोडून वागतो आहे. याचे कारण म्हणजे सुसंस्कृत लोकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या असल्या मुले नकोत म्हणणाऱ्या आजकालच्या विचारांमुळे. मुलींची संख्या कमी त्यातही अविचारी आणि अयोग्य जोडीदार निवडणारे अधिक. त्यात कमी पडते म्हणून की काय हे काय ते लिव्ह इन रिलेशनशिप म्हणे मग काय जबाबदारी झटकत मजा मारणारेच जास्त. पालक होण्याची आणि प्रेमाच्या नात्यांची जबाबदारी घेणं म्हणजे काय हे त्यांना कसं समजणार?? सई तुझ्या सारख्या सुसंस्कृत घरातील मुलामुलींनी समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. हा आदर्श समाजापुढे ठेवून आपल्या देशाची खरी ताकद ही कुटुंब व्यवस्थेत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले पाहिजे. बघ पटतंय का?? “
एवढं बोलून आजी दार उघडून बाहेर गेली. जाताना मुद्दमच दार लावून गेली. थोडा वेळ शांतपणे विचार करून सई बाहेर आली आणि आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, ” काय म्हणत होतीस तू आई कोणत्या metrimonial app वर नाव नोंदणी करत होतीस तू, मला आधी सांग आणि फोटो पण मला विचारूनच टाक बरं.” आजीकडे बघत आईने नजरेनच काय झालं अचानक हिला असं विचारलं आणि आजीने सुद्धा डोळे मिचकावत गंमत आहे आमची असं डोळ्यातुनच सांगितलं. समोर बसलेल्या बाबांना मात्र डोळ्यांमधलं हे गुपित कळलं नाही आणि अचानक सईची कळी खुलली कशी तेही समजले नाही……

