आज घरी मीताच्या शाळेतील मैत्रिणींची भिशी होती. सगळ्या चाळीशीच्या आणि एकाच गावात सासर -माहेर असल्यामुळे महिन्यातून एकदा भिशी करता आवर्जून भेटणं व्हायचं. भरपूर वेळ एकत्र घालवता यावा म्हणून घरीच भिशी करायची आणि पार्सल मागवायचे हा नियम होता. मीताच्या सासुबाई आज जवळच राहणाऱ्या त्यांच्या मावस बहिणीकडे जाणार होत्या, तसं मीताने त्यांना काही म्हणलं नव्हतं पण त्या स्वतःहून जाते म्हणल्या पण ती गावाला गेल्याचं समजलं आणि त्यांना थांबावे लागले. मीताला त्यांच्या असण्याचा काही प्रोब्लेम नव्हता कारण त्यांचा स्वभाव मोकळा होता. एकमेकांना समजून घेणारा होता. एक वाजेपर्यंत सगळ्याजणी जमल्या मग त्यांची चौकशी करत बोलत बोलत सुमनताई त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या. तसं “तुम्ही थांबलात इथे तरी चालेल आम्हाला” असं मीता म्हणाली सुद्धा पण तुझ्या मैत्रिणींना अवघडल्यासारखे नको वाटायला, भिशी म्हणजे फक्त पैशांची देवाणघेवाण नसते तर एक रिफ्रेशमेंट असते. मन मोकळं करून ताजंतवानं व्हायचं असतं आणि एका वयाच्या सगळ्या असल्या की मध्ये कोणी नसलेलं बरं असं हसून म्हणत त्या आत गेल्या. त्याचं आपण होऊन तिथून जाणं नाही म्हणलं तरी सगळ्यांना पटलं आणि आवडलंही. गप्पांचा विषय रंगात आला तसतसा आवाज वाढू लागला. मधेच हास्याचे फवारे उडत होते तर मधेच हळू आवाजात कुजबुज सुरू होती, काही वेळा आवाजाच्या धीरगंभीर सूरातून विषय गंभीर असल्याचे जाणवत होते. सुमन ताई आवाजांच्या चढउतारा वरून अंदाज लावत होत्या. तसं सगळ ऐकू येत होतं आणि त्यांना फार इंटरेस्ट होता असं नाही पण गंमत वाटत होती. हातातल्या पुस्तकात त्यांचं मन रमत नव्हतं. जुने दिवस आठवून त्या मनाशी हसत मीता ची भिशी चक्क एन्जॉय करत होत्या. जरा बाहेरून नीट ऐकू येईल अशा पद्धतीने सावरून पण कोणाला दिसणार नाही असं आपलं आसन करून घेत त्या ऐकू लागल्या, विषयाचा सूर नवरा असावा. एक मैत्रीण, ” माझा हबी डॉक्टर आहे ना अगं माझी चिडचिड सुरू झाली की म्हणतो रिया तूझं हिमोग्लोबीन तपासून घे मेनोपोझ सुरू झाला आहे तुझा, घ्या म्हणजे स्वतः ची चूक मान्य करणं दूर, माझी समजूत घालणं सोडाच उलट मला पेशंट करून मोकळा हा असला नवरा नको ग बाई. अगं आमचे ध्यान तर वकीली पोइंट काढून चक्क कोर्टात उभं असल्याचा फील देतो. प्रत्येक गोष्टीत पुरावे सादर करावे लागतात. नको रे देवा वकील. हास्यकल्लोळ सुरू असताना मध्येच एक जण म्हणाली अगं आमचे हे प्रोफेसर त्यामुळे प्रत्येक वेळी आदरार्थी संबोधन वापरावे लागते आणि जरा काही खटकले की लेक्चर चालू बोला 😃😃 कंटाळले आहे मी, सगळेजण कारण काढून पळतात मी त्यांच्या तावडीत सापडते 🫠 . तुझे बरे आहे मीता तुझा नवरा बिजनेसमेन आहे. ” आता मीता काय म्हणते याकडे सर्वांचे आणि आत असलेल्या सुमनताईंचे लक्ष लागले. ” थोडावेळ थांबून मीता म्हणाली खरं आहे मिलींद व्यवसाय करतो बराच बेलंस्ड आहे तो, माईंचे म्हणजे सुमन ताईंचे संस्कार आहेत त्याच्यावर. एकटीने सांभाळलं त्यांनी त्याला बाबा लवकर गेले तो लहान असताना म्हणूनच मायलेकरं छान समजून घेतात एकमेकांना, मीता असं म्हणताच सुमनताई जरा भांबावल्या म्हणजे हिला… त्या विचार करत होत्या तोवर मीता म्हणाली, “आणि मला सुद्धा. समोरच्या व्यक्तीचा चेहरा बघून मन जाणणं म्हणजे काय हे या दोघांच्या कडून शिकावं. मी खूप भाग्यवान आहे कारण फक्त चांगला नवरा नाही तर चांगल्या सासुबाई सुद्धा मिळाल्या आहेत मला. हां तसा व्यवसायामुळे वेळ कमी मिळतो त्याला, सगळं शेड्युल डीस्टर्ब होतं बरेचदा मग होते माझीही चिडचिड पण इट्स ओके तो करतो मेनेज सगळं.” डोळ्यातील पाणी टिपत सुमनताई गालातल्या गालात हसल्या आणि मनातल्या मनात त्या जुनं गाणं गुणगुणू लागल्या… असला नवरा नको गं बाई मला असला नवरा नको गं…….

