मंगळागौर

    ऐंशी वर्षांच्या उमाबाई नातसुनेच्या मंगळागौरीच्या पुजेसाठी वाती वळत होत्या. नाही म्हणायला एवढे एकच काम त्यांच्या वाट्याला आलं होतं. तसं बरोबरच होतं म्हणा, आता या वयात त्यांच्याकडून कोण काय काम करून घेणार होतं. राधाकाकू म्हणजे त्यांच्या सुनबाई, त्यांची लगबग सुरू होती पण किरकोळच कामांची म्हणजे फुले, रांगोळी आणि पुजेची तयारी वैगरे. कारण सगळ्या बाकीच्या गोष्टींचे  कंत्राट (contract) दिले होते. त्यामुळे सगळं कसं सुटसुटीत होतं. छान साड्या, दागिने घालून सगळ्यांना मोकळेपणाने मिरवता येत होतं. प्रियाने म्हणजे उमाबाईंच्या नातसुनेने नऊवारी पैठणी नेसली होती सुंदर दागिने घातले होते आणि त्याचं मोठं कौतुक उमाबाई आणि राधा काकू दोघींनाही वाटत होतं. पूजा सुरू झाली आणि उमाबाईंचे मन भूतकाळात गेलं. त्यांना त्यांची पहिली मंगळागौर आठवली.

       जेमतेम सोळा वर्षांच्या उमाबाई तेंव्हा फक्त उमा होती. कृष्णा काकी उमाच्या सासूबाई, सगळ्या वाड्याच्या कृष्णा काकी होत्या. अतिशय देखण्या अन् प्रेमळ. त्यांनी मोठ्या हौसेने उमाची मंगळागौर केली होती. त्याकाळी चुलीवर स्वयंपाक करावा लागे. आख्खा वाडा जेवायला, मंगळागौर जागवायला आणि मदतीला सुद्धा हजर होता. कृष्णा काकी पहाटे चारला उठून स्वयंपाकघर सारवून कामाला लागल्या. पाच किलोचं नुसतं पुरण लागणार होतं. डाळ शिजत ठेऊन, कणिक मळून ठेवली, भाज्या चिरायला काढून ठेवल्या, चटण्या वाटण्याची, कोशिंबिरी, रायते आणि भाताचे डाळ-तांदूळ धुवून ठेवले. तोपर्यंत वाड्यातल्या बायका आल्या. एकीकडे पुरणपोळ्या करणं चालू होतं, एकजण भाज्या चिरत होती तर दुसरी पाट्यावरवंट्यावर चटण्या वाटत होती. स्वयंपाकघर भरून गेलं होतं आणि बघता बघता हा एवढा स्वयंपाक रांधून सगळं साग्रसंगीत आवरून  सगळ्याजणी पुजेच्या तयारीला लागल्या सुद्धा. उमा लहान सहान कामं करत विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांची लयबद्ध हालचाल बघत होती.                                  आज इतक्या वर्षांनी सुद्धा उमाबाईंच्या आठवणी ताज्या होत्या. त्याला कारणही तसंच होतं. कृष्णा काकींनी सुनेसोबत  आपलं उद्यापन केलं. मंगळागौरीच्या जाग्रणात सुद्धा सगळ्या मुलींच्या बरोबरीने  झिंम्मा, आगोटा-पागोटा, काचकिर्डा,  अनेक प्रकारच्या फुगड्या, पिंगा, खुर्ची का मिरची,गोफ,गाठोडं, बसफुगड्या, सासू सून भांडणं  असे एक ना अनेक खेळ पारंपरिक गाणी म्हणत खेळल्या. त्यानंतर मात्र काही दिवसांत छोट्याशा दुखण्याचं निमित्त होऊन कृष्णा काकी अचानकच गेल्या आणि आख्खा वाडा पोरका झाला. म्हणूनच ती मंगळागौर उमाबाई विसरू शकल्या नव्हत्या. 

     मुलींच्या हसण्याच्या आवाजाने उमाबाई भानावर आल्या. कुठल्याशा मंडळातल्या बायका समोर तेच खेळ खेळत होत्या आणि त्यात राधा आणि प्रिया दोघी सासू सुना सामील झाल्या होत्या. उमाबाई मनोमन सुखावल्या आपल्या सासुबाईंची परंपरा पुढची पिढी चालवणार यांची त्यांना खात्री पटली. नऊवारी पैठणी नेसून खेळणाऱ्या नातसुनेची त्यांनी मनोमन दृष्ट काढली आणि मंगळागौरीला मांगल्याची प्रार्थनाही केली.  

                                        सौ.मंजिरी जानोरकर.