गाभारा

भाग १

कॉम्प्युटर इंजिनियर असलेला ऋषभ अगदी देवभोळा नसला तरी नास्तिक सुद्धा नव्हता. फार देव देव करायला त्याला तितका वेळ आणि आवड दोन्ही नव्हते पण देवघरातल्या देवाला सकाळी आणि संध्याकाळी न चुकता नमस्कार करण्याची आईने लावलेली सवय मात्र जपली होती. आवर्जून नाही पण सवयीने का होईना मंदिरात गेलाच तर चपला न विसरता काढून ठेवायचा. आई म्हणायची गाभाऱ्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. त्या वेळी त्याचा अर्थ फारसा कळला नाही आणि नंतर जाणून घ्यावं असं वाटलं नाही.

ऋतूजाला म्हणजे ऋषभच्या पत्नीला लग्नानंतर पाच वर्षांनी प्रथमच दिवस गेले आणि काळजी घ्यायला हवी असं डॉक्टर म्हणाले. सुरवातीला काही महिने ऋषभची आई आणि बाळांतपण करायला ऋतूजाची आई येणार हे घरातल्या बायकांनी परस्पर ठरवून टाकले. ऋषभ काही बोलूच शकला नाही पण ऋतूजा आणि बाळ यांच्या करता हे आवश्यकच होते कारण तो स्वतः ऑफिस मध्ये खूप बिझी असायचा, जाण्याची वेळ निश्चित असली तरी येण्याची वेळ अनिश्चित मग या परिस्थितीत बायकांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे त्याला पटले. ऋतूजाला डॉक्टर कडे नेण्याची जबाबदारी मात्र भावी पिता म्हणून त्यांच्यावर टाकली होती. डॉक्टर देवेंद्र हा त्याचा बालमित्र असल्याने तसा तो निर्धास्त होता. दोघांचाही पहिला अनुभव होता आणि तसा ऋतुजाला काही त्रास होत नव्हता. ऋषभची आई येऊन राहीली होती आणि ऋतुजाला सतत सूचना करत होती, हे करू नये, असे वागू नये इत्यादी इत्यादी. सुरवातीला ऋतजाने ऐकले पण नंतर नंतर तीला तो जाच वाटू लागला. रात्री उशिरापर्यंत फिरायला न जाणं, बाहेर न खाणं या आणि अशा बऱ्याच. अनेक वेळा तर ती काही गोष्टी अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करू लागली. ऋषभलाही आईचे विचार जुनाट वाटायला लागले. पावसाच्या दिवसात एकदा पौर्णिमेच्या दिवशी असेच आभाळ भरुन आले होते आणि ऋतुजाला सासुबाईंनी फोन करून लवकर घरी येण्यास सांगितले. “आज पौर्णिमा आहे वेळेत घरी ये” ही साधी सूचना तीचा स्वाभिमान जागृत करून गेली, मुद्दामच मला कांदाभजी खायची इच्छा झाली आहे असं सांगून तिने ऋषभला परस्पर ऑफीस मधे बोलवून घेतले. आईच्या फोनवर हो म्हणत ऋषभ ऋतुजाला घेऊन भजी खायला निघाला. गर्दीत फोरव्हिलर अडकते म्हणून टू व्हीलर वर जोडी निघाली आणि पाऊस सुरू झाला. आधी हवाहवासा वाटणारा तो नंतर मात्र उग्र स्वरूप धारण करू लागला. रस्त्यावर पाणी साठू लागले. आडोसा बघून दोघेही थांबले खरे पण पाऊस थांबता थांबेना.