चित्रपट बघण्यापेक्षा मला नाटक बघायला मनापासून आवडतं. लहानपणापासून पुण्यात बरीच नाटकं बघीतली. नाटकांवर लिहिले मात्र नाही कधी.
“मनात माझ्या” च्या निमित्ताने काही चांगले शेअर करावं असं वाटलं म्हणून प्रथमच मी नाटक ह्या विषयावर लिहीत आहे तरी कसं वाटलं लिखाण हे नक्की सांगा.
“आमनेसामने” नावाचं नाटक नुकतेच पाहीले. मंगेश कदम आणि लीना भागवत ही परिचित कलाकार मंडळी आहेत म्हणून बघितले. विनोदी सादरीकरणातून प्रत्येक घराघरातील अगदी कॉमन पण उघडपणे न दिसणारी परिस्थिती दाखवली आहे. “घरोघरी त्याच परी, कोणाला न सांगितलेली बरी.” अशी गोष्ट मोकळेपणाने विनोदी ढंगात मांडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप आणि ३९ वर्ष संसार केलेले जोडपं एकमेकांच्या आमनेसामने येतात आणि एकमेकांच्या गोष्टी आपल्या समोर सांगतात. एकमेकांना अलगद कोपरखळ्या मारत पतिपत्नी ही गंमत एन्जॉय करतात आणि योग्य तो परिणाम साधत हसतखेळत नाटक संपतं.
विषय खूप नवखा नसला तरी हाताळणी चांगली आहे. कुठेही नाटक कंटाळवाणे होत नाही. संपूर्ण कुटुंब एकत्र नाटक बघू शकते.
मला आवडले म्हणून शेअर केले. नाटकाचं प्रमोशन हे उद्दिष्ट नाही.
सौ.मंजिरी जानोरकर.

