सरप्राइज

       सरप्राइजेस आवडतं नाही असा माणूस विरळाच. प्रौढ आणि प्रगल्भ असण्याचा कितीही आव आणला तरी मनातून मात्र ही सरप्राइजेस सगळ्यांनाच आवडतात. वाढदिवसाच्या दिवशी, anniversary, एखाद्या स्पेशल अचिव्हमेंट नंतर आपल्या जवळच्या कोणीही सरप्राइज दिलं तर आनंद द्विगुणित होईल हे निश्चित. 

        खरंतर आजकाल हे फॅड जरा जास्तच वाढलंय. सरप्राइज देण्याच्या च्या नादात कधी कधी अशा काही गंमती होतात की वेगळंच सरप्राइज मिळतं. 

          पंचवीस एक वर्षा पूर्वी साधे फोन सुद्धा सामान्य लोकांकडे नव्हते, त्यामुळे एखाद्याच्या घरी विशेषतः परगावी काही कामानिमित्त जायचे असल्यास पत्र टाकून आधी कळवणे हा एकच पर्याय होता. ते पत्र वेळेत मिळणं हा नशीबाचा भाग होता पण ते न मिळाल्यास त्या घरातील मंडळी जर दुसरीकडे गेली तर मात्र फजिती झाली म्हणून समजा. कारण त्या काळात आता सारखा हॉटेल्सचा सुळसुळाट झाला नव्हता. सर्रास सहज हॉटेल मध्ये राहाणं हे खिशाला परवडणारं नव्हतं. त्यामुळेच सरप्राइज देऊ म्हणून कोणी अचानक येणं जवळपास दुरापास्तच.  बरं आता सारखी ओनलाइन गिफ्ट घरपोच सेवा अशी काही भानगड सुद्धा नव्हतीच. प्रत्येक गोष्टीत पोस्ट सर्व्हिस वर अवलंबून राहावे लागे. त्यातल्या त्यात ‘तार’ पाठवून तातडीचा संदेश दिला जायचा तोही मोजक्या शब्दात. 

          गंमत म्हणजे असं असुन सुद्धा घरगुती पातळीवर सरप्राइजेस त्या काळातही दिली जायची. एखादा आवडता पदार्थ बनवून पानावर ऐनवेळी वाढायचा, कोणी आवडती व्यक्ती येणार आहे हा निरोप लपवून ठेवायचा आणि अचानक समोर उभा करायचा, नविन कपडे कपाटात आधीच आणून ठेवायचे असे एक ना अनेक प्रकारचे सरप्राइज दिले जायचे. त्याकरता खूप आधीपासून तयारी करावी लागायची आणि ते ही न कळू देता.  ती गंमत निराळीच होती. आजही तयारी करावी लागते पण गोष्टी सहज उपलब्ध होतात इतकंच. 

         एकूण काय तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अचानक आनंद मिळवून देणं हे महत्त्वाचं. ज्याला ज्यात आनंद मिळतो त्याला तो देणं. अचानक भेटणारी माणसं असोत, मिळणारे कपडे असोत, समोर येणारा पदार्थ असो किंवा ठरवून केलेली पार्टी असो रोजच्या जीवनात एक आनंदाचं वळण आवश्यक असतं. पुढील संपूर्ण वर्षभर ती आठवण मनाला उभारी देत राहते आणि माणूस पुन्हा पुन्हा त्या क्षणांची वाट बघत राहातो. 

         सरप्राइज देणं ही संकल्पना नेमकी कुठून आली हे माहीत नाही पण तो मानवी स्वभाव आहे हे निश्चित कारण शब्द इंग्रजी असला तरी हाताळणी अस्सल भारतीय, म्हणुनच सरप्राइजेस देत आणि घेत राहा जस्ट एन्जॉय. 👍🏻👍🏻👍🏻

 

                                सौ.मंजिरी जानोरकर.