काही दिवसांपूर्वी आम्ही गोव्याला जाऊन आलो. “उन्हाळ्यात गोवा!” असं अनेकांनी विचारलंही पण सगळ्यांना जमेल अशी हीच वेळ सोईची होती. असो, ४ दिवसांच्या मुक्कामात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवण घेतले पैकी एक दिवस ‘दिल्ली दरबार’ नावाच्या हॉटेल मध्ये (चेनरेस्टोरंट) जेवण घेतले. दिवसभर फिरून संध्याकाळी फेरीबोट मध्ये फिरल्यावर जवळच हे हॉटेल होतं. तिथलं जेवण छान असतं असं ऐकलं होतं. पार्किंग मधून गाडी काढून चालवत जाण्यापेक्षा, जवळ होतं म्हणून चालतच गेलो. दारातच राजाच्या वेषातील इसमाने सलाम ठोकत दरवाजा उघडून दिला आणि आम्ही घाम पुसत झटकन त्या ए.सी. रूममध्ये शिरलो. इतक्या थोड्या वेळात आम्ही घामाने चिंब झालो. गार पाणी आणि मस्त जेवण मागवले आणि निवांत बसून वाट बघु लागलो. आता वेळ मिळाल्यावर काचेच्या दारातून बाहेर उभा असलेला त्या राजाच्या वेषातील इसमाकडे माझं लक्ष गेलं. बाहेरून आत येताना मला त्याच्यात काही विशेष वाटलं नव्हतं पण आता ए.सी. मध्ये बसल्यावर मला त्याच्या त्या कपड्याची आणि बाहेर असलेल्या वातावरणाची जाणीव झाली. अंगभर शेरवानी, डोक्यावर फेटा आणि हे कमी म्हणून की काय नाकावर मास्क आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून तो प्रत्येकाचं स्वागत करत होता. गंमत म्हणजे मघाशी मी चालत दाराजवळ आले आणि त्या क्षणी ते दार उघडले तेंव्हा क्षणभरात अंगावर आलेली गार झुळूक मला आठवली ते सुखं तो प्रत्येक वेळी फक्त क्षणभरच अनुभवत होता आणि तरीही चेहरा आनंदी ठेवत होता. गरीबांना एसी वैगरेची सवय नसते हे मान्य पण इतक्या गरमीत शेरवानी परिधान करून दिवसभर उभं राहाणं आणि आत्तातरी संध्याकाळ होती तो भर दुपारी उन्हात सुद्धा असाच उभा असणार. ते दृष्य पाहून मला बिरबलाच्या खिचडीची आठवण झाली, कुडकुडणारी थंडी आणि महालातील दिवा तसाच भयंकर गरमीत शेरवानी घातलेला तो आणि क्षणभरच दार उघडल्यावर गारवा देणारा एसी. उगाचच रिकाम्या पोटी रिकाम्या वेळात माझं मन विचार करत होतं. लांबून आकर्षक वाटणारा तो राजा जवळून खूप दीनवाणा वाटायला लागला , पोटासाठी तो घाम गाळत होता हे मात्र खरंच दिसत होतं. बाहेर आल्यावर आम्ही त्याला टीप दिली तेंव्हा वृध्दत्वाकडे झुकलेले त्याचे डोळे खोल हसले आणि मनापासून धन्यवाद देऊन त्याने पुन्हा एक खडक सलाम ठोकला..
सौ.मंजिरी जानोरकर.

