प्रभाव

      ” कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था …..”

    जन्म झाला की आपण मुलगा आहोत की मुलगी हे कळण्याचा सुद्धा  प्रश्न येत नाही, आणि गरजही वाटत नाही. हळूहळू मी मुलगा किंवा मुलगी आहे हे समजायला लागते मग आपले हक्क, मागण्या हट्ट करून, प्रसंगी रडून कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायच्या ते कळायला लागते. ह्या गोष्टी शिकवायला लागत नाहीत. कारण ‘स्व’ जागा होत असतो. मग हळूहळू स्वतःचा शोध प्रवास चालू होतो.  मला काय पाहिजे पासून मी  मोठेपणी कोण होणार? हे ठरायला लागले. त्याकरता काय शिकले पाहिजे? हे सुद्धा ठरलेले असते. आजकाल मुलं फार लवकर मोठी, प्रगल्भ होत आहेत. विचार करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

     स्वतःच्या ह्या शोध प्रवासात संस्कार करण्याची जबाबदारी  आणि कर्तव्य  हे नेहमीच पालकांची राहिलेली आहे. हे संस्कार ह्या  ‘स्व’ च्या जडणघडणीत खूपच जास्त महत्वाचे आहेत. मुलगा किंवा मुलगी आपण असतो त्याहीपेक्षा माणूस म्हणून आपले घडणे गरजेचे आहे, हे संस्कार शिकवतात. 

   एकमेकांचा विचार करणे, दुसऱ्याला त्रास होऊ न देणे. अशा अनेक गोष्टी शिकाव्या लागतात त्यातूनच मग स्वभाव बनतो, व्यक्तीमत्व घडते. हे व्यक्तिमत्त्व आयुष्यावर फार प्रभाव पाडते. आपल्या आसपासच्या माणसांचा,शिक्षकांचा,पालकांचा प्रभाव आपल्या व्यक्तीमत्वावर उमटत जातो आणि माणूस घडत जातो. ही प्रक्रिया प्रदीर्घ आहे. ह्यातूनच मिळणारे अनुभव माणसाला समृध्द करत असतात.

   स्वतःचा शोध घेतला जात असताना आपल्याही नकळत आपण आजूबाजूच्या कोणाला तरी घडवत असतो. ही मानवी साखळी आहे. माणसाने माणूस घडवला जात असतो.  ह्यातूनच स्वतःचा शोध घेतला जात आहे अगदी अनादी काळापासून.

पोस्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.

                            सौ.मंजिरी जानोरकर.