“राजा ललकारी अशी घे,
हाक दिली साद मला दे..”
साद आली की प्रतिसाद अनाहूतपणे येणारच हे गृहीत असते, त्या करता प्रतिक्षा करावी लागेल असे अपेक्षित नसते. पूर्वी मोठी माणसे घरातल्या लहानांना हाका मारत अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण येताजाता लहान मुलांना हाका सहजपणे दिल्या जात. “ओ! आलो आलो किंवा आले हं!” हे अपेक्षित उत्तर आले नाही तर मात्र जो काही उद्धार व्हायचा की बस. बरेचदा तर का बोलावले हे ही बोलावणारा विसरून जायचा मग उगाचच इकडच्या तिकडच्या चौकशा किंवा अभ्यासाबाबत विचारणा केली जायची. खरंतर त्या हाका मारण्या मागे न सांगता येण्याजोगी बरीच कारणं असावीत असं आता वाटतं.
पूर्वी घरात आजच्या इतका मोकळेपणा नव्हता. घरात असूनही पुरूष मंडळी बायका मुलांबरोबर बोलू शकत नसत. मग दिवसभरात त्यांची खुशाली समजण्यासाठी ह्या लहान मुलांच्या माध्यमातून बोलत बोलत सगळ्या बातम्या इत्यंभूत मिळवल्या जायच्या. कोणालाही काही हवे नको, दुखलं खुपलं तर तेही कळायचे. म्हणूनच घरात लहान मुलांना उगाच हाका मारून चौकशा व्हायच्या. लहान मुलं मात्र जाम वैतागायची, मोठ्ठ्या माणसांच्या समोर येणं टाळायची. कधीकधी तर नव्हे नेहमीच हाक मुलांना मारून संभाषण पत्नीशी असायचे ते ज्याचे त्यांना कळायचे पण ह्या गोंधळात मला नेमकं का बोलावलं हे मुलांना कधी समजलंच नसायचं. प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा आडुन आडुन असा संवाद साधला जायचा.
साद प्रतिसादाच्या या देवाणघेवाणीत घरांतील मोठ्यांबद्दल असलेला आदर असायचा. पतीने पत्नीला एकेरी संबोधणं आणि तेही आई वडीलांच्या समोर अशक्य मग पत्नीला पतीशी बोलणं किती कठीण असेल?
तारक मेहता का उलटा चष्मा 👓 ह्या लोकप्रिय मालिकेत मध्ये जेठा,दया आणि बापूजी यांच्या प्रसंगातून अनेकदा विनोदी अंगाने हेच नातं आदर्श पद्धतीने दाखवलं आहे. आजही बऱ्याच ठिकाणी ह्या मर्यादा पाळल्या जातात.
संभाषण हे शब्दांचे असते असे नाही तर नजरेतून सुद्धा होते. साद प्रतिसाद नजरेतून दिल्या घेतल्या जातात. ही प्रेमाची भाषा पूर्वीपासून अस्तित्वात आहे ती सुद्धा कोणाला न कळू देता आणि मोठ्यांच्या मर्यादा पाळून. त्या तशा काळातही एकमेकांवर शब्दांच्या पलिकडले प्रेम करणारी आपली वडीलधारी मंडळी आजचं हे उछृंखल, उत्तान प्रेम समजून घेऊ शकत नाहीत असा बेधडक आरोप त्यांच्यावर करणं किती योग्य आहे? ही विचार करण्यासारखी बाब आहे.
सौ. मंजिरी जानोरकर.

