आयुष्याच्या पुस्तकाचं पान
कधी पालटलं कळलंच नाही.
लहान असतो आपण आणि
सारं घर नाचत असतं
आपल्या भोवती फेर धरून
मग कधी एक दिवस आपल्याला
नाचवायला लागले सगळे
हे लक्षातच येत नाही,
अन् आयुष्याचं पान कधी पालटलं
हे कळतंच नाही.
कौतुक सोहळे साजरे होत असताना
अचानक शाळा सुरू होते आणि ते
कौतुक प्रगती पुस्तकात कधी पकडले गेले
हे समजतच नाही अन् आयुष्याचं पान कधी
पालटलं कळलंच नाही.
मुक्त संचार चालू आहे तोवर बंधन
नेमके कोणी, कधी बांधले ?
दोर टाकून लगाम कसे ओढले ?
हे मुळीं कळलंच नाही अन्
आयुष्याचं पान कधी पालटलं कळलंच नाही.
सुखे संसार सुरू होता, आनंद ओसंडून
वाहत होता, झऱ्याच्या पाण्यात सारखा
उड्या मारत हुंदडत होता,
शरिर कधी बोलू लागले,
दुखरे सांधे वाजू लागले, आता
थोडंसं थांब कधी म्हणू लागले
आठवतच नाही अन् आयुष्याचं पान
कधी उलघडलं समजलंच नाही.
प्रत्येक पान जगून घ्यावं, मुक्तपणे
अनुभवावं आनंद घेत हसत खेळत
आपलं पुस्तक आपणच चाळावं
आणि हवं तेंव्हा हवं ते पान आपणच
पालटावं.
सौ. मंजिरी जानोरकर

