हिंदोळा

      “घननीळा, लडीवाळा झुलवु नको हिंदोळा…”

   सहज सुलभ शब्दातून जणू स्त्री मन दिसते. ४५ ते ५० हे स्त्री चे वय अश्याच हिंदोळ्यां सारखे दोलायमान असते. हा विषय खरंतर मानसिक, शास्त्रीय(डॉक्टर्स लेव्हलवर) अशा अनेक पातळ्यांवर बोलल्या गेलाय आणि जातोय. तरीही घासून घासून जुनाट झालेला विषय पुन्हा पुन्हा विचारात घ्यावा असाच आहे. हिंदोळा म्हणजे झोका,झूला जो वाऱ्याने सुद्धा हालतो,असेच काहीसे स्त्रीयांचे मन ह्या काळात होत असते.  ‘मूड स्विंग्ज’  असे एक इंग्रजी नाव देऊन भावनांचे वर्णन सोपे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ते तितकेसे सहजपणे समजणं कठीण आहे. 

     घरांत आई किंवा पत्नी कोणत्या क्षणी नेमकी कशी रिॲक्ट होईल ह्याचा अंदाज मुलं आणि पती दोघेही लावू शकत नाहीत. एकदम उत्साह ओसंडून वाहत असतो तर काही वेळाने एकदमच ‘लो’ वाटते. अचानक रडू येते. कधीकधी तर खुपच nostalgic वैगरे होते आणि भूतकाळात रममाण होऊन जाते. भरभरून बोलता बोलता गप्पं बसते. बरं कारण विचारले तर ते सुद्धा नीट सांगता येत नसते. रोजच्या वेळापत्रकानुसार काम करत सगळ्यांकडून तीच अपेक्षा असते आणि तसं नाही झालं कि चिडचिडेपणा सुरू, मध्ये काही बोलायची कोणाचीच हिंमत नाही कारण सुई आपल्या कडे वळायची. अशा वेळी सगळेच काढता पाय घेतात. त्याचाही तिला राग येतो मग एकटीच बडबडत राहते.  नवरा आपल्या पातळीवर समजून घेण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी तो फसतो तर कधी  चपखल बसतो. हे सगळेच अनपेक्षित असते. घरात मुलांना एव्हाना सवय झालेली असते आणि ती सपशेल दुर्लक्ष करायला लागलेली असतात आणि स्त्री आणखीनच एकाकीपण अनुभवत असते. सगळंच कळतं पण वळत नाही अशी काहीशी तिची अवस्था असते. आजची स्त्री सुशिक्षित, सुजाण असली तरीही अनंत काळापासून ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. हा स्त्रीयांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून तो डॉक्टर्स किंवा नवरा बायको आणि कुटुंबातील लोकांचा आहे हे गृहीत असते. 

     खरंतर सामाजिक पातळीवर सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन बायकांच्या ह्या मनस्थितीत त्यांना मदत होईल असे उपक्रम राबवायला हवेत. मैत्रीणींनीच एकमेकींना आनंदी ठेवण्यासाठी ग्रूप केले पाहिजेत छोटीशी सहल गेट टुगेदर करायला हवीत. आपल्या अडचणी एकमेकींना सांगुन त्यांचे निवारण करायला हवे, कारण एका स्त्री वर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते,तिच्या मनाचे प्रतिबिंब कुटुंबांवर परिणामी समाजमनावर पडत असते. घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरातील वातावरण कसं आहे हे बघणे महत्वाचे आहे. छान मूड मध्ये असलेल्या व्यक्ती समोरच्या माणसाला प्रफुल्लित करत असतात. स्त्री,गृहिणी असो वा वर्किंग तिला हे हिंदोळे चुकवता येत नाहीत आणि त्यांचे परिणाम पुरूषांना टाळता येत नाहीत. 

     सर्वार्थाने स्त्री हीच सर्वाधिक चर्चेचा विषय असतो कारण ‘ती’ च समाज आणि कुटुंब दोहोंचा मूलभूत आधार असते आणि तरीही दुर्दैवाने सर्वाधिक दुर्लक्षित पण. कुटुंबा इतकेच स्त्री ने स्वतः कडे लक्ष द्यायला हवे. आपली काळजी आपणच घ्यायला हवी. घरकामातून वेळ काढून स्वतःला द्यायला हवा. शक्य तिथे घरकामाला मदतनीस ठेवून लोक काय म्हणतील याचा विचार दूर सारून आवश्यक ती विश्रांती घ्यावी, खरंच थोडा मनाचा विचार करून चक्क हवं तेंव्हा लोळावे,खावे,गावे अगदी मनमानेल तसं जगावं कारण तो तिचा हक्क आहे. मुलं पुरेशी स्वावलंबी झालेली असतात पुरेसा मोकळा वेळ मिळणार असतो तरीही स्वतःची जबाबदारी ती पार पाडून हे सगळं करत असते.  गरज असते ती घरातील लोकांनी टोमणे न मारता ते स्विकारण्याची.

                                      सौ. मंजिरी जानोरकर.