पाऊस

       “ये रे घना, ये रे घना,

          न्हाऊ घाल माझ्या मना..”

   निसर्गाच्या सहवासात राहून किंबहूना निसर्गाचाच एक भाग असून थेट ढगांना तनमन भिजण्याची विनंती वजा आज्ञा करण्या इतपत माणूस निसर्गाला हक्काचे मानतो. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञान, यंत्र, कंप्युटर च्या विश्वात हरवलेल्या मानवी मनाला आजही ह्या घनांचे बरसणे आकर्षित करते.  पहिल्या पावसात भिजणं, पुराच्या पाण्यात उड्या मारणं, साठलेल्या पाण्यात होड्या सोडणं, छत्री ☔ उलटी करून पाणी भरणं हे असले उद्योग करून आपल्यातील बाल्य जपण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. 

     खूप कामाच्या गडबडीत येऊन धांदल उडवणारा पाऊस निश्चित चिडचिड करतो. कपडे, छत्री, रेनकोट, दप्तर, बॅगा सांभाळत शाळा, ऑफीसला पोहोचणं ही एक कसरत असते. तरीही पाऊस आवडत नाही असे होत नाही.  पहिल्या पावसात येणारा मातीचा गंध मनाला इतका हवाहवासा वाटतो की माणसाने आपल्या विज्ञान आणि कल्पनेने ‘मृद्गंध’ हे अत्तर सुद्धा बनवले आहे.  काळ्या ढगांची वाट फक्त शेतकरी बघतो असे मुळीच नाही.  कडक तापलेल्या उन्हात जमीन जशी पावसाच्या पडण्याची वाट बघते तसाच वर्षभर मरगळ आलेलं मन सुद्धा पावसाची चातकासारखी वाट पाहत असतं. म्हणूनच पावसाळी सहलींचे आयोजन करण्याचा उत्साह सगळ्या पाणवठ्यांवर दिसतो. डोंगरदऱ्यांतून खळखळणारे झरे,भरून वाहणाऱ्या नद्या,नाले सर्वत्रच हिरवळ आणि माणसांची गर्दी फुललेली दिसून येते. 

      तनामना बरोबरच धरती वरच्या प्रत्येकालाच आनंदाने न्हाऊ घालणारा मेघ माणसाच्या कल्पनेतून दूत बनून प्रियजनांना निरोप सुद्धा देतो. पावसाने रूसून जरा ओढ दिली तर संपूर्ण यंत्रणा हवालदिल होते. वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. शेतकरी तर डोळ्यांत प्राण घेऊन वाट बघत असतो. पाणी म्हणजे जीवन हे तेंव्हाच कळते जेव्हा ते कमी मिळते. मुबलक आणि सहज  मिळणाऱ्या गोष्टींची किंमत कळावी म्हणूनच कदाचित पाऊसही अशी लपाछपी करत असावा आणि आमंत्रणाची वाट तो सुद्धा पाहात असावा. म्हणूनच ये रे घना म्हणत त्याचे स्वागत  केले पाहिजे.