” रंगुनी रंगात साऱ्या,रंग माझा वेगळा..”
संपूर्ण विश्व हे रंगात रंगलेले आहे. अनेक रंग आणि त्यांच्या अनेक छटा. कित्येकदा रंगांची नावे सुद्धा माहित नसतात. हिरवळीचा हिरवेपणा सुद्धा खूप प्रकारचा असतो. हे प्रत्यक्ष पाहिले की मग जाणवते. हिरवी झाडे कधी पोपटी तर कधी काळपट हिरवट आणि कधीकधी तर कोवळी पाने चक्क लालसर दिसतात. हे फक्त झाडांच्या बाबतीत असते असे नाही, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत हाच अनुभव येतो. ह्या रंगातच निसर्गाचे नटलेपण आहे. रंगिबेरंगी पण नयनरम्य.
असं असुनही प्रत्येकजण स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. हा खरा चमत्कार आहे. ढगांचे निळेपण, पाण्याची निळाई वेगळी. फुलपाखरू तर रंग छटांचे अनोखं रूप आहे. विलक्षण, अनाकलनीय, आकर्षक आणि तरीही गूढ अर्थपूर्ण असे हे निसर्गाचे रूप माणसाला अनंत काळापासून स्वतःच्या तालावर नाचवत आले आहे. निसर्ग स्वतःचे खरे पण आणि संतुलन जपत आला आहे. निसर्गाला ताब्यात ठेवू पाहाणाऱ्या माणसाचा भ्रमनिरास झाला आहे.
विश्व सृष्टी चे चक्र चालवण्यास निसर्ग सक्षम आहे हे त्याने मानवाला अनेकदा दाखवून दिले आहे.
भारतीयांनी निसर्गाचे हे मोठेपण आणि वेगळेपण स्विकारले आणि आपली संस्कृती वसवली ती सुध्दा निसर्गाच्या हातात हात घालून प्रगती कडे नेणारी. आता हे संपूर्ण जगाला पटायला लागले आहे म्हणूनच भारतीय संस्कृती आत्मसात करण्याची धडपड सारे विश्व करतं आहे.
भारतीयांचे हे वेगळेपण आता भारतीयांनी ओळखून स्विकारण्याची गरज आहे.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

