रूढी

       दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी||

      अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी||

     नवरात्राच्या निमित्ताने नवदुर्गांचे पुजन, जागरण आणि कुलधर्म इत्यादी गोष्टींचे परंपरेप्रमाणे पालन झाले, म्हणजे तसे ते दरवर्षी होतेच. मागचे वर्ष कोव्हिड मुळे जरा शांततेत गेले तरी घरातल्या घरात सगळ्यांनीच साजरे केले नक्की. 

       कोव्हिडच्या काळात चक्क गुन्हेगारांनी सुद्धा बहुतेक लॉकडाऊन पाळला असावा. कोरोना शिवाय इतर कोणत्याही बातम्या ऐकायलाच मिळाल्या नाहीत. जसं आता हळूहळू सगळं सुरळीत सुरू झालं तसं इतर आजार, घरफोडी, बलात्काराच्या बातम्या सुद्धा एकदमच यायला लागल्या. ह्यावरून नियम सगळ्यांनीच पाळले असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यात खरंतर गुन्हे कमी होणं ही एकमेव जमेची बाजू होती. 

       कुमारीकेला  देवीचे रूप मानुन तीची पुजा केली जाते, अशा समाजात बलात्काराच्या घटनेबद्दल असलेली उदासीनता न पटणारी आहे. रूढार्थाने चालत आलेल्या रूढी परंपरा म्हणून स्त्री देवतांची  पुजा करायची त्यापेक्षाही नवीन परंपरा सुरू करू स्त्री चा आदर केला जावा. 

       गुन्हा घडतो आणि गुन्हेगार पकडले गेले तरी शिक्षा होईपर्यंतचा कालावधी त्या गुन्ह्यांची तीव्रता कमी करतो हे लक्षात घेतले जात नाही. बरेचदा ६-७ वर्षात गुन्हेगार सुटतो पण ती स्त्री मात्र उध्वस्त झालेली असते. तीच्या शरीरा सोबत मन सुद्धा मारलं गेलं असतं. ही एक प्रकारे हत्याच आहे.  पिढ्यानपिढ्या हेच चित्र आहे. काल आणि आजही बलात्कार, स्त्री भ्रूणहत्या, अल्पवयीन मुलींवर अत्याचार अशा घटना घडतच आहेत. कायद्याला न घाबरता हे गुन्हेगार नव्याने पुढे येत आहेत ही खेदाची बाब आहे.

     चांगल्या लोकांकडून संस्कार हस्तांतरित केले जातात तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून दुर्गुण हस्तांतरित होतात. कोणत्याही भयंकर गुन्ह्यात लवकरात लवकर भयाण अशी शिक्षा सुनावली तर पुढे जाऊन कोणी तसे करण्याची हिंमत करणार नाही.

       दुर्दैवाने आपल्याकडे कोर्टात अनेक केसेस पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केल्या जातात, आजार आनुवंशिक असतात, इस्टेट पिढीजात असते. काही जुन्या परंपरा बरोबर  त्यात आता नविन काही परंपरा चालू करायला हव्यात, जसं की मुलींना प्रसंगी देवी दुर्गा रुप धारण करून स्व संरक्षणासाठी तयार करणे, घरोघरी मुलांना स्त्रीयांना मान देण्याचे भान देणे. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून ती एक सक्षम व्यक्ती आहे ह्याचा स्वीकार घरापासून व्हायला हवा. घरातील मुलींना आई, आजी, मावशी यांनी पराक्रमी स्त्रियांच्या कथा ऐकवायला हव्यात. सोशिक आणि सहनशीलता हे सगळे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण कुठे,काय आणि किती सहन करावे हे ठरवून घेतले पाहिजे आणि पुढील पिढीला शिकवायला पाहिजे. स्त्रियांनीच स्वतःची प्रतिमा बदलण्याची गरज आहे. एकटी स्त्री हे करू शकणार नाही पण समाजाचे प्रतिबिंब असलेल्या कुटुंबापासून ती सुरुवात करू शकते.

      स्त्री अन्नपूर्णा, माता त्याच बरोबर दुर्गा सुद्धा असलीच पाहिजे ही काळाची गरज आहे. तीच्या इतर रुपां च्या प्रमाणे आदी शक्तीचे, दुर्गेच्या रुपाचे दर्शन पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी स्त्रियांचीच आहे. 

     प्रत्येक स्त्रीने स्वतःचा आणि इतर स्त्रियांचा मान ठेवून आदर केला तर घरात सगळे त्याचे अनुकरण करतील. मुलींना,सूनांना आईने, सासूने स्त्री म्हणून योग्य तो मान दिला तर स्त्रियांचा आत्मविश्वास वाढेल हे निश्चित. रूढी ह्या घट्ट आणि न बदलता तशाच चालत येतात पण परंपरा लवचिक असतात काळाप्रमाणे बदलता येतात याची जाणीव असली पाहिजे.

                                  सौ.मंजिरी जानोरकर.