ही वाट दूर जाते

    “ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा..”

     जन्मापासून माणूस एखाद्या ठिकाणी राहात असतो. बालपण तिथेच जाते. काही घटना,जागा, लोक, आसपासचा परिसर ह्य गोष्टी मनात खोलवर जाऊन बसतात, व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात. पुढे जाऊन शिक्षण, नोकरी किंवा कोणत्याही कारणांमुळे घरं बदलली जातात, आठवणी पुसट होत जातात, लोक विस्मृतीत जातात. हे खूपच स्वाभाविक असते. तरीही काही संदर्भ समोर आले तर ह्या गोष्टी पुन्हा मनाला हळवं बनवतात.

      स्मृती फक्त माणसांशी निगडित असतात असं मुळीच नाही किंबहुना जुन्या जागा मानवी मनाला जास्त जवळच्या वाटतात. आपलं जुनं घर, शाळा आणि त्यावेळी तिथे घालवलेले क्षण आणि सोबत असलेल्या व्यक्ती अशी ही आठवणींची साखळी असते. या आठवणी व्यक्ती परत्वे बदलतात त्यांचे संदर्भ वेगवेगळे असतात. एखादी घटना एका व्यक्ती साठी सुखद अनुभव असेल तर तीच आठवण सोबत असणाऱ्या साठी त्रासदायक असू शकते. म्हणूनच आपण जेंव्हा आठवणी काढतो तेंव्हा त्या ठिकाणी आपण एकटेच असतो. जी आठवण आपल्याला हवीहवीशी वाटते ती इतरांना नको असते. आपण आपल्या परीने सगळ्यांना बरोबर घेऊन आठवणींचा प्रवास करण्यासाठी धडपडत असतो आणि त्याचवेळी लोक आपल्याला टाळत असतात आणि मग ही वाट दूर दूर जायला लागते, आणि आपण अधिकाधिक नोस्टेलजिक होतो. कोणीतरी या प्रवासात आपल्याला भेटेल या अपेक्षेने तळमळत राहातो. 

     कालांतराने निराश होऊन कधीतरी आपण तो प्रवासाचा मार्गच बदलतो आणि पुढे निघून जातो.  काही वर्षांनी अनपेक्षितपणे कोणीतरी त्याच जुन्या वाटेवरून धूळ उडवीत येताना दिसते आणि आपल्याला साद घालते. मन मारून सोडलेली ती वाट पुन्हा धुंडाळावी अशी आपली खरंतर मुळीच इच्छा नसते पण….

 वेडं मन तिथं घेऊन जातच आणि जायलाच हवं कारण कदाचित तिथंच आपल्या मनातला रावा तिथे आपली वाट पाहात थांबला असेल ………

         

                                       सौ.मंजिरी जानोरकर.