“बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.”
बऱ्याच वर्षांपूर्वी टि.व्ही. वर मालिका प्रकार सुरू झाला आणि चांगलाच रुजला. मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक या मालिकांमुळे बरेच प्रभावित झाले. संध्याकाळी दिव लागले की देवाचे म्हणून जेवताना मालिका पाहण्याचा जणू पायंडाच पडला. सहज ओघवते संवाद आणि होणारे चांगले संस्कार ह्यामुळे कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही.
मधल्या काळात मालिकांचे विषय बदलत गेले. सध्याच्या मराठी मालिकांचा ट्रेण्ड जरा बदलला आहे. सास-बहू वरुन पतिपत्नी वर केंद्रीत झालाय, त्यातही स्त्री हेच मुख्य पात्र आहे. गंमत म्हणजे प्रत्येक पतीचे अफेअर आहेच ते पत्नीला समजल्यावर मग ती स्त्री स्वत्वचा शोध वैगरे घेते असा साधारण मसला आहे. सगळ्या मालिकेत हेच चालू आहे असे नाही, काही अपवाद आहेत. घरातील वातावरण चांगले असेल पतिपत्नींचे, मुलांचे संबंध चांगले आहेत अशा घरातील स्त्रिया सुद्धा कर्तृत्ववान असतातच की ? बरेचदा नवरा-बायको दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत होतात. कुटुंबात गृहिणी असलेल्या सर्वच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या पातळीवर यशस्वी असतातच. स्त्रियांनी भक्कम असणं हे दाखवण्यासाठी पुरुष अफेअर करतातच हे दाखवण्याची खरंच गरज आहे का ? घराघरांतून आजी-आजोबा आणि सगळेच एकत्र बसून बघितल्या जाणाऱ्या मालिका तयार करताना हे भान ठेवणे अपेक्षित आहे.
मालिका लांबलचक असण्या ऐवजी दर्जेदार असली पाहिजे. रटाळ वाटेल असे कथानक,भडक संवाद, भरमसाठ दागिने, भरजरी कपडे आणि सतत उपहास, द्वेष, बदला किंवा एखाद्याला उध्वस्त करण्याची कारस्थानं. त्यातच कमी म्हणून प्रेमीयुगुलांचे उछृंखल चाळे. हे बदलायला हवे. अर्थात यातही अपवाद आहेत. पण दुर्दैवाने फार कमी.
तारक मेहता का उलटा चष्मा, वागळे की दुनिया ह्यांसारख्या हिंदी उल्लेखनीय मालिकांच्या तुलनेत ह.म.बने-तू.म.बने सारखी एकमेव मालिका मराठी मध्ये असावी ही खेदाची बाब आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या श्रीयुत गंगाधर टिपरे, ‘प्रपंच’, वादळवाट, ऊन पाऊस, एका लग्नाची गोष्ट आशा मालिका येतंच नाहीत. त्या जरी पुन्हा दाखवल्या तरी कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे आनंदाने बघतील आणि मुलांवरही संस्कार होतील.
मालिकांचे हरवत चाललेलं युग पुन्हा परत येईल.
सौ.मंजिरी जानोरकर.

