” वरण भात” खाणारी व्यक्ती म्हणजे मुळमुळीत आणि साजुक तुपाचे खाणारी व्यक्ती ज्याला तिखट, मसालेदार आणि प्रामुख्याने नॉनव्हेज चे वावडे असणारी, असा एक मोठा गैरसमज पसरलेला आहे. अजून एक मोठा गैरसमज असा की अशी माणसं अहिंसावादी, शांतता प्रिय असतात. या सगळ्या गोष्टींचा अपवाद म्हणजे स्वतः ‘श्रीकृष्ण’. अर्थात हे सगळं आत्ता लिहीण्याचे कारण म्हणजे या सगळ्या मुळे बदनाम होत असलेला ‘वरण भात’.
श्रीकृष्ण हा एक मोठा आणि वेगळा विषय आहे. शुद्ध आणि शाकाहारी असलेल्या श्रीहरी ने काय काय लीला केल्या आहेत ते सगळेच जण जाणतात. विषय आहे तो वरण भाताचा. मराठमोळ्या जेवणाचा मुख्य मेन्यू असलेला वरण भात हा पूर्ण जेवण आहे. तुरीच्या डाळीचे वरण डाळ गरगटून म्हणजे घोटून हळद,हिंग आणि गुळाचा चिंचोक्या एवढा खडा, चवीनुसार मीठ घालून गरम करून भाताच्या मुदीवर घालून त्यावर तूपाची धार, लिंबाची फोड आणि असेल तर लिंबाचं लोणचं. (अत्यावश्यक नाही) आहाहा, ज्यानं खाल्ले आहे त्यालाच कळेल. बाकी डाळीला फोडणी दिली की ते वरण साधं राहात नाही. रोज दुपारच्या शाळेत जाताना पोटभर वरण भात खाऊन डब्यात पोळी भाजी बस, आईला पाल्याच्या जेवणाची चिंता नसायची दिवसभर. आजही हालका आहार म्हणाल्यावर आधी आठवतो तो वरण भात. आजारपणात तर फक्त वरण भात.
मराठी माणूस कुठेही गेला आणि कितीही पंचपक्वान्न, नॉनव्हेज किंवा कोणत्याही प्रांतातील जेवण अगदी आवडीने खाऊन आला तरी रात्री साधा वरण भात खाणारच. याचंच एक व्हर्जन आहे डाळ खिचडी, नांव बदलून जरा वेगळ्या पद्धतीने केलेला वरण भाताचा प्रकारच तो. लहान मुलांपासून ते तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वच जणांना, दात असणारे किंवा नसणारे सुद्धा अगदी सहजपणे खाऊ शकत असलेला असा पदार्थ. “काही नाही तर निदान वरण भात तरी शिकून घे.” असा प्रेमळ सल्ला लग्नाळू मुलींना आणि परदेशात जाणाऱ्या मुलांना आवर्जून दिला जातो तो म्हणुनच. कमी वेळात, कमी कष्टात आणि मुख्य म्हणजे कमी बजेट मध्ये होणारा असा मराठमोळा वरण भात. ज्याला हिंसा, अहिंसा,व्हेज, नॉनव्हेज, राकट-रांगडेपणा असं कसलही वावडं नाही आणि तरीही मुळमुळीत असा शिक्का मिरवणारा आमचा वरण भात हा पूर्ण अन्न म्हणून मानानं ताटात मधोमध स्वतःचं स्थान टिकवून आहे आणि राहील हे निश्चित.
सौ.मंजिरी जानोरकर.


Good
I read it