नातं
माणसाशी माणसाचं नातं
कधी रक्ताचं, कधी मैत्रीचं
तर कधी कामापुरतं
माणसाचं माणसाशी नातं |
कामापुरत्या नात्यात
व्यवहारच फार
रक्ताच्या नात्याला
मायेची धार
तर मैत्रीच्या नात्यात
मुक्त संचार
मन जुळतं
ते मैत्रीचं नातं |
जीवनाच्या प्रवासात
रोज कोणी भेटतं
हवं, नको असलं
तरी नवं नातं बनतं
या नात्यांना नाव
मात्र नसतं
दोन क्षणांच्या भेटीत
गोड हास्य फुलतं |
ओळखीच्या चेहऱ्यावर
स्मितहास्य उमटते
अनोळखी चेहऱ्यांची
नजरानजर होते |
नाव, गाव, भाषा
ह्यातलं काहीच
माहित नसतं
ते सारं जाणून
घेण्यात फारसं
स्वारस्यही नसतं |
जीवनाच्या प्रवासात
तेच नातं छान असतं
जे तुटणं टिकवणं
अपेक्षितच नसतं
स्वार्थ परमार्थ
नसतोच मुळी ज्यात
हेच खरं माणसाचं
माणसाशी नातं ||
सौ.मंजिरी जानोरकर

