“माझिया मना जरा थांब ना
पाऊले तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन् मला वेदना…”
विचारांची गर्दी झालेले मन गोंधळलेल्या अवस्थेत धावते आहे. शरीरावर परिणाम रूपांत खूणा दिसताहेत, वेदना उमटताहेत. रोजच्या जीवनात घडणाऱ्या वैयक्तिक घटना कमी म्हणून कि काय पेपर आणि टि.व्ही. वरच्या बातम्या मनस्थिती बिघडवत आहेत.
कोणतीही घटना घडून जाते पण दूरागामी परिणाम समाजमनावर करते. नको त्या घटनांचे पुनःपुन्हा घडणे हे विकृतीकरण आहे. प्रत्येक जण, “आपण काय करू शकणार?” हा विचार करून मानसिक द्वंद्वात घेरला गेलाय. एका मर्यादेपर्यंत सामान्य माणूस काही करू शकत नसला तरीही समाज घडवण्याची जबाबदारी कुटुंब घडवण्याच्या माध्यमातून ती पार पाडू शकतो. समाज विघातक कृत्य हे नक्की कोणत्या मानसिकतेतून घडते ह्याचा विचार व्हायला हवा. कोणतीही गोष्ट एकदम घडत नाही तर त्यामागे काय कारण असू शकते हे अभ्यासणे गरजेचे आहे. जे झाले ते व्हायला नकोच असते पण त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा गोष्टी तपासून पाहिले पाहिजे. गुन्हेगारीचे समर्थन करणं हा हेतू इथे मुळीच नाही उलट शिक्षा जितकी जास्त तितके गुन्हा परत होण्याचे प्रमाण कमी. शिवरायांच्या काळातील ‘चौरंगा’ करण्याची शिक्षा बलात्काराच्या गुन्ह्यात लवकरात लवकर दिली गेली पाहिजे त्या करता सर्व समाजानेच एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.
एखाद्या घटनेकडे त्रयस्थपणे पाहून सर्वांत आधी काय करता येईल हे ठरवण्यासाठी मन आधी शांत असणे आवश्यक आहे. आपल्या घरात मूलं आणि मुली ह्यांना आधी त्या दोघांनाही आपापल्या क्षमता आणि मर्यादा दोन्हींची जाणीव करून देणे गरजेचे आहे. मॉडर्न विचारांच्या नादात मुली आपले मुलगी असणेच विसरायला लागल्या आहेत. पालक सुद्धा नको त्या गोष्टीत समर्थन करताना दिसतात. शैक्षणिक, वैचारिक स्वातंत्र्य स्वागतार्ह आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं, जबाबदारी घेणं हे सुद्धा योग्य आहे पण स्त्रीत्वाचा उत्तान दिखावा करून स्वतःचेच प्रदर्शन मांडण्यात काय हाशिल होणारं आहे? मुलांना मुलीं विषयी आदर शिकवायलाच हवा पण म्हणून स्त्रियांनी सुद्धा विषाची परीक्षा घेणं अयोग्य आहे. बोल्ड सीन्स करणारी एखादी स्त्री कदाचित दुसऱ्या एखाद्या निष्पाप स्त्री चा बळी देण्यास जबाबदार असूच शकते. प्रत्येक वेळी हे असेच घडते असे नाही पण रोजचा घटनाक्रम बघता ह्या शक्यता नाकारता येत नाहीत.
माणूस घडवण्याची जबाबदारी संपूर्णपणे घर आणि कुटुंबावरच असते आणि दुर्दैवाने बळी पडणाऱ्या व्यक्ती सुद्धा सामान्य घरातील आहेत असे जास्त करून दिसते आहे. याचाच अर्थ कुठेतरी भारतीय कुटुंब व्यवस्था जो भारतीय परंपरेचा अभिमान आहे असे मानले जाते तोच ढासळत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीच्या मागं धावणाऱ्या मनाला थोडावेळ उसंत देणं गरजेचं आहे. स्त्री आणि पुरुष समान आहेतच तसेच संस्कार आणि मर्यादा सुद्धा दोघांनाही आहे. हे बिंबवणे अपेक्षित आहे, तरच ‘स्त्रीला स्त्री’ असण्याचा अभिमान टिकवून ठेवण्यासाठी पुरुष सुद्धा पुढे येतील आणि यायला हवेत.
पोस्ट नावासह जास्तीत जास्त शेअर कराल अशी अपेक्षा आहे 👍🏻
सौ. मंजिरी जानोरकर.

