“ऋतू हिरवा, ऋतू बरवा,
पाचुचा वनी रुजवा”
प्रकृती नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणामधील बदलांमधून त्या त्या ऋतू च्या आगमनाची चाहूल देत असते. सगळ्या ऋतूंचे वेगवेगळे गंध असतात. वातावरणानुसार ते आपल्यापर्यंत पोचतात. नवरात्र,दसरा, दिवाळी जवळ आली की थोडासा गारवा जाणवू लागतो. खूप गरम होत नाही आणि थंडी सुद्धा वाजत नाही. मनाला प्रफुल्लित करणारा सुखद गारवा हवाहवासा वाटतो. आसपास बुचाची लांब देठाची पांढरीशुभ्र फुलांची झाडे असतील तर मग घरात बसून सुद्धा हा दरवळ आपल्या पर्यंत पोचतोच. त्या नंतर सूरू होते ती कडाक्याची थंडी मग शेकोटीचा,दुलईचा, गोधडीचा वास आणि हा गोधडीचा नुसता वासच नाही तर अनेक आठवणी सुद्धा मनात रुंजी घालायला लागतात. प्रत्येक वासाबरोबरच त्या ऋतूतील काही वस्तूंशी माणसांच्या आठवणी असतातच.
कोकिळा आम्रवृक्षावर बसून वसंताच्या आगमनाची चाहूल देते. वार्षिक परीक्षा संपत आली असते आणि उन्हाळी सुट्टी सुरू होणार ह्या कडे लक्ष लागले असते.
उन्हाळ्यात वातावरण गरम असतान झाडांच्या सावलीचा एक सुंदर थंडाव्याचा गंध असतो जो बहुतेक सगळ्यांनीच अनुभवला असेल. आंबा हा तर फळांचा राजा आईस्क्रीम मध्ये तर फक्त आंब्याची मक्तेदारी. आमरस बहुतेक रोजच्या जेवणात ठरलेला. पापड, कुरडया, सांडगे अशा वाळवणाची लगबग चालू असताना मधेच आलेल्या वळवाच्या पावसाची सर आणि दरवळणारा मृद्गंध म्हणजे तर स्वर्गसुख. मुलांना लागलेल्या सुट्ट्या ह्या सगळ्या गडबडीत भर घालत असतात. आई, मावशी, काकू आणि माहेरी आलेल्या आत्त्या मंडळी, त्यांच्या सोबत जमलेली आत्तेमामे भावंडं सगळ्यांमुळे घराचे गोकूळ झालेलं असतं.
सुट्ट्या संपत येतात वातावरण दमट व्हायला लागते. उन्हं जाऊन ढग जमा होत असतात. आता शाळा सुरू होणार याची थोडी उत्सुकता आणि हुरहूर दोन्ही वाटत असते पोटात एक हालचाल होते. नवीन पुस्तकांचा वास आवडत नाही असा माणूस सापडणे मुश्किल. नवे दप्तर, युनिफॉर्म, वह्या यातली गंमतच वेगळी. नवीन कंपासपेटि तिचा रुबाब निराळाच त्यात साबणाचा किंवा उदबत्ती चा कागद ठेवून सुगंधित करण्याचा खटाटोप सगळेजण करायचे. सुट्टी नंतर शाळेचा पहिल्या दिवसाचा वास, मित्र भेटिची ओढ हे सगळेच अवर्णनीय असते.
वर्ष बदलली, ऋतूही बदलतात,काळ बदलला पण आजही गंधाचा आणि माणसांच्या आठवणींचा हा वारसा हस्तांतरित होत होत आत्ताच्या पिढी पर्यंत अखंड राहिला आहे आणि यापुढेही तो असाच राहिल हे निश्चित. कारण जोपर्यंत माणसाला नाक 👃 आहे आणि मन आहे तोपर्यंत हा आठवणींचा पूल कायमच जोडलेला असेल.
सौ.मंजिरी जानोरकर.

