सुखी माणसाचा सदरा

     ” मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

          काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं!…”

   सुखाच्या कल्पनेने सुद्धा मनाला गुदगुल्या होतात. नेमकं हे सुख कसं, कुठं आणि कधी मिळतं हे मात्र सांगता येत नाही. 

      सुख ही एक महत्वाकांक्षी संकल्पना आहे आणि प्रत्येकजण ते मिळवण्यासाठी धडपडतो आहे. बरेचदा सुख हे ऐहीक असतं तर बरेचदा आर्थिक परिस्थिती वर त्याचे मापदंड ठरवले जातात. ‘सर्व सुखसोयींनी युक्त’ अशी जाहिरात बऱ्याचदा पाहायला, वाचायला मिळते. अर्थात ती कशाची जाहिरात आहे हे बघणे गमतीदार ठरेल. त्या जाहिराती मधील गोष्टींचा सुखाशी जोडलेला संबंध बादरायण नसला म्हणजे झाले. सुख हे सुविधांशी जोडणं हा जाहिरातींचा भाग आहे.

       प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. सुख अनेक प्रकारचे असते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक इत्यादी इत्यादी. कोण व्यक्ती नेमक्या कोणत्या सुखाच्या शोधात आहे? हे कोणीच सांगू शकत नाही ते ज्याचे त्यालाच ठाऊक असते.  मुद्दा हा आहे की सुख मिळवण्यासाठीची धडपड किंवा तो प्रवास हा आनंददायी आहे की नाही. इतरांना दुःख देऊन मिळणारे सुख कितपत आनंद देईल? हा विचार असला पाहिजे. हा वैचारिक दृष्टिकोन असेल तर सुखा पेक्षा समाधान जास्त आनंददायी आहे हे जाणवते.

     एखादे यश मिळवण्याची, एखादे Target पूर्ण करण्याची  स्पर्धा असेल तर अतृप्ती ठेवलीच पाहिजे तरच पूर्ण प्रयत्न केले जातील आणि तसे केल्याचे समाधान मिळेल. स्पर्धा ही खेळाडू वृत्तीने केलेली असली पाहिजे.

     यश अथवा अपयश मिळणं आपल्या हातात नाही पण पूर्ण प्रयत्न केल्याचे समाधान पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल, बदल्याची भावना नाही. हे महत्त्वाचे.

     सुख आणि समाधान ह्यांच्यात जी एक रेखा आहे तीचे भान ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर सुखाच्या मागे धावत राहाणारे दोन्ही पासून दूर जाऊन बसतात. 

     आपल्याच कुटुंबातील लोकांसोबत एकत्रितपणे काही समारंभ साजरे करण्यातही सुख आहे. दुसऱ्याच्या चेहेऱ्यावरचा भाव टिपून तसे वागण्यातही सुख आहे. जिकडे पाहू तिकडे दिसणारे आनंदाचे डोह अनुभवण्यात सुद्धा सुख आहे ते मिळवण्याचे स्कील तुम्हा-आम्हात असायला हवे म्हणजे झाले.  

               हाय काय अन् नाय काय!

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.

                                   सौ.मंजिरी जानोरकर.