हास्यास्पद

     अगदी हास्यास्पद वाटलं तरी वेड्यासारखं हसणं हे आरोग्यदायी आहे. ताणतणाव दूर करण्याचं सामर्थ्य या वेड्या हसण्यात आहे. ‘लोक काय म्हणतील?’  या भीतीने माणूस आपलं हसणं म्हणजे लहानपणी हसायचा तसं वेड्यासारखं हसणं सोईस्कर विसरला आहे.

      हसणं किती प्रकारचं असतं असं जर कोणाला विचारलं तर मनमोकळेपणाने, खळखळून, गडगडाटी, दिलखुलास, निर्मळ असे आणखी कितीतरी प्रकार ऐकायला मिळतील. वेड्यासारखं हसणं हा सुद्धा एक प्रकार आहे. शाळेत असताना मैत्रिणींच्या घोळक्यात बसून कशावरही आणि कितीही वेळ हसत बसतात ना तसं हसणं म्हणजे वेड्यासारखं हसणं असतं, कॉलेजमध्ये थोडं कमी झालेलं असलं तरी अस्तित्व टिकवून असतं ते हसणं, शरीरापेक्षा मनाला गुदगुल्या होतात तेंव्हा येणारं हसू म्हणजे वेड्यासारखं हसणं. 

     अर्थात हे सगळं आत्ता लिहीण्याचे कारण म्हणजे, हे हसणं मावळत चाललेलं आहे एकुणच अगदी सगळीकडून. सगळेचजण अचानक मोठ्ठे झाले आहेत, पाळण्यातली बाळं सुद्धा. हो जरा कुठे उभं राहता आलं,दादा-बाबा म्हणता यायला लागले की बोबडे बोलण्याची संधी न देता पोएम्स  म्हणायला यावी लागतात.  शाळेत जाण्याच्या वयांत मोठं झाल्यावर काय व्हायचे आहे ते ठरवावं लागतंय.  घोळक्यात बसून रिकाम्या गप्पा मारायला वेळ मिळण्या आधी बऱ्याच जबाबदाऱ्यांची जाणीव मुलामुलींना करून दिली जाते आहे.  मुलांना सुजाण, प्रगल्भ नागरिक म्हणून, यशस्वी श्रीमंत माणूस करण्याच्या धडपडीत गरजेपेक्षा जास्त घाईने  मोठं केलं जातंय.  या मुळेच बालपण जवळपास संपुष्टात आले आहे. ताण तणाव हे शब्द कधी नव्हे ते बालमानसोपचार तज्ञ वारंवार वापरु लागले आहेत. याचे कारण म्हणजे हे वेड्यासारखं हसणं हरवलं आहे. 

        कितीही कोणी काही बाऊ केला ना तरीही चकाट्या पिटणं, घोळक्यात बसून रिकाम्या गप्पा मारणं, उड्या मारत एकमेकांवर विनोद करणं, कोणी पडलं तर फसकन हसणं (जास्त लागलं नसेल तर) , कोण काय म्हणेल याचा विचार न करता येईल तसं नाचणं. हे असं सगळं जे पूर्वी सहज व्हायचं तेच सगळं ताणतणाव व्यवस्थापन करताना करणं आवश्यक आहे हे तज्ञांना सांगावं लागतं आहे ही खरी गंमतीशीर गोष्ट आहे. 

     मोठं होणं हे नैसर्गिक असलं पाहिजे आणि मोठं झाल्यावर सुद्धा आपल्यातील लहान मूल जपता आले पाहिजे.  पुढे आयुष्यात येणारे अनुभव कधी कुठे कसं वागावं हे सगळं शिकवतात आणि मग माणूस मोठा होत जातो आपोआप. चूका करूनच योग्य काय ते कळेल पण त्या करायला मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांना सुद्धा मोकळे सोडले जायला हवे. आधीच उपदेशाचे डोस देऊन ताण वाढवणं हे सगळ्यात आधी पालकच करतात. पाल्याने कधीच कुठेही अपयशी होऊ नये हे वाटणं चुकीचे नाही पण चूका झाल्यानंतर काय करायचे हे ठरवायला “मदत” केली पाहिजे, इथे मदत हा शब्द जास्त महत्वाचा आहे, मदत करावी पालकांनी निर्णय घेऊ नये. वाट बघायला शिकले पाहिजे खरं तर सगळ्यांनीच. लहान मुलं चालायला सुरुवात करतात तेंव्हा  पडतातच आणि सावरतातही, ते जितकं  सहज  स्विकारले  जाते ना तेवढ्याच  क्षमतेने त्याचं बालपण  स्विकारले गेले पाहिजे. बाहेरच्या जगातील  प्रलोभने बघून बाळाला पटापट मोठं करण्याच्या शर्यतीत पालक अडकून पडले आहेत. म्हणूनच की काय माणूस वेड्यासारखं वागणं, हसणं, अगदी  बालपण आणि जगणं सुद्धा विसरलाय. वयाच्या  चाळीशीत हास्य क्लब मध्ये जाऊन प्रौढ झाल्यावर स्वतः चे बालपण शोधत फिरतोय आणि घरात लहान मुलांना मोठं करण्याची घाई करतोय. 

       दिवसभरात एकदा तरी सगळ्यांना लहान  होता आलं पाहिजे आणि खरंखुरं वेड्यासारखं हसले, नाचले बागडे पाहिजे आणि पूर्ण कुटूंबात याचं लोण पसरवता आलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने आनंदी तणाव रहीत जीवन जगता येईल, बाहेर जाऊन बालपण शोधावं लागणार नाही हे निश्चित.

                               सौ मंजिरी जानोरकर