“सावध हरिणी सावध ग,
करील कुणीतरी पारध ग..”
प्रेम ह्या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे विश्वास असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ह्याच प्रेमात मग वचनं दिली घेतली जातात. वचन देऊन फिरणारी व्यक्ती ही विश्वास घातकी असते आणि विश्वास घात हा आत्मिक गुन्हा आहे. असं म्हणतात कानावर विश्वास ठेऊ नये डोळ्यांना जे दिसते ते सत्य मानावे पण खरंच जे दिसत ते अगदी तसंच असतं?? मग असे का म्हणतात? की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं! आहे खरी गंमत. मग नेमका विश्वास ठेवायचा कुठे,कसा, आणि कोणावर ?? इतके प्रश्न असुनही जगरहाटी एका विश्वासाने चालू आहे. घराबाहेर पडताना, घरांत राहुन वाट पाहणाऱ्या मंडळींचा विश्वास, रस्त्यावर चालताना, गाडी किंवा कोणत्याही वाहनाने जात असताना ड्रायव्हर वर विश्वास, ऑफीस मधल्या सहकारी लोकांवर विश्वास. अशा अनेक गोष्टींवर सगळेचजण कळत-नकळत विश्वास ठेवून अवलंबून राहात असतात आणि सहजपणे स्वतःचे रोजचे दिनक्रम ठरवत असतात. रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत वचन देण्याची किंवा शब्द देण्याची आवश्यकता नसते. लहान सहान बाबतीत एकमेकांना गृहीत धरणं हा त्या विश्ववासाचाच भाग असतो.
संपूर्ण ब्रह्मांड हे अधांतरी आहे, तरी एका अदृश्य शक्तींच्या आधारे ते संतुलन ठेऊन आहे. हीच ती अदृश्य शक्ती सगळ्यांना विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते. जे दिसत नाही ते सुद्धा आहे हे सिद्ध करते.
ऐकु येणाऱ्या आणि डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या पातळीवर तपासून घेऊन मगच विश्वास ठेवला पाहिजे हे ही त्याच विश्वाने अनुभवातून शिकवलं आहे.
रावणानेही सीतेचे हरण एक साधू बनून केले होते हे विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे विश्वासघात करण्यासाठी ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला जातो अशाच लोकांचे रूप घेतले जाते. साधं-भोळं बनून सामान्य लोकांची फसवणूक केली जाते आणि अनुभव असुनही लोक परत परत फसतात कारण माणूस हा मुळातच पापभिरू वृत्तीचा असतो. चांगल्या वाईट गोष्टींच्या तसेच पाप पुण्याच्या त्याच्या संकल्पना लहानपणापासून घट्ट झालेल्या असतात. एकमेकांना मदत करावी हे मनावर बिंबवले गेलेलं असतं. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास तो ठेवत आलेला असतो. चूक या सगळ्याचा फायदा घेणाऱ्याची असते फसवल्या जाणाऱ्यांची नाही. यातुनच गुन्हे घडतात. आपलेपणाने आधी विश्वास संपादन केला जातो आणि नंतर घात होतो.
पुढे जाऊन गुन्हेगार कधी ना कधीतरी पकडले जातातच पण तोपर्यंत आपण फसलो हे guilt उगाचच वाटत राहते. म्हणूनच बुद्धी, अनुभव ह्या सगळ्यांमधून शिकलं पाहिजे. दुधाने चटका बसल्यावर ताक सुद्धा फुंकून प्यावे असे म्हणतात ते काही खोटे नाही.
पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

