संध्या… संध्या, आई बोलवत होती आणि संध्या आले आले म्हणून घाईघाईने हातातील काम संपवत होती. कधी एकदा हा लॅपटॉप बंद करून आईला मदतीला जाते आहे असे संध्याला झाले होते. Graduation संपल्यावर एक वर्षाची internship मिळाली होती आणि घरूनच कामं करायची होती म्हणून संध्या ने अनुभव घेण्यासाठी ती एक्सेप्ट केली होती.
श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला आणि घरी गणपती बाप्पा आले. आता गौरीची तयारी सुरू झाली होती. बाकी सगळी तयारी आईने केली होती आणि गौरींना साड्या नेसवण्याचं संध्याचं सगळ्यात आवडतं काम तिची वाट पाहत होतं. तसं तर आई ते करू शकत नव्हती असं नाही पण संध्याला ते काम मनापासून आवडतं हे आईला माहीत होतं. गौराईला साडी नेसवायला दोन जणी लागताच आणि म्हणूनच आई संध्याला हाका मारत होती. त्यानंतर दागिने घालणं, बांगड्या घालणं अशी अनेक कामं करायची होती. उद्या सकाळी लवकर उठून बाकीची तयारी करून लवकर लवकर गौर बसवायची आणि मग पुढचे तीन दिवस न थकता पार पाडायचे. आईच्या मनात विचारांचे आणि कामाच्या याद्या एकाचवेळी चालू होते. अजून एक दोन वर्षांनी न जाणो संध्या शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडेल आणि ते होत नाही तोपर्यंत लग्न ठरेलच, मग काय होईल माझं. बरं सासरी सुद्धा हे सगळं असलं म्हणजे हिला चांगलंच होईल पण मग मला मात्र तिला बोलावता येणार नाही. या हळव्या विचारांनी डोळ्यात आलेलं पाणी टिपत आई कामाला लागली.
लॅपटॉप बंद करून संध्या आपल्या आवडत्या कामांकरिता पटकन बाहेर आली. पुढचे दोन दिवस तिने आवर्जून सुट्टी टाकली होती. गौरींचे आगमन,पुजन आणि जेवणं तीनही दिवस मजेत गेले.
बघता बघता वर्ष संपलं संध्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेली आणि तिकडेच तिला योग्य जोडीदार मिळाला. सगळं काही उत्तम असल्याने दोन्ही घरांतून नाही म्हणायचा प्रश्नच आला नाही. जेमतेम दोन तीन महिन्यांत लग्न ठरलं आणि झाले सुद्धा. संध्या देशपांडे ची संध्या कारखानीस झाली. आनंदात सणवार साजरे झाले. पुन्हा एकदा श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला. आज आईला कामच सुचत नव्हतं. तशी मागच्या वर्षी संध्या इथे नव्हती शिक्षणासाठी बाहेर होती पण देशपांड्यांची लेकच होती आणि आज याच शहरात आहे पण कारखानीसांची सून आहे. ह्या जाणीवेने आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहात होते, ती आनंदात असल्याचे सुख आणि सासरी गेल्याचं दुःख अश्या संमिश्र भावना अनावर होत होत्या. लेकीला आणि तिच्या सासुबाईंना आमंत्रण दिलं होतं पण संध्याचं येणं गृहीत धरून चालणार नाही हे आई जाणून होती. तसं कारखानीसांकडे घरात गणपती बाप्पा बसतो गौरी नसतात हे माहीत होतं पण सणवार आणि नवीन नवरी या नात्याने तिकडे जबाबदारी घेणं संध्याचं कर्तव्य आहे हे लक्षात येत असुनही नजर मात्र दाराकडे लागली होती. नेहेमीप्रमाणे सगळी तयारी झाली आणि सवयीने साड्या नेसवतान आई थबकली, घशात आलेला हुंदका दाबून तिने साडी उलगडली आणि मागून संध्या ने आईच्या गळ्यात हात घातला, आईला भेटून तिने साडी हातातून काढून घेतली. आई तशीच उभी राहून हे स्वप्न नाही ना याचाच विचार करत राहीली. साडीच्या निऱ्या करत संध्या बोलायला लागली,” अगं आई मी सासुबाईंना आपल्या घरच्या गौरींचे वर्णन सांगितले तर त्या म्हणाल्या कशा, नुसतं कोरडे वर्णन कशाला आपणच जाऊया तुझ्या आईकडे तेवढीच तीला मदत होईल आणि गणपतीची आरती करून आम्ही दोघीही इकडे आलो. पुरुष मंडळी येते दोन दिवस घर आणि गणपतीची पूजा सांभाळणार आहेत असं सासुबाईंनी डिक्लेरच केलं मग काय तीन दिवस सगळ्यांनीच सुट्टी घेतली आहे, आणि जेवायला सगळेचजण इकडे येणार आहेत.” हे ऐकून आईला आनंदाने हुंदका फुटला आणि काही समजायच्या आत विहीण बाईंनी त्यांना कवेत घेतले. आज खऱ्या अर्थाने माहेरवाशीण गौराई घरी आली आहे या विचारात देशपांड्यांच घर आनंदानं भरलं होतं.
सौ.मंजिरी जानोरकर.

