सतत भुणभुण करणाऱ्या रेवाला आपल्या बहिणीचा, पूजाचा हेवा वाटायचा. रेवा आणि पूजा दोघी बहिणी. रेवा पूजा पेक्षा दोन वर्षांनी मोठी. पाठोपाठ एका वर्षात दोघींची लग्न झाली. योगायोगाने एकाच शहरात आणि माहेरच्या जवळपास त्यामुळे दोघीजणी आई बाबांकडे लक्ष देत. रेवा नोकरी करायची आणि पूजा हाउसवाईफ. चांगला पगार मिळत असुनही आणि घरी सगळं छान असुनही सतत तक्रारी करणं हा रेवाचा स्वभाव होता. याउलट पूजा शांत संयमी होती. सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे ती हवीहवीशी वाटणारी होती. रेवाला तिचा हेवा वाटण्याचं हे एक कारण होतं.
घर सांभाळून नोकरी करताना रेवाची ओढाताण होत असे. तरीही सणवार, उत्सव, व्रतवैकल्यं आणि उपासतापास यावर ती ठाम होती. हे करून आईवडिलांना बघणं, सासूबाई सासरे सुद्धा तिच्याच कडे होते त्याचंही बघावं लागे मग चिडचिड होणारच,तश्या तिच्या सासुबाई खूप समंजस होत्या पण सगळं परफेक्ट करण्याचा हिचा हट्टी स्वभाव त्या बदलू शकत नव्हत्या. पूजाचा स्वभाव या उलट होता.जेवढं होईल तेवढंच ती मनापासून करायची. नीटनेटकेपणा आणि शांतपणे केल्यामुळे तिचं नकळतपणे सगळ्यांकडून कौतुक व्हायचं. रेवाला हेवा वाटण्याचं हे दुसरं आणि मुख्य कारण होतं. “ती काय घरीच असते आणि घरीही सगळं तिच्या मर्जीनेच चालतं, माझं तसं नाही घरी आणि कामाच्या ठिकाणी सगळी जबाबदारी मलाच घ्यावी लागते.” असं सारखं रेवा सगळ्यांना ऐकवत असे आणि विनाकारण गिल्टी वाटून घेत असे. आईवडिलांनी बरेचदा समजावून सांगितले तरीही ती बदलली नव्हती.
श्रावण महिन्यात नेहमीप्रमाणे पूजा, नैवेद्य इत्यादी सगळं साग्रसंगीत करून घाईघाईत गाडीवरून ऑफिस मध्ये जात असताना एकदिवस रेवाची गाडी स्लिप झाली आणि रेवाला हाताला fracture झाले. आणि महीनाभर घरीच थांबावे लागले. तो नेमका श्रावण महिना म्हणजे हिच्या व्रतवैकल्यं आणि उपासतापासाचा महिना, पण औषधे चालू असताना उपास करायचे नाहीत असं घरच्यांनी ठणकावून सांगितले म्हणून ती शांत होती. एका हाताने होईल तेवढं करून बसून बघणं एवढंच तिला करावं लागत होतं नाईलाज होता ना. घरात तिच्या सासुबाई फार कर्मकांड न करता आणि डायबिटीस असल्याने कोणताही उपास न करता रोजचीच पुजा आणि जमेल तसे नैवेद्यापुरते पुरण घालून सर्व पार पाडत होत्या. खूप देवदेव करत फिरणं आणि खुप वेळ एकाजागी बसून पोथ्या वाचणं त्यांना जमत नसे आणि तो त्यांचा स्वभाव सुद्धा नव्हता. रेवाला काही करताही येत नव्हते आणि त्यांचं पटतही नव्हतं मग घरात बसून कंटाळून रेवा दोन दिवस पूजा कडे आली. इकडे सकाळी लवकर उठून पूजा घरातली सगळी कामं, स्वयंपाक करून मुलांचा अभ्यास त्यांच्या क्लासच्या वेळा सांभाळून वेळ मिळाला की देवपूजा करायची. तिचे सासू सासरे गावाला राहात त्यामुळे सगळं तिलाच बघावं लागे. न राहावून रेवाने विषय काढलाच,” श्रावण महिना सुरू आहे तरी तू फक्त देवपूजा करून मोकळी होतेस आणि तेही वेळ मिळेल तेंव्हा. काय हे??” सगळं आवरून झाल्यावर जरा निवांत वेळेत पूजा रेवाला म्हणाली, “ताई व्रतवैकल्य, सणवार हे मी सुद्धा करते देवधर्म पाळते पण माझ्या पद्धतीने. माझं कुटुंब, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत. आपलं कर्तव्य पूर्ण करणं हेही एक व्रत आहे. सगळ्यांना संतुष्ट करुन खुलभर दूध देवाला वाहणारी आज्जी आपल्या कहाणी मध्ये वाचली आहे मी, मला ती मनापासून भावली. सगळंच परफेक्ट करण्याचा अट्टाहास करून काहीच साध्य होणार नाही हे मला जाणवलं आणि घरच्या गरजा ओळखून मी क्रमवार मांडणी केली आणि जे करायचे ते नीट मनापासून हे ठरवले. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही बनले. चिडचिड नाही आणि मुलांची धुसफूस सुद्धा नाही. त्यामुळे पतिदेव खूष आणि ते खूष मग आम्ही सगळेच खूष . अजून काय हवं.”
रेवाला आता बहिणीचा हेवा नाही तर अभिमान वाटत होता. नकळतपणे ती खुप काही समजली होती.
सौ.मंजिरी जानोरकर.

