ऋणानुबंध

           “ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी,

         भेटीत तृष्टता मोठी.”

        खरंतर आपल्या आयुष्यात आपले रक्ताचे नातेवाईक आपण निवडत नाही ते असतात पण मित्र निवडता येतात. ह्या निवडता येणाऱ्या मित्रां शिवाय सुद्धा अनेक जण आपल्या आयुष्यात येतात. काही कामानिमित्त, बाहेरगावी जाताना प्रवासात, रोजच्या जीवनात सुद्धा अनेक कारणांमुळे कितीतरी लोक भेटतात. प्रत्येकाशी आपले संबंध जुळतातच असे नाही. तेवढ्यापुरता संवाद होतो आणि नंतर पुन्हा भेटही होतं नाही पण कधीकधी ह्या छोट्या भेटीत आयुष्य भराचे संबंध जोडले जातात अगदी आपल्याही नकळत. हेच ” ऋणानुबंध”. 

           अगदी नवीन जोडले गेलेली ही नाती सुख-दु:खात साथ देतात आणि आयुष्याचा भाग बनुन राहतात. हे सगळं आपण ठरवतं नाही पण हे घडते मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात. नाती जोडणं टिकवणे आपण म्हणतो आपल्या हातात आहे पण खरंतर कोण आपल्या आयुष्यात कधी येणार आणि किती काळ असणार आहे हे नाही सांगता येत. माणूस अनेक कारणांमुळे दुरावतो. आपण पकडून ठेवु शकत नाही ते आपल्या हातात नाही.  

  हे ऋणानुबंध फक्त मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायचे आणि आयुष्याच्या हळव्या क्षणी आठवायचे.काही कडू काही गोड अनुभव जे त्या लोकांनी, अनुभवांनी दिले आणि आपल्याला समृद्ध केले. हि अनुभवांची शिदोरी बांधून ठेवायची आणि लहानांना गरज वाटली तरच द्यायची कारण त्याच अनुभवांनी आपल्याला शिकवले असतं कि मागितल्या शिवाय काही देऊ नये आणि बोलावल्या शिवाय कुठे जाऊ नये.

                        सौ.मंजिरी जानोरकर