डोळे पुसणारं कोणी नसेल
तर रडणं व्यर्थ आहे
रडणारं कोणी नसेल तर
मरणही व्यर्थ आहे.
खूप अर्थपूर्ण अशी ही चारोळी सहजच बरंच काही सांगून जाते. कोणाकडूनही दुखावला गेलेला रडवेल होतो त्यावेळी पाठीवर हात ठेवून डोळे पुसणारं कोणी भेटेल अशी वाट पाहत असतो निदान त्या क्षणाची ती गरज असते. दुःखाचे अनेक डोंगर पार केलेला माणूस सुद्धा ह्याला अपवाद नाही. रात्रीच्या वेळी उशी भिजवली नाही असा माणूस विरळाच पण दुसरे दिवशी सुजलेले डोळे बघून कोणी काही विचारलंच नाही तर होणारं दुःख विलक्षण वेदनादायी असतं. कितीही दाखवलं तरी त्या वेळी एकटं राहणं नको असतं. आपल्या सुखदुःखाची दखल घेणारं आपलं कोणीतरी जवळचं कुटुंबातील कोणी किंवा मित्र,मैत्रीण, अगदी शेजारी, सहकारी कोणीही संवेदना जपणारं माणसाला हवं असतं. कितीही स्ट्राँग असण्याचा आव आणला तरी मन डोळ्यातून बोलतंच. दुःख वाटलं म्हणजे कमी होतं असं बडे-सयाने म्हणतात ते उगीच नाही. यात वाटून घेणारं हवं.
जे दुःखाचं तेच सुखात आणि आनंदाच्या बाबतीत लागू आहे.
बघणारं कोणी नसेल
तर सुंदर असणं व्यर्थ आहे
कौतुक करणारं कोणी नसेल
तर नटणं मुरडण सुद्धा व्यर्थ आहे.
अर्थात कोणत्याही शुभ कार्यक्रमात, प्रसंगात, सणासुदीला उत्साहाने आवरत नाही असा माणूस नसेल. छान दिसणं, नटणं थटणं सगळ्यांना आवडत असतं, “तू छान दिसत आहेस.” हे ऐकण्यासाठी आपण मिरवत असतो पण आपली कोणी दखलच घेतली नाही तर? विरस होणं निश्चित.
लग्नं, मुंज अशा शुभ कार्याची तयारी, खरेदी या गोष्टी एकट्या दुकट्याने करण्यात मजा नाही तिथे गोतावळा हवाच. एकमेकांना विचारत,हसत-चिडवत जी गंमत असते ती अनुभवावी लागते. आनंद वाटल्याने वाढतो. आनंद वाटण्यात कंजूसपणा कसला?? पण बरेचदा सुशिक्षितपणाच्या नावाखाली काही कार्यक्रम आपल्या-आपल्यातच उरकून टाकले जातात. आत्या,मामा-मामी, मावशी,काका काकू अगदी भावंडांना सुद्धा टाळलं जातं. अशीही लोकं असतात हे अनुभवलं आहे. ही माणसं खूप मोठ्या आनंदाला मुकत असतात हेही दुर्दैवाने त्यांना कळत नाही. सुख काय किंवा दुःख काय हे आपल्या लोकांत वाटायचं असतं हेच त्यांना ठाऊक नसतं.
कोणत्याही कलेचं वैभव हे तिच्या प्रदर्शनात आहे. चित्रकला , शिल्पकला ह्यांचे तर आवर्जून प्रदर्शन भरविले जाते. संगीत, नृत्य,नाट्य यांचेही कार्यक्रम केले जातात ते कशासाठी? कारण ते सगळ्यांनी बघावं, त्याचा आनंद सर्वांना मिळावा. कोणतीही कला झाकून ठेवली किंवा लपवली तर त्याला काही अर्थच उरणार नाही. एखादी सुग्रास पाककृती आचार्यांनी बनवली पण ती कोणी खाल्ली नाही किंवा कोणाला दिली नाही तर ती वाया जाणार.
थोडक्यात देण्याचे, शेअरींगचे हे संस्कार सुद्धा आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यायला हवे त्याचं महत्त्व सांगायलाच हवं. त्याकरताच असलेली नाती जपायला आणि नवीन नाती जोडायला हवी. एकत्र, मिळून मिसळून आनंद, दुःख उपभोगायचं हेच खरं कुटुंब आणि सुदृढ समाजाचं, संस्कृतीचे गमक आहे. टि.व्ही. वरच्या एकत्र धमाल करणाऱ्या कुटुंबांचं समर्थन करणाऱ्यांनी घरात हे आचरणात आणायला हवं. तेंव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण समाज एकत्र यायला मदत होईल. आनंद मिळवण्यासाठी तो आधी द्यावा लागतो हे कळेल आणि संवेदना या सहवेदना होतील.
सौ.मंजिरी जानोरकर

