प्रार्थना

        “हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे,

             माणसाने माणसाशी माणसासम वागणे…”

        सध्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या आणि हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली जात आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण एरवी सुद्धा अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी मदत करणारी बरीच मंडळ, समाजसेवी संस्था आहेत. प्रत्येक गरजुंपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणारे लोक हे गरजूंना देवा समानच आहेत.

       माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकटं राहणं फारसं त्याला आवडत नाही. मित्र, नातलग ह्या गोतावळ्यात तो रमतो. आपण एकत्र सुखांत,आनंदात असताना दुसरीकडे कुठेतरी कोणीतरी दुःखात असेल, रोजच्या गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असेल तर त्यांच्या विषयी सहानुभूतीपूर्वक मदत करणं, मिळवुन देणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

        आपल्या हिंदू संस्कृतीत पूर्वी बलुतेदार पद्धत होती. सगळे सणवार, उत्सव, गावोगाव च्या जत्रा ह्या सगळ्यांची सांगड घालूनच ठरविली होती. समाजव्यवस्थाच तशी होती. जातीपातीच्या पलिकडे जाऊन प्रत्येकाच्या घरात सण, उत्सव साजरे व्हावे हा प्रामाणिक हेतू होता.  हळूहळू कुटुंब दुरावली, शहरात जाऊन वसली. राजकारणाने जातीपातींचे स्तोम माजवले. आपलेपणा हरवला, माणूस एकटा पडू लागला. गावाबाहेर शहरात लोकांमध्ये परकेपणा जाणवू लागला. गरज सांगायला सुद्धा माणूस संकोच करू लागला पण ह्या कोरोनाने माणूस हवालदिल झाला. एकमेकांच्या अडचणी ओळखू लागला. रोजच्या जेवणाची सोय करण्याची सुद्धा जेंव्हा तरतूद करणं कठीण झालं तेंव्हा पुन्हा एकदा माणूस माणसांच्या उपयोगी पडू लागला. आपल्या जवळ जे आहे ते वाटून घेऊ लागला आणि पुन्हा एकदा माणसातला ‘देव’ जागा झाला.  निराधार दुबळ्यांचाही भार उचलण्यासाठी धडपड करू लागला.

      सर्व सामान्य लोकांसाठी गरजेला मदत मिळणं ही खूप महत्त्वाची बाब असते. एरवी सुद्धा ह्याचें भान राहिले पाहिजे. कोणीतरी येईल आणि मिळेल मदत अशी वाट बघत बसण्यापेक्षा स्वतः उभं राहिलं पाहिजे आणि इतरांनाही हात देता आला पाहिजे. स्थळं,काळ, वेळ अगदी वर्णभेद सुद्धा न पाहता गरज जाणता येणं आवश्यक आहे. पशुपक्षी, वन्यप्राणी सुद्धा एकमेकांना अनुकूल असेच आयुष्य जगतात आपण तर बुद्धी जीवी मनुष्य प्राणी आहोत हे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे त्याचे पालन होणे अपेक्षित आहे.

   

पोस्ट आवडली असेल  तर लाईक करा आणि शेअर करा.

                              सौ.मंजिरी जानोरकर.