विस्मृती चे वरदान

        ” भलेबुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे 

           क्षणभर……”

     स्मरणशक्ती चांगली असणं हे तल्लख बुद्धी चे लक्षण आहे. सर्वसाधारणपणे विसराळू माणसाची समाजात चेष्टा होते किंवा निर्बुद्ध समजले जाते. इतिहास तज्ञ बाबासाहेब पुरंदरे वयाच्या  शंभरीतही तारखांसह इतिहासातील दाखले देऊन सांगत असत. हे खरंतर, काय लक्षात ठेवावे आणि का? याचेच उत्तम उदाहरण आहे. आठवायचेच असेल तर,” शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.”  हे शिकण्यासारखे आहे. एरवी माणूस म्हणून जन्माला आल्यापासून अनेक अनावश्यक गोष्टी मेंदूत साठवून ठेवत असतो. याचाच ताण शरीर आणि पर्यायाने मनावर होत जातो. आरोग्याच्या अनेक समस्यांना मूळ कारण हे मनावरील ताण हे असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच विस्मृती हे एक वरदानच आहे हे मान्य करायला हवे. मानवी जीवनात जर  ही विस्मरण प्रक्रिया नसती तर काय झाले असते, ह्याची कल्पनाच केलेली बरी. रोजच्या जीवनात पाहीलेल्या प्रत्येक गोष्टी, कानावर पडणारे सगळेच आवाज, अगदी सगळे गंध-दुर्गंध आणि न जाणो बरंच काही अनिच्छेने लक्षात राहीले असते आणि त्या सगळ्या गोष्टींचा गुंता मनात झाला असता आणि विचार प्रवाह थांबला असता. मानसिक आरोग्य धोक्यात आले असते.

        वास्तविक पाहता विस्मरणात गेलेल्या सगळ्यांच गोष्टी ह्य अनावश्यक किंवा महत्त्वाच्या नसतात असे नाही. व्यक्ती च्या जीवनात बरेचदा बरेच प्रसंग येतात, काही प्रिय- अप्रिय घटना घडतात की ज्यामुळे संपूर्ण जीवन बदलून जाते.  हे प्रसंग, घटना टाळता येणे शक्य नसते. ह्यावर औषध एकच विस्मरण! कालौघात त्यांची पुनःपुन्हा चर्चा टाळून त्या विसरल्या जाण्याची अथवा त्यांची तीव्रता कमी होण्याची वाट पाहाणे. कितीही कठीण वाटत असला तरी दुसरा पर्याय माणसाकडे नसतो.

    हे सगळे दुःखद घटनांच्या बाबतीत झाले पण अति आनंदाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे कारण अत्यानंदाने सुद्धा धक्का बसल्याची बरीच उदाहरणे आहेत. थोडक्यात आनंद किंवा दुःख, प्रिय किंवा अप्रिय घटना, गोष्टी ह्या कालापरत्वे विसरून पुढे जात राहाणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीत फार काळ अडकून पडणे योग्य नाही. सतत सगळा भूतकाळ  Recall करणं हे त्रासदायक असते अगदी सगळ्यांसाठीच. त्याकरताच जाणीवपूर्वक गोष्टी विसरता आल्या पाहिजेत.  म्हणूनच इतिहास शिकावा जरूर पण  तो घडवण्याचे सुद्धा  सामर्थ्य ठेऊनच,  हेच आपल्या संतांनी, सद्गुरूंनी सांगून ठेवलं आहे. म्हणूनच स्मरणशक्ती च्या आशिर्वादा प्रमाणेच विस्मृती चे वरदान सुद्धा गरजेचे आहे. मानवी जीवन प्रगल्भ आणि उन्नत होण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

                                      सौ.मंजिरी जानोरकर.