मेंदीच्या पानांवर

     “मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग 

           जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलतंय ग…”

   स्त्री अगदी कोणत्याही वयातली असो मेंदी म्हणलं की तिचं मन हळुवार होणार आणि जुन्या आठवणींत अर्थात माहेरच्या आठवणींमध्ये जास्त रमणार. माहेर हा प्रत्येक स्त्री च्या मनातला हळवा कोपरा असतो. त्या कोपऱ्यात ती स्त्री कायमच एक अल्लड,लडीवाळ मुलगी असते. तिचं एक कोरं मन त्या कोपऱ्यात ती जपत असते. 

       मुलींचं बालपण कसं गेलं ह्यावरच ‘ती’ ची जडणघडण झालेली असते. सुरक्षित,प्रेमळ वातावरणाचे संस्कार तिच्या वागण्यात दिसतात. वय वाढत जातं जबाबदारी येत राहाते आणि हळूहळू हा हळवा कोपरा दडपला जायला लागतो अगदी तिच्या सुद्धा नकळत आणि ‘ती’ च्याही कडुन. आपण मोठे आहोत ही जाणीव डोकं वर काढायला लागते. पण ही मेंदी मोठ्ठी जादूगार असते, तिचा नुसता वास सुद्धा ह्या कोपऱ्यात दडलेल्या भावनांना मोकळी वाट करून देतो. हरवलेलं बालपण त्या खेळकर हूड मुलीला पुन्हा यायला भाग पाडते.  

     सण-वार, लग्न,मुंज किंवा इतर कोणत्याही कारणाने काढलेली मेंदी, स्त्री मनापासून  enjoy करतं असते. मेंदी हाताला लागल्यावर होणारा आनंद तिचा चेहेरा खुलवतो. म्हणूनच की काय मेंदी लावल्यावर स्त्री जास्तच सुंदर दिसते. सोळा शृंगारात ह्या मेंदीचा सामावेश त्यामुळेच केलेला असावा.

          आजची स्त्री काहीशी  modern आहे. काही जुन्या चालीरीती ती पाळत नसेलही पण नटणं-मुरडणं हे स्त्री च्या स्वभावात आहे. म्हणूनच नवीन नवीन फॅशन च्या निमित्ताने स्त्रीयांचे नटणे-मुरडणे चालू आहे.  कालची मेंदी सुद्धा आज Tattoo रूपांत मिरवते आहे आणि गंमत म्हणजे पुरूष सुद्धा हौसेने काढून घेत आहेत.

      जुन्या फॅशन कायमच रूप बदलून नव्याने येत असतात. अनुभवानं हे आपल्या पिढीला पटलेलं असतं म्हणून आपणही जुन्याच गोष्टींचा हट्ट धरण्यापेक्षा थोडंस modern झाल्याचं दाखवून आपल्याला हवं तेच आपल्या मुलींकडून करून घेऊ शकतो.  हे गुपित मात्र गुप्त राहीलेलंच बरं.

     

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.

                            सौ.मंजिरी जानोरकर.