“देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,
तेणे मुक्ती चारी साधियेल्या.”
मुक्ती म्हणजे काय? आणि खरंच देवाच्या दारी क्षणभर उभे राहून ती मिळते का?? हा आध्यात्माचा विषय आहे.
सर्व सामान्य लोकांसाठी मात्र देवाकडून प्रेरणा हवी असते. आपल्या विवंचनांची उत्तरे हवी असतात. प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तर आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी अशा अनेक कारणांमुळे माणूस चिंतांनी ग्रासलेला असतो. ह्या सगळ्या चिंतांपासून मुक्त होणं म्हणजे सामान्यांची मुक्ती. देवाच्या दारी क्षणभर उभे राहून नवीन चैतन्य,उमेद मिळते. म्हणतात ना,”जसा भाव तसा देव.”
श्रद्धा हवी बस. “जो जे वांछिल, तो ते लाभो” अशी विश्व प्रार्थना ज्ञानदेवांनी करून ठेवली आहेच.
स्वार्थ, परमार्थ,आध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी पासून सामान्य माणूस जरी दूर असला तरी कुटुंबाची जबाबदारी, काळजी तो मनापासून घेत आहे. हेही नसे थोडके.
खरंतर आज कुटुंब संस्था फार महत्त्वाची आहे. देव म्हणजेच आनंद, प्रेम आणि प्रेरणा. क्षणभरात माणसाचे मन जाणणारा सखा,बंधू,भ्राता आहे त्याच्या चरणी साऱ्या चिंता अर्पण करून मुक्त होणं म्हणजेच मुक्ती मिळणं.
सौ.मंजिरी जानोरकर

