गाभारा

भाग २

न थांबणारा पाऊस आणि ऋतुजाला होणारा उशीर सासुबाईंची चिंता वाढवत होता. इकडे ऋषभ ऋतुजा दोघंही चांगलेच भिजले आणि घाबरले होते. पावसामुळे दोघांचेही फोन डिस्चार्ज झाले होते. घरी कसं जाणार? कसं कळवणार हे समजत नव्हतं. ऋतुजाला आपल्या भजी खाण्याच्या हट्टाचा राग येत होता. आपण त्यांचं ऐकायला हवं होतं असं तीला राहून राहून वाटत होतं. आडोसा असला तरी थंडी वाजत होती आणि डोकं सोडून सगळं भिजतच होतं. त्यांच्या मागच्या बाजूला एक शटर होतं जे बंद होतं. ऋतुजा चांगलीच गारठली होती. अचानक मागचं शटर उघडले आणि एका मध्यम वयाच्या व्यक्तींने त्यांना आत घेतले. ते किराणा मालाचे दुकान होते. मागच्या बाजूला भिंतीवर एक गणपती बाप्पाची मूर्ती होती. ऋषभने सवयीने चप्पल काढून आत प्रवेश केला. ऋतुजानेही तसेच केले. त्या व्यक्तीने हे बघितले. त्या दोघांना दोन खुर्च्या दिल्या आणि आतल्या खोलीतून हीटर आणून लावला, गारठलेली ऋतुजा त्या उबदार वातावरणात जरा शांत झाली. ते काका सुद्धा त्यांच्या बाजूला एका खुर्चीवर येऊन बसले. दुकानाच्या आतल्या बाजूला कोणाला तरी हाक मारुन त्यांनी चहा मागवला. गरम गरम चहा घेतल्यावर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता भज्यांच्या नादात ही मंडळी पावसात अडकली हे समजलं. थोडावेळ थांबून काका सहजच म्हणाले की इथे बाप्पा आहे म्हणून तुम्ही चपला काढल्या पण तुम्ही प्रेग्नंट असताना गर्भाचा विचार केला नाही तर कसं चालेल? जबाबदार पालक होण्याची हीच सुरवात आहे ना. गर्भ म्हणजे गाभारा च नाही का?? आपण गाभाऱ्यात जाताना काही नियम पाळतो तसंच आहे हे. आतला गर्भ आपल्या या नियमानुसार पोषण आहार आणि विहार यावरच घडतो यालाच आजकाल गर्भ संस्कार म्हणतात ना? बाहेरच्या देशात हे फॅड आहे इकडून कॅसेट , सीडी मागवतात आणि आपलीच मुले पालकांना जुनाट ठरवतात. सहजच पण काका महत्वाचे बोलून गेले होते. क्षमा करा मी जरा जास्तच बोललो. असंही म्हणाले. ऋषभ आणि ऋतुजाला सुद्धा आता आईंचं बोलणं आठवून पश्चात्ताप होत होता. काकांनी चार्जर दिल्याने ऋषभ चा फोन थोडा चार्ज झाला आणि रिंग वाजली, फोन सासुबाई म्हणजे ऋषभ च्या आईचाच होता आम्ही ठिक आहोत आणि सुरक्षित आहोत म्हणल्यावर त्या निश्चिंत झाल्या. ” सावकाश या मी गरम गरम भजी करून ठेवते..” असं त्या म्हणाल्या मात्र इकडे ऋतुजाचे डोळे भरून आले. ऋषभने तिला सावरले आणि काकांनी डोळे मिचकावत तीला जाणीव करून दिली. हेच ते जबाबदार पालकत्व. अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा त्या मागची कारणं समजून घेतली तर तनामनाचा गाभारा पवित्र राहील हे दोघांना पटले होते.

समाप्त