प्रिया घरात आली ते जरा तणतणतणच, ” का बोलावले त्यांनी? ही काय पद्धत आहे वागण्याची? मित्र म्हणून बोलावलं होतं की स्वतःच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला?” “हो हो प्रिया जरा शांत हो! मलाही नाही आवडलं त्यांचं वागणं पण तू किती चिडते आहेस? आणि मी म्हणतो की तू हे खूप पर्सनली का घेतेस सोड ना.” प्रत्युष तीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. झालं असं होतं की सीमा आणि सतिश हे प्रिया आणि प्रत्युषचे कॉलेज पासूनचे मित्र आणि आता सतिश प्रत्युषचा सिनियर म्हणून दोघं एकाच ऑफिस मध्ये एकत्र आले होते, अचानकच. दोघांनीही हे समजले तेंव्हा दोघेही आनंदाने भेटले, आपण आधी मित्र आहोत हे विसरायचे नाही हे ठरवूनही टाकले दोघांनी. घरी जाऊन कधी एकदा आपण आपल्या बायकांना हे सांगतोय असे दोघांनीही झाले होते. प्रिया हे ऐकून खूष झाली असली तरी सीमा मात्र मधल्या काळात बदलली होती. श्रीमंत नवऱ्याची पत्नी झाली होती. सतिश मुळातच श्रीमंत आणि स्कोलर होता, सगळीकडेच त्याच्या हुशारीने पुढेही जात होता. भरपूर पगार आणि साहेबी थाट या सगळ्याची सीमाला सवय लागलेली होती. प्रिया आणि प्रत्युषचे सगळं छान सुरळीतपणे सुरू होतं, दोघेही नोकरी करणारे आणि मध्यमवर्गीय कुटुंबातले, नुकताच स्वतःच्या हिमतीवर त्यांनी दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला होता. सीमा आणि सतिश बद्दल ऐकून प्रियाने त्याच आठवड्यात रविवारी दुपारी दोघांना जेवणाचे आमंत्रण दिले. सीमाने परस्पर कारणं देत ते टाळले आणि उलट तुम्हीच दोघं आमच्याकडे या, आमचं घर सुद्धा मोठं आहे हे सांगायला ती विसरली नाही. प्रत्युषने सिनियारिटीचा विषय काढल्यावर सतिशने मैत्रीचा उल्लेख करत त्याला गप्प केलं. रविवारी ठरलेल्या वेळी एक छानसा बुके घेऊन प्रिया आणि प्रत्युष सतिशच्या घरी पोहोचले. अतिशय मोकळेपणाने आणि आनंदाने सतिशने त्यांचे स्वागत केले. सीमा मात्र बराच वेळाने एकदम भारी साडी, दागिने घालून मानभावीपणाने जरा मुरकतच बेडरूममधून बाहेर आली. तीच्या या दिखाऊपणा बद्दल सतिशने चेहऱ्यावर नाराजी व्यक्त केली त्याकडे दुर्लक्ष करत सीमा समोर जाऊन बसली. मैत्रीच्या हक्काने प्रिया तिला म्हणालीही हे काय! एवढं आवरून स्वयंपाक केलास तू? आणि आपल्यामध्ये कशाला हवी इतकी formality? साधा ड्रेस चालला असता ना?? पण सीमाने ठसक्यात तिला आमच्याकडे स्वयंपाकी आहे आणि बाकी आवरायला भरपूर नोकर हे ऐकवलं आणि प्रिया एकदमच गप्प झाली. एवढ्यावरच न थांबता सीमाने त्यांनी फक्त बुके आणला साधं गिफ्ट सुद्धा आणलं नाही, सिनियर्स ना भेटायला रिकाम्या हाताने जात नाही हेही ऐकवलं. संपूर्ण जेवण संपेपर्यंत नवीन वस्तू दाखवत आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्याची संधी तीने एकदाही सोडली नाही. शिवाय जेवणात भरपूर पदार्थ तर होतेच पण इटालियन सूप, भरमसाठ स्विट्स शिवाय भाज्यांचे प्रकार, रोटी,नान एक ना अनेक. घरातल्या वस्तूंबरोबर जेवणही अंगावर येत होतं दोघांच्या. सतिश या सगळ्या प्रकारात अवघडून गेला आहे हे जाणवत होतं. कसंबसं जेवण संपवून कधी घरी जातोय असं वाटत होतं. घरात पोचताच प्रियाची चिडचिड सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी सगळं विसरून दोघेही कामाला लागले आणि हा विषय विसरून गेले.
ऑफिस मध्ये प्रत्युष सतिशला होता होईल तितके टाळत होता, अगदी गरजेपुरते बोलून कामं चालू होती. ऑफिसमध्ये दोघांनाही हा ऑकवर्डनेस अस्वस्थ करत होता. न राहवून एक दिवस सतिश प्रत्युषच्या केबिनमध्ये आला आणि उद्या रविवार असल्याने मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे तू प्रियाला साधा स्वयंपाक करायला सांग, अगदी साधा. असं म्हणून काही बोलायच्या आत निघून गेला. प्रियाने जरा अनिच्छेनेच वरणभात, भाजी पोळी, आणि खीर करून ठेवले. बरोबर बाराला सतिश एकटाच हजर झाला हातात एक मोठे गिफ्ट घेऊन, ते पाहताच हे मुद्दाम आपल्याला खिजवायला आणले आहे असं वाटून प्रिया काही बोलणार त्या आधीच सतिशने हे मी नाही सीमाने दिले आहे असं म्हणत हक्काने घरात शिरला आणि सोफ्यावर बसला. काहीच घडले नाही अशा थाटात त्याने जुन्या गप्पांना सुरुवात केली. आधी जरा अवघडलेल्या वातावरणात त्यामुळे जरा शिथिलता आली. हळूहळू प्रिया आणि प्रत्युष सुद्धा मोकळे झाले. गप्पांचा फड रंगला, थोड्या वेळाने,” आता बाबा मला भूक लागली.” म्हणत सतिश टेबलावर जाऊन बसला आणि सरळ तिघांची ताटं वाढायला लागला. मी वाढते ना असे म्हणत प्रिया मधे आली पण तिचं काही चालले नाही. जेवणाची तारीफ करत सतिश मनसोक्त जेवत होता अगदी आपल्या हाताने वाढून घेत. जेवण झाल्यावर, “मित्रा आज खरं पोट भरलं, तू येऊन गेल्यापासून मी नीट जेवलोच नव्हतो रे.” असं म्हणून समाधानाने हसत तू खरा श्रीमंत आहेस असं सांगून डोळ्यातले अश्रू लपवत सतिश पटकन बाहेर पडला.
सौ.मंजिरी जानोरकर

