आपल्या दोन महिन्यांच्या बाळाकडे बघत बसलेली प्रज्ञा विचारांच्या तंद्रीत होती. “काय गं अशी काय बघत बसलीस? ” सासुबाईंच्या प्रश्नाने ती भानावर आली, पण तिच्या स्वरातुन मनातल्या भावना यशोमती बाईंना जाणवल्या. ” आई अजुन किती लहान आहे हे पिल्लू? बाहेर किती अन् काय काय चाललंय याची जाणीव नसते ना? ” बाळांतपणासाठी प्रज्ञा ने रजा मागितली आणि त्यानंतर तीला नोकरी सोडावी लागली होती त्यामुळे ती थोडी काळजीतच होती. तसा परागचा जॉब चांगलाच होता, पॅकेज सुद्धा बरं होतं पण प्रायव्हेट कंपनी म्हणजे सतत टांगती तलवार. ह्या काळजीत प्रज्ञा हरवली होती. काय बरोबर आणि काय चूक या पेक्षा आत्ता हा विचार प्रज्ञा ने करणं योग्य नाही, हे जाणून त्या तिच्या बाजूला बसल्या. ” कसं असतं ना प्रज्ञा बाळाचा जन्म होतो तेंव्हाच आई-वडील म्हणून आपला सुद्धा नव्याने जन्म होतो. आपल्या विचारांची गर्दी, बाहेर असलेली गर्दी, परिस्थिती या सगळ्या गोष्टी अजून त्या जीवाला जाणून घेण्याची गरज नसते. तो जीव निर्लेप असतो, मातीचा गोळा असतो. आईवडलांच छत्र त्याच्यावर असतं. हळूहळू तो जीव आकार घेतो,घडत जातो. प्रत्यक्षात हे सगळं नैसर्गिक असतं पण त्याच्या भोवती असलेलं वातावरण, मिळणारं पोषण, आहार-विहार, विचार या सगळ्या गोष्टी बाळाच्या जडणघडणीत खूप प्रभाव पाडतात. आपण पालक म्हणून ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करायचा आणि ते सुद्धा सकारात्मक राहून. आमच्या सासूबाई म्हणायच्या,” देवानं चोच दिली तोच दाणा देईल.” मला त्याचं ते बोलणं फार आवडायचं नाही तेंव्हा पण खरं सांगू का प्रज्ञा कालपरत्वे मला ते पटत गेलं. पराग चा जन्म झाला तेंव्हा यांना फार कमी पगार होता. मी गृहिणी कमावणारे एकटेच, जेमतेम भागायचं दुसऱ्या मुलाचा विचार सुद्धा मनात येत नव्हता. काही दिवसांनी पगार वाढला जरा बरे दिवस आले. पराग एकटा पडतो आहे असं वाटून आम्ही त्याच्या साठी दुसरा चान्स घेतला आणि प्राची चा जन्म झाला, खाजगी नोकरी, पेन्शन नाही सतत टांगती तलवार डोक्यावर. तरीही आहे त्यात काटकसरीने आणि समाधानाने कसं राहाता येईल, आपल्या मुलांना जे जे उत्तम आहे ते कसं देता येईल याचा विचार करत गेलो आणि त्याचं संस्कारात मुलं घडत गेली. चांगले काय, वाईट काय यातला फरक मुलांना आपोआपच कळंत होता. वेळप्रसंगी तडजोड करायची पण कुठे, कधी आणि कशाची? हे एकदा समजलं ना की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात.” ” प्रज्ञा तू सुद्धा असंच सगळं करावं असं मी नाही म्हणणार, तुमच्या जबाबदाऱ्या, परिस्थिती फार वेगळ्या आहेत. मला याची जाणीव आहे पण भविष्याची चिंता करत असताना आत्ताचा आई होण्यातला आनंद हरवू नकोस. आई होणं एन्जॉय कर. जीवन चालू आहे, होतं आणि राहील पण आयुष्यात काही क्षण पुन्हा येणार नाही. आत्तापसूनच त्या बाहेरच्या आणि विचारांच्या गर्दीत ते क्षण हरवून टाकू नकोस. गर्दी कायम असणार आहे, आपल्याला जपायचंय ते आपलेपण, आनंद आणि शिकवायचंय त्या नवीन जीवाला त्या गर्दीत आपला ठसा उमटवायला. ” आपल्या सासुबाईंचं अनुभवाचं बोलणं ऐकून प्रज्ञा थोडी हळवी झाली आणि एकदम त्यांच्या गळ्यात पडली. तिच्या त्या स्पर्शाने यशोमती बाईंना ती सावरली आहे हे लक्षात आलं आणि प्रज्ञाला दिलासा मिळाला आपलं पिल्लू गर्दीत हरवणार नाही, आपण तसं होऊन देणार नाही याचा.
सौ. मंजिरी जानोरकर.
कथा आवडली तर नक्की शेअर करा.

