सावकाराची कहाणी

आटपाट नगर होतं, त्यात सगळ्या अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. जमीनदार तोऱ्यात होते, कष्टकरी, कामगार कामात होते. गरीब ब्राह्मण पुजा पाठ आणि धर्माच्या गोष्टी शिकवत होते. एकूण सगळे आपल्या विश्वात सुखी -समाधानी होते. लोक पापभीरू होते, चांगले -वाईट, पापपुण्य मानत होते, सगेसोयरे जाणत होते. एकमेकांच्या प्रेमात, दुःखात, सुखात आपलं सुखदुःख वाटत होते. जमेल तसं आणि परवडेल इतकं वाटंत होते. थोडक्यात काय तर कासार नगरातील आया बहिणींना लग्न समारंभात बांगड्या भरत, शिंपी कपडे शिवून देत, सोनार दागिने बनवून देत, कुंभार मातीची भांडी पुरवत आणि इतर बरेच जण बरीचशी कामं आपसात करून घेत असत. त्यामुळे नगर स्वयंपूर्ण होतं, सुखासीन जीवन जगत होतं, तर असं हे नगर त्याला एकदा दृष्ट लागली. तीही अशी तशी नाही चांगली बाधा की काय म्हणतात तशी बाधा झाली म्हणा ना. त्याचं झालं असं….

या नगरात एक सावकार राहायला आला. त्याच्या सोबत त्याचं कुटुंब सुद्धा आलं. नगरात राहायला येण्या आधीच त्याच्या राहत्या घरासाठी मोठी जागा बघून मोठा वाडा बांधला गेला होता. तो चौसोपी वाडा त्याच्या वैभवाची कल्पना देत होता. फार पूर्वी म्हणे त्याचे पूर्वज इथे राहायचे. तर तो नगरात राहायला आला आणि येताच त्याने वास्तू शांत करण्याचा घाट घातला. नगरातील सगळ्यांना झाडून आमंत्रण दिली गेली. प्रत्येक सदस्याने जेवायला यायचं आहे हे बजावलं होतं. लोकांना सुद्धा हे सगळं बघण्याची आयती संधीच मिळाली. मग काय उत्साहाला उधाण आलं होतं. एवढा मोठ्ठा वाडा बघायचा तर नवीन कपडे करणं, दागिने बनवून घेणं सुरू झाले. जो तो एकमेकांना आमंत्रण आलं आहे का हे आडून आडून विचारत होता. करता होता तो दिवस उजाडला. वाड्याचे वैभव, तिथल्या वस्तू, कुटुंबातील प्रत्येकाचे कपडे, दागिने, स्वयंपाक घर तिथल्या वस्तू एक ना अनेक सगळंच विलक्षण होतं. नगरातील लोकांना सगळंच नवीन होतं. झुळझुळीत कपडे, चकचकीत वस्तू आणि एकंदरीतच सगळा झगमगाट होता. सावकार सुद्धा सगळं आवर्जून दाखवत होता, प्रत्येक गोष्टीचं भरभरून वर्णन करत होता. सगळ्याचंच खूप अप्रूप होतं. जेवणं झाल्यावर घरी आल्यावर सुद्धा नगरात हा विषय खूप दिवस चर्चिला जाणार होता. एरवी सुद्धा एक एक जण वाट वाकडी करून मुद्दाम वाड्याचे कौतुक पाहाण्यासाठी जात होते. सावकार प्रत्येकाचे स्वागत करत होता. आता हळूहळू नगरात संवाद कमी होऊ लागला होता. घराघरात सावकारासारखी समृद्धी आपल्याकडे असावी असे वाटायला लागले होते. सावकार ही समृद्धी मिळवून देण्यासाठी आपलेपणाने मदत करत होता. हे करताना प्रत्येकाला दुसऱ्या पेक्षा अधिक चांगले मिळवून देण्याचे पटवून देत होता. नगरातील शिंपी, सोनार, कुंभार आता रिकामे राहू लागले. स्टिलच्या भांड्यांची चमक मातीच्या भांड्यात नव्हती, रेशमी, मुलायम कपड्याचा झुळझुळीतपणा नगरातल्या शिंप्याच्या कापडात नव्हता. नगर चकाकू लागले होते. सावकार अधिक समृद्ध होत होता. ही समृद्धी कुठून येते हे कोणालाही सांगायचे नाही हे व्रत होते. आता खोट्याचा सुळसुळाट झाला, कोणी एकमेकांशी खरं बोलेना. हेवेदावे, मत्सर फोफावला. चढाओढ सुरू झाली. पापभीरू वृत्ती कमी झाली. सणासुदीला एकमेकांना आमंत्रण देणं कमी होऊ लागले. गरीब ब्राह्मणाचे पुजा पाठ, धार्मिक कहाण्या थोतांड वाटू लागले. गैरसमज,तेढ निर्माण होऊ लागली. नगरातील वातावरण दुषित झाले. पुर्वीचे सुख समाधान लयाला गेले. आनंद हरपला. सावकाराची मुलं परदेशात शिकायला गेली. नगरातील मुलं आपसात भांडू लागली. घरांत झगमगाट झाला पण नगर उदास भकास वाटू लागले. सावकाराच कोणालाही काही न सांगायचे व्रत सगळे आजही पाळत आहेत. नगरातील नगरवासी एकमेकांना सोडून बाहेरच्या लोकांशी संपर्क साधू लागले आहेत. आपलेपणा जपणारं नगर नगरवासियांनाच परकं झालं आहे. तर अशी ही सावकाराची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण न होता अखंड चालू आहे……