मनाचिया घावावरी मनाची फुंकर

          लिखाण करायला सुद्धा आज काही सुचत नव्हते. तशी ईरा काही फार मोठी लेखिका होती असं नाही पण गृहीणी म्हणून घरातल्या प्रत्येकाशी ती कनेक्ट होती, त्यामुळे आपोआपच सगळ्यांना ती छान वाचू शकत होती. प्रत्येकालाच कागदावर व्यक्त होता येत नसतं ते ईराला अगदी सहज जमत असे. म्हणुनच ती लिखाण करू शके. लोकांना तिचं लिखाण आवडतही होतं. तश्या प्रतिक्रियांमधून तीच्या पर्यंत ते पोहोचत होतं. 

         आज मात्र तिला लिहावं असं वाटत नव्हतं. कारण गेल्या काही दिवसांपासून तिचे वाचक कमी झाले आहेत असं तिला जाणवत होतं. अर्थात फक्त म्हणून नाही पण नेहमी काय नवीन विषय मांडणार?  मुलं, कुटुंब, जीवनशैली अगदी शिक्षण पद्धती ह्या सगळ्या विषयांवर चर्चा, लिखाण, मार्गदर्शन सगळीकडेच सतत भडीमार चालू आहे. वाचणारे वाचतात पण खरंच ज्यांनी वाचून आचरणात आणायला हवेत आणि सकारात्मक बदल घडायला हवेत अशी माफक अपेक्षा सुद्धा पूर्ण होत नाही, बरं घरात सुद्धा कोणाला काही कौतुक नाही. तिच्या ब्लॉगची साधी दखलही घेतली जात नाही. अशा वेळी निराशा येणं अपेक्षित होते. 

           ईराला वाचनाची आवड होती. आजकाल वाचन करताना सुद्धा तिला तोचतोचपणा जाणवत होता. खरंच रोजच्या जीवनात नाविन्य शोधणं कठीण असतं. विचारांच्या तंद्रीत असताना दारावरची बेल वाजली आणि ईरा वास्तवात आली,” मॅडम कचरा” अशी आरोळी ठोकत कमलाने तिला भानावर आणले. रोजच्या सरावाने किचनमधून कचरा देताना तीची यंत्रवत झालेली हालचाल तिला जरा वेळानं जाणवली.  लौकिक अर्थाने त्या मानाने आपण खूप सुखी आणि आनंदी जीवन जगतोय असा एक सकारात्मक विचार कमलाला बघून तिच्या मनात येऊन गेला.  

         कमला म्हणजे सोसायटीची वॉचमन, रोज सकाळी लवकर उठून नवऱ्याच्या बरोबरीने गाड्या धुवून सोसायटी मधे इतर कामं करायची. अशा प्रकारे रोज तीच तीच कामं खरंतर आपण सगळेच करत असतो. कोणी ऑफिस मध्ये, बिझनेस काय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कामात फारसा बदल होत नसतोच मुळी. फक्त काम आवडतं असलं की झालं. तरीही कालांतराने प्रत्येकालाच थोडाफार बदल हवाच असतो. हे जरी शक्य नसेल तरी निदान कामाची दखल,  appreciation मिळणं अपेक्षित आहेच की खरंतर माणूस म्हणून तो प्रत्येकाचा अधिकार आहे. असं ईराल मनापासून वाटून गेलं. मोठ्या मोठ्या कंपन्या, ऑफिसेस मध्ये या गोष्टी जाणून बुजून केल्या जातात. त्यामुळे कार्यक्षमता वाढते शिवाय काम करणारा रिफ्रेश होतो. वेगवेगळे सेमिनार आयोजित केले जातात आणि वातावरण आनंदी राहील असे पाहीले जाते. मात्र कमला सारख्या किंबहुना तिच्या सारख्या गृहिणींच्या बाबतीत हा विचार कोणी करताना दिसत नाही.  या विचाराने ईरा अधिकच निराश झाली. थोडा वेळ निराशेत  गेल्यावर मात्र ईरा एका सजग गृहीणी प्रमाणे उठली, निराशा झटकून टाकली आणि सोसायटीमधील बायकांची मिटिंग  बोलावली.  गृहीणींनी  गृहीणींसाठी असा एक उपक्रम सुरू करण्याची कल्पना मांडली. यामध्ये एकत्र  येऊन बायकांनी स्वतःला हवं ते करावं,सुचवावे आणि प्रामुख्याने एकमेकींच्या कर्तृत्वाचे कौतुक करायचे.  ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. महिन्यातील एक दिवस ठरवला आणि ह्यात कमलालाही सामाविष्ट केले. 

“मनाचिया घावावरी,मनाची फुंकर”  या नावाने ईराने लगेचच नवीन आर्टिकल लिहून पोस्ट केले.

                                        सौ.मंजिरी जानोरकर.