पश्चात्ताप

    “आयुष्य हे क्षणभंगुर असते.” असं म्हणणाऱ्या सविताच्या सासूबाई ८८ वर्ष जगल्या. अर्थातच ते आपल्या हातात नाही आणि वरील वाक्य हे शब्दशः घ्यायचं नसतं. 

         रूक्मिणी काकू म्हणजेच सविताच्या सासूबाई पतीच्या निधनानंतर मुलगा आणि सून यांच्या सोबत  राहात होत्या. विठ्ठलपंत होते तोपर्यंत आपल्या जुन्या घरीच राहाणं त्यांनी पसंत केले होते. तसं जुनं घर मोठं असलं तरी सोयीचे नव्हते. म्हणूनच मग मुलाला ठरवूनच आधीपासून जवळच नवीन घर घेऊन दिलं होतं. तरीही सुधीर सविता स्वतःहून नव्या फ्लॅट मध्ये राहायला गेले नाही. वर्षभर म्हणजे सविताला दिवस राहिपर्यंत सगळे जुन्याच घरी होते.  रूक्मिणी काकू मात्र या बाबतीत फार खूश नव्हत्या. सविताने लवकरात लवकर तिकडे जावे असं त्यांना वाटतं राहायचं. हे माझं घर आहे,माझा संसार आहे अशी जाणीव सतत करून देणं चालू असायचं. तिने इथे काहीही बदल करू नये, सोयी सुविधा करू नये म्हणून त्या काळजी घेत. न जाणो सर्व सोयीचे झाले तर हे दोघं एकत्र राहातील अशी भीती त्यांना वाटत असे. विठ्ठलपंत मात्र फार प्रेमळ होते सगळे एकत्र असणं त्यांना आवडत होतं. यावरूनच त्या दोघांत झालेल्या कुरबुरी सविताने ऐकल्या होत्या तसं ती सुधीरला काही बोलली नाही पण म्हणूनच दिवस राहिल्या नंतर बाळांतपणासाठी आईकडे गेल्यावर तिने वेगळे राहण्याचा आपला निर्णय ठामपणे सांगितला.  आधी सुधीरला पटलं नाही पण हळूहळू तिने वेगळे राहून प्रेम राहील आणि आई बाबांना सुद्धा प्रायव्हसी मिळेल हे पटवून दिले. तरीही सविताने कुटुंब विभक्त केलं हे त्याच्या मनात सलत होतं.  वेगळं राहण्यावर बाबांनी काही प्रतिक्रिया दिली नाही पण नंतर सुधीरला घरातील वातावरण आणि आईच्या वागण्याची कल्पना दिली आणि सवितावर राग धरू नये असं सांगितलं. 

          रूक्मिणी काकू लग्न करून आल्या त्या एकत्र कुटुंबात, सतत मन मारून जगलेल्या. स्वतःला जसं हवं तसं घर त्यांना कधी सजवतात आलं नाही. आत्ता आत्ता कुठे त्या स्वतंत्रपणे जगू लागल्या होत्या आणि काही वर्षांत सून आली म्हणून त्यांचं इनसिक्योर होणं स्वाभाविक होते. सविताने समजून घेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.  आता विठ्ठलपंतांच्या जाण्याने आईला एकटं ठेवणार नाही या सुधीरच्या निर्णयावर मात्र रूक्मिणी काकूंचा नाईलाज झाला. सविता काकूंकडे अगदी प्रेमाने लक्ष देत होती त्यांना पुरेसा मोकळेपणा मिळेल याची काळजी ती घेत होती.  काकूंना मात्र सतत खजील होत होतं, आपण गाजवलेले अधिकार,मारलेले टोमणे अस्वस्थ करत होते. सविता त्या गोष्टी पूर्ण विसरून त्यांच्याशी वागत होती आणि हेच काकूंना जास्त अस्वस्थ करत होतं.  न राहून एक दिवस घरात कोणी नाहीसे पाहून सविता कडे काकूंनी विषय काढला,” माझं चुकलंच ग त्या वेळी मी फार आकस ठेवून वागले तुझ्याशी पण तू कधी काही बोलली नाहीस की वाद घातला नाही, आणि आताही मला वाटलं होतं तू अधीकार गाजवशील  उलट तू दाखवून दिलं की घरात आलेली दुसरी स्त्री ही सून असो की सासू तिला मैत्रिण मानलं पाहिजे.” त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप बोलण्यात जाणवत होता. त्या दिवशी मन मोकळं करून त्या खूप रडल्या अन् बोलल्याही खूप सविताने सगळं शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली,” आई एकदा आपण आपलं घर ,आपली माणसं म्हणून घरात आलो की त्यांना समजून घेण्याची जबाबदारी घेता आली पाहिजे तक्रार नाही तर निवारण केलं पाहिजे असं मला आईनं इथं येण्याआधी सांगितले, ती म्हणाली प्रत्येक माणसाच्या वागण्यामागे भूतकाळातील घटनांचा संबंध असतो तो बदलता येत नाही पण वर्तमान आपण घडवू शकतो, तू वर्तमान घडव आणि आनंद वाट जूनं आठवून वर्तमान बिघडेल असे करू नकोस. मी फक्त तसं करण्याचा प्रयत्न केला बस.”  हे बोलणं झालं आणि काही दिवसांत छोट्याशा दुखण्याचं निमित्त होऊन रूक्मिणी काकू गेल्या.  मधल्या १५ वर्षांच्या काळात त्यांची सवय झाली होती.  रोज देवपूजा करून झाल्यावर त्या म्हणायच्या, “सगळं जग मोहमाया आहे, जीवन हे क्षणभंगुर आहे, मृत्यू हे अंतिम सत्य आहे .” 

       आज अखेर हे सत्य त्यांनी स्विकारले होते.

                                     सौ. मंजिरी जानोरकर.