पत्रास कारण की

     “सप्रेम नमस्कार, विनंती विशेष!

      तुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश…”

आजच्या काळात काहीसे विसरले गेलेले हे गाणे आणि पत्र लिखाण, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आठवण झाली ती ह्या पत्र लिखाणाची. अर्थात वरील पत्र हे एका प्रेमीयुगुलांचे आहे. त्या गाण्याच्या निमित्ताने का होईना पत्रांची आठवण आली.  पुर्वी लांब असलेल्या आपल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचे एकमेव साधन हे पत्र असायचे. पिवळ्या रंगाचे पोस्टकार्ड कमी मजकूर असेल तर आणि आंतरदेशीय पत्र म्हणजे निळ्या रंगाचे पत्र म्हणजे जास्त मजकूर. हे ठरलेले. निळे पत्र बंद लिफाफ्या सारखे असायचे , सिक्रेट! कोणीही सहज वाचू शकणार नाही असे.  आत्ता फोनवर बोलुनही जितकें मन मोकळे वाटणार नाही एवढा आनंद ही पत्र लिहीण्यात आणि आलेली पत्रे वाचण्यात मिळत होता. 

         माहेरी किंवा लांब असणाऱ्या भावाला राखी पाठवताना चिठ्ठी लिहिली जायची त्यात बहीणीच्या भावना केवळ शब्दातून नव्हे तर तिच्या साध्या अक्षरावरून सुद्धा भावाला जाणवत असत. आपल्या माणसांची वाट पाहण्याचा आनंद आणि त्यांच्या पत्रांची वाट पाहाण्याचा आनंद  सारखाच आणि दोन्हीतही तीच हुरहूर. माणूस भेटण्याचा आनंद  ह्या पत्रांच्या नुसत्या येण्यामध्ये  होता. आजही जुनी पत्रे काही ऐतिहासिक पत्रं जी उपलब्ध आहेत ती वाचताना आजही त्या काळात नेण्याची ताकद त्यांच्यात आहे. हे ह्या पत्रांचे वैशिष्ट्य आहे. 

      चांगल्या, वाईट आशा कितीतरी बातम्या पत्रामुळे कळविल्या जात. खुशाली समजे. मग मिळालेल्या पत्रांना उत्तर दिले जाई. आपली खुशाली समोरच्याला पुनः पत्राने उत्तरादाखल पाठवली जायची. पत्रांचा हा सिलसिला अखंड चालू राहावा आणि एकमेकांशी संवाद घडतं रहावा असेच ज्याला त्याला वाटत असायचे.

       आज  Internet, मोबाईल च्या काळात हा पत्रव्यवहार जरी थांबला असला तरी त्या आठवणी मात्र कायम मनात रेंगाळत राहातील.

पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.

                               सौ मंजिरी जानोरकर.