“का चिंता करिसी प्राण्या का चिंता करिसी
नयनी पाणी हृदयी काशी का चिंता करिसी…”
मनुष्य प्राण्याचे दुसरे नावच चिंतातूर जंतू आहे, असे म्हणले तर अतिशयोक्ती होणार नाही. सर्व प्राणीमात्रात मानव हा एकमेव प्राणी विचार करू शकतो हे वरदान आहे तर चिंता करू शकतो हा शाप आहे. कारण विचारांनी प्रगती होते तर चिंता रोग देते. चिंता हीच मुळात माणसाला निष्क्रिय बनवते. अति काळजी तणाव निर्माण करते त्यामुळे विचार खुंटतो आणि काम करण्याची क्षमताही गमावली जाते. रामदास स्वामींनी म्हणल्याप्रमाणे चिंता आणि चिता हे समानार्थी शब्द आहेत, अनुस्वाराचा फरक आहे इतकंच.
चिंते मुळे आलेला ताण हा अनेक व्याधी उत्पन्न करतो. विकारांमुळे दुःख आणि पर्यायाने डोळ्यात अश्रू पण डोळ्यातील अश्रू मोकळे व्हायला लागले की तणाव कमी होण्यास मदत होते. हृदयाची स्पंदने कार्यक्षम होतात, दडपण कमी होते.
माणसाच्या हृदयात परमेश्वर असतो असे म्हणतात. त्याला जागृत केले की सकारात्मक विचारांना चालना मिळते. डोळ्यांतून वाहणाऱ्या गंगाजमूना मन हलकं करतात त्यामुळे मन शुद्ध होते. काशी विश्वेश्वराची गंगा पाप क्षालन करते आणि डोळ्यतली गंगा मनातील पाप, अशुद्ध विचार दूर करते. हे पवित्र मन मग परमेश्वराचे घरं आणि मन मंदिर बनते. “मन चंगा” असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही.
पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.
सौ मंजिरी जानोरकर.

