मनात माझ्या

              “मनाचिये घावावरी मनाची फुंकर.”

माणसाचे मन हे खुप शक्तीशाली असते. फक्त ती ताकद ओळखता यायला हवी.  रामदास स्वामी यांनी हेच प्रभावी मन कसं जाणावं आणि त्याला ताब्यात कसं ठेवावं हे मनाच्या श्लोकात सांगितले आहे, ते कालातीत आहेत.

       मन हा न दिसणारा पण जाणवणार एक महत्त्वाचा भाग आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. हे मन इतकं प्रभावी आहे की ते आपल्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतं आणि तेच मन जिंकता आले तर जगात कुठेही कहिही मिळवता येतं, अशक्य असं काही राहात नाही. मनाला वळण लावणं हि वाटते इतकी सोप्पी गोष्ट नाही पण अशक्य नाही. सकारात्मक विचार, सत्संग, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी मनाला वळण लावायला मदत करतात. अनेकदा मानसीक द्वंद्वात माणूस निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे ताण येतो आणि मनाचे आरोग्य बिघडते. हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडत असतं त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. ह्याच करता सत्संगती हवी योग्य वेळी संवाद साधुन योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. प्रार्थने मुळे संगत चांगली आहे की वाईट हे कळते, इथेही हे मनच आपल्याला मदत करते. कारण मन कधीच खोटं बोलत नाही. “ऐकावे जनाचे करावे मनाचे.” असं उगाच नाही म्हणलेलं.  कोणत्याही प्रसंगी कसं वागावं हे सगळ्यात आधी आपलं मनच आपल्याला सांगत असतं.

          हाच आतला आवाज आपल्याला ऐकता आला पाहिजे.

                         सौ मंजिरी जानोरकर