आठवणीतले पुणे

                                                               माझे  बालपण
         “माहेर” हा स्री मनातला जिव्हाळ्याचा आणि हळवा कोपरा, अनेक आठवणी आणि संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन पुण्यातले माझे माहेर सोडून मी सासरी नाशिक ला आले.
             पुण्यात पर्वती जवळ माझे  घर, पूर्वी आम्ही ओंकारेश्वराजवळ उपाध्ये वाड्यात राहात असू. ६१ च्या पुरानंतर  रुपये ९० फक्त भरून माझ्या वडिलांनी हि जागा घेतली. मिलिटरी  क्वार्टर्स म्हणून बांधलेल्या ह्या जागा पुरानंतर ह्या पूरग्रस्तांना भाड्याने दिल्या. मागे पुढे ऐसपैस अंगण, स्वतंत्र टॉयलेट-बाथरूम आणि दोन मोठ्या खोल्या त्यातही माळा बांधायची सोय आणि तोही आम्ही जागे अभावी बांधलेला. अनेकदा रुपये २२ इतके भाडे भरायला आई बरोबर रमणा गणपती जवळ गेल्याचे मला चांगले आठवते. नंतर काही रक्कम भरून ती जागा आमच्या मालकीची झाली.  ९ घरांचा शेजार आणि तेवढेच मोठे अंगण आम्ही सगळेच हक्काने वापरायचो. आपटे, दळवी,सोनपाटकी, हरदास, आठल्ये, दिवाकर(म्हणजे आम्ही), भागवत आणि घुबे. प्रत्येक घरी २ मुली १ मुलगा आमचे घर वगळता कारण आमच्या घरी मी आणि भाऊ दोघेच. आठल्यें  कडे मुलबाळ नव्हते पण त्यांच्या दोघी भाच्या येत असत नेहेमी.  २-३ वर्षाच्या अंतराने सगळेच बरोबरीचे.  मुलींची संख्या जास्त त्यामुळे बायकी खेळ सुद्धा जास्त भातुकली,घर-घर असे खेळ, भोंडला, तुळशीचे लग्न ,दिवाळी  ह्या निमित्ताने साड्या नेसून मिरवणे आलेच. गणपतीत आरत्या प्रत्येकाच्या घरी असायच्या मग सगळ्यांकडे हजेरी असायची. प्रसादाची धम्माल चाले. नवरात्रीत तर रोज कुमारिका म्हणुन मोठे कौतुक व्हायचे आमचे ओट्या काय, बांगड्या काय कानातले,गळ्यातले आणि दसऱ्याला फ्रॉक मज्जा असायची आमची. दिवाळीत सगळ्यांचे फटाके एकत्र करून उडवायचे. एकसारखे आकाशकंदील, दारात रांगोळया ह्यांची नुसती चढाओढ लागे आमच्यात.
                 मे  महिन्याच्या सुट्टीत तर आपट्यांच्या खोलीत दिवसभर पत्ते, कॅरम, भातुकली ह्यांचा धुडगूस असे. आपटे आज्जीच्या  नाती आणि त्यांची मुलगी  सुद्धा आमच्या मध्ये सामील होत असत.
                 सगळ्या मुली आणि नवीन लग्न करून आलेल्या सुना एकत्र सकाळी पर्वतीवर जाणे हा सुट्टीमधला आणि रोजचा कार्यक्रम फक्त एरवी बायका नसत आम्ही मुलीचं जायचो. सहज चालत जाण्याइतकी जवळ असलेली  सारस बाग आणि पर्वती हि आमची कायमची श्रद्धा स्थानं आमच्या आठवणी त्या शिवाय अपूर्ण आहेत.  पद्मावती देवी व तळजाई टेकडी हि  डबे घेऊन जाण्याची  बायका आणि आम्हा मुलांची  आवडती ठिकाणे साधारण वर्षातुन एक दोन वेळा तरी आम्ही सगळे जायचोच. दोन दिवस बायकांची ठरवाठरवी चाले मग फायनल झाले कि रिक्षा ठरवून आम्ही जायचो.  होळी च्या दिवशी  सगळ्यांचे पाण्याचे हौद साफ करून सकाळीच तयार करून भरून ठेवले जायचे मग जेवण झाले कि खेळायला सुरुवात बायका मुले सगळेच मनसोक्त खेळायचे मग रात्री करता एकत्र पावभाजी किंवा खिचडी असा बेत असे. फार मज्जा केली आम्ही त्या वेळी.
         खूप धम्माल आणि भरपूर प्रेम, संस्कार ह्यांची ती कार्यशाळाच  होती. वेगळे संस्कार वर्ग, खेळ वर्ग ह्यांची कधीच गरज भासली नाही. एकमेकांची घरे सगळ्यांकरता कायम उघडी असायची. कोणीही कोणाच्याही मुलांना रागवू शकत होते, जेवायला घालू शकत होते, काळजी घेत होते, वेळ काळ न पाहता दार वाजवू शकत होते, भरभरून मदत करत आणि हक्काने मागत सुद्धा होते. हो कारण हा आता भूतकाळ झालाय हे चित्र फक्त आठवणींच्या मन:पटलावर शिल्लक आहे. ह्याच आमच्या पिढीने मुलांना बंद दाराआड मोबाईल मध्ये रमण्यास भाग पाडले आहे. आई वडिलांच्या बिझी शेड्युल मुळे मुले एकटी पडलियेत. पुनः एकदा बंद फ्लॅट ची दारं उघडुन आपल्या बालपणीचे आणि मुलांच्या स्वप्नातले गोकुलधाम प्रत्यक्षात आणायला हवे आहे. तरच प्रत्येकजण ( आपली मुले) पुढे जाऊन  “माझे बालपण ” हे आठवुन आणि रंगवून सांगु शकतील.
                                                                                                                        सौ मंजिरी जानोरकर