“वैष्णव जन तो तेने कहिये,
जे पीड पराई जाणें रे|”
संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारे, नि:शस्त्र असुनही आपली अशी एक दहशत पसरवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे, भारताचे पितामह,जनक म्हणजे कोण हे सांगण्याची आवश्यकताच नाही. सगळ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा उमटली असणार. आजही तरुणांना गांधीगिरी म्हणून त्यांच्याच तत्वांचा आदर वाटतो असे सगळ्यांचे लाडके बापूजी.
“महात्मा गांधी”
आज महात्मा गांधी जयंती साजरी होत आहे. बापूजी हे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आदर्श आहेत. सत्य, अहिंसा ही त्यांची तत्वे आजही पथदर्शी ठरताहेत. संपूर्ण विश्वाला दिशा दाखवणाऱ्या बापूजींच्या ह्या तत्वांची आज खरी गरज कोणाला असेल तर ती पाकीस्तानात आणि तालिबान ला आहे. दहशतवादाला खतपाणी घालत स्वतः सुद्धा दारिद्र्याच्या खायित जाणारा हा देश एकेकाळी अनेक महात्म्यांचा विरोध पत्करून स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य पचवणं भारत आणि पाकिस्तान दोघांनाही कठीण होते पण गांधीजींच्या विचारसरणी मुळे तसेच लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांसारख्या विचारवंतांनी भारत भूमीला तारले. स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने रूजवले आणि स्वातंत्र्य पचवलंच नाही तर टिकवून ठेवणंही शिकवलं.
याउलट पाकिस्तानला हे स्वातंत्र्य जड गेले, वैचारिक गोंधळ आणि नेतृत्वाचा अभाव. दहशतवादाने याच परिस्थितीचा फायदा घेऊन तिथे आपले हातपाय पसरवले. ज्या दहशतवादी लोकांना पाकिस्तानने पोसले तोच दहशतवाद आता पाकिस्तानला पोखरतो आहे. म्हणूनच तिथे बापूजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. कारण ज्या विश्वाला बापूंनी दिशा दाखवली त्याच विश्व शांती करता हा दहशतवाद समूळ नष्ट व्हायला हवा आहे. दहशतवादि वृत्ती चे मन वळवून सामान्य माणूस घडवणं ही काळाची गरज आहे. हे कठीण कार्य करणे केवळ आणि केवळ महात्मा गांधीच करु शकतील.
तालिबानची परिस्थिती फारशी वेगळी नाही फक्त तिथे ते स्वतःच दहशत पसरवत आहेत. अत्याचारी अटी लादल्या जात आहेत. स्वतःच्या अंमलाखाली सगळ्यांना ठेवून एकहाती सत्ता गाजवण्याची स्वप्नं पाहण्याच्या नादात जुलूम करताहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांच्या समोर उभे राहून सत्याची जाणीव करून देणे हे सुद्धा कठीण काम बापूजी करु शकतील असे मनापासून वाटते.
आजही त्यांच्याच मौलिक विचारांची गरज,आधार आणि विश्वास टिकून आहे, यांतच त्यांचे थोरपण आहे. गांधीजींच्या गांधीगिरीला पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाची आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा सत्याग्रहाची नितांत गरज संपूर्ण जगाला भासणार आहे आणि त्याकरताच बापूजी तुम्ही आम्हाला परत परत हवे असणार आहात.🙏🏻🙏🏻

