“स्वप्नातल्या कळ्यांनो
उमलू नकाच केंव्हा गोडी
अपूर्णतेची लाविल वेड जीवा……”
स्वप्न पाहण्याचा हक्क जरी सगळ्यांना असला तरी स्वप्न कोणते पडेल हे आपल्या हातात नाही. झोपेत पाहिलेली स्वप्न ही पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा नसते आणि ती सुसंबद्ध असतातच असं नाही. जागेपणी स्वप्न जाणीवपूर्वक पाहिली किंवा दाखवली जातात. ती पूर्ण करण्याची जबाबदारी असते.
लहानपणापासूनच,”अंथरुण पाहून पाय पसरावे”
ही म्हण ऐकवली जात असते. म्हणजेच जी स्वप्न पूर्ण करता येतील तीच स्वप्न पाहीली जावीत. अपेक्षा किंवा महत्वाकांक्षा ह्या अवाजवी नसाव्यात उलट त्यातून कार्यक्षमता वाढवण्याचे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
आयुष्य हे फार मोठे आहे अनेक अनोळखी वाटांवरून चालावे लागते. प्रत्येकाची वाट वेगळी, परिस्थिती वेगळी असते तसेच स्वप्नही वेगळी असतात. एखादी गोष्ट एखाद्याला सहज मिळाली तर दुसऱ्या कोणासाठी तरी ती गोष्ट मिळवणं स्वप्नवत असू शकेल. सगळ्यांनाच सगळं मिळतं असं होत नाही. कोणाकडे वस्तू मुबलक असतील पण त्या वापरण्याची क्षमता नसेल. एखाद्याकडे कौशल्य असेल पण उपलब्धता नसेल. ही आयुष्यातील गंमत आहे. प्रत्येक वेळी स्वप्न पूर्णत्वासच गेली पाहिजे हे गरजेचे नाहीच आहे. काही स्वप्नांच्या मागे आयुष्यभर धावत राहाण्यातही जीवनाचे सार्थक आहे. आपण आपल्या गूरूंसारखे बनावे किंवा आपल्या वडिलधाऱ्यां प्रमाणे जगावे अशी स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत झटत राहण्यातच यश आहे.
कोणाकडे काय आहे आणि काय नाही ह्याचा मेळ घालणं आवश्यक आहे.माणूस प्राण्याकडे बुद्धी चे वरदान ह्याचसाठी दिले आहे की माणसाने एकत्र येऊन ह्या सगळ्यांची सांगड घालत मिळून-मिसळून राहावं. एकमेकांच्या स्वप्नांना पंख द्यावेत. भरारी घेऊ पाहाणाऱ्यांना बळ द्यावे. विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि,”एकमेकां सहाय्य करू, अवघें धरूं सुपंथ” ही संतोक्ती सफल करावी.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

