“भलेबुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू ह्या वळणावर ह्या वळणावर….”
जगात कोणाचेच कोणाही वाचुन काहीही अडत नाही, असं नसतंच खरंतर पण क्षणभरच असं मानलं तरी प्रत्यक्षात ते तसं असतं नाही. माणूस कितीही स्वावलंबी असण्याचा बहाणा करीत असला तरी कधी ना कधी कोणाची तरी गरज ही लागतेच. पैसा सगळ्या ऐहीक गोष्टी मिळवून देईलही पण् तो सुद्धा हवा ना?
गंमत अशी आहे की माणसाला पैशांपेक्षा माणसाचीच गरज जास्त असते. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत एकट्याच्या हिंमतीने खूप काही करता येतं. हळूहळू मग शरीर थकत जातं पण तारुण्यात गरज नाही म्हणून अनेकांना दुखावलेलं असतं ती मंडळी दुरावली असतात. मनं तुटलेली असतात. तारुण्यात गरज नाही म्हणून आणि नंतर आता कसं बोलाव ह्या संकोचाने आपल्याच माणसांना हाक मारायला,काम सांगायला नको वाटते.
प्रौढपणत आणि नंतरच्या म्हातारपणात एकटेपणाची भीती भेडसावत असते पण तारुण्यात भविष्यातील एकाकीपणा लक्षात येत नाही. नाती जपण्याची, सगेसोयरे अवतीभवती असण्याची खरी आवश्यकता फार उशीरा जाणवते. कधीतरी इतरांकरता काही गोष्टी कराव्या, करूनही घ्याव्या जेणेकरून आपल्याला त्यांची गरज आहे हा निरोप त्याला मिळेल. सगळ्यांना सगळंच येत असतं पण म्हणून मिळूनमिसळून कामं करण्यातही गंमत आहे. नात्यांची बांधणी ह्यातूनच बांधली जाणार आहे. खरंतर म्हणूनच हे सणवार एकत्र येऊन साजरे करावेत अशी पूर्वजांची रचना असावी. जुने लोक जास्त प्रगल्भ होते त्यांनी भविष्यातील संकेत जाणुनच जाणुनबुजून असे केले असणार.
तारुण्यात उमेदी मुळे राग, रुसवे,मान-अपमान हे जटिल चक्र सुरू राहाते आणि दुरावा वाढत जातो. कधीकधी भेटणारे मग कधीतरीच भेटतात. आपली माणसं दुरावण्यासाठी प्रत्येक वेळी फक्त कटू बोलणं हेच जबाबदार असते असे नाही तर आपली देहबोली, नेत्रबोली हेही तितकेच जबाबदार असतात. कोणीही कोणाकडे गेल्यावर त्यांच्या Reactions टिपत असतोच. चेहरा बरंच काही सांगून जातो. येणाऱ्या व्यक्तीचे स्वागत कसे होते हे समजायला वेळ लागत नाही. खाणं-पिणं नंतर सर्वप्रथम हसतमुखाने स्वागत अपेक्षित असते. कितीही जवळची व्यक्ती असली अगदी घरातली तरीही ह्या गोष्टी परिणाम करतात. आपलेपणा, प्रेम, हक्क इथं असणार आहे की नाही हे लगेच जाणवतं. घरातील तत्कालीन वादळं तक्षणी थांबवून आलेल्यांचे स्वागत व्हायला हवे असे आजही घरातले जाणते लोक सांगत असतात.
सणासुदीच्या काळात हेच सगळे विसरून नव्या पिढीला आनंदाचे वाण देण्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना एकत्र आणत असतात आणि आनंदाचा वारसा जपत असतात.
पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

