गेले काही दिवस मीराच्या मनात विचारांचे कल्लोळ उठले होते, “माझं जगून झालंय” हो खरंच. आई म्हणून, पत्नी म्हणून,सून म्हणून, माझी कर्तव्य कदाचित कधीच संपणार नाहीत. नाही म्हणायला सासू होणं तेवढं बाकी आहे. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आयुष्याची ४६ वर्ष संपली. लौकिक अर्थाने हे काही मरायचं वैगरे वय नाही आणि मी खूप दुःखी आहे, निराशेने ग्रस्त आहे असंही मुळीच नाही. मग मी जगून झालंय असं का म्हणते आहे हा प्रश्न मला का पडला आहे?? माझ्या घरातील मंडळी स्वावलंबी झाली आहेत आपल्या आवडत्या विषयात बिझी आहेत. नवरा त्याच्या कामात आणि उरलेला वेळ फोन अर्थात मोबाईल मध्ये बिझी आहे. रिकामी फक्त मी आहे. मीरा चे विचार चक्र सुरू होतं.
मीराचं माहेर लांब त्यामुळे मैत्रीणी इथे फार कमी आणि ज्या आहेत त्या त्यांच्या विश्वात रमलेल्या. तिला मोबाईल मध्ये राहाणं, टिव्ही बघत लोळणं फारसं आवडत नाही. एकटीनेच फिरायला जायचं असा विचार मीराने कधी केलाच नाही, आता तो विचार करावा असेही तीला वाटत नाही कारण सोबतीची असलेली सवय. लहानपणापासून कुठेही काहीही काम करायला किंवा फिरायला जाताना सोबत कोणाला तरी ठेवण्याची सवय आता मोडणं अशक्य आहे. वेळच जात नाही असेही नाही मीराचं घर पुरेसं मोठं आहे, गच्चीवर बाग आहे दिवसभर काम पुरतं मग ??
खरंतर मीरा सारख्या प्रत्येक कर्तृत्ववान गृहीणीची मुलं मोठी झाल्यावर हीच परिस्थिती असते. मुलं नवरा कामासाठी बाहेर पडले की कामं सोडून विचार चक्र सुरू होतात.
“सगळंच चांगलं असताना हिला काय प्रोब्लेम आहे?” असा विचार करायची गरज आहे असं निश्चितच वाटणं अयोग्य नाही. खरंतर मीरा च नाही तर प्रत्येक मैत्रिणीच्या घराची आणि मनाची हीच परिस्थिती असणार. “नवीन छंद जोपास,जे आहेत ते इंप्रोवाईज कर, रिकाम्या वेळात काही तरी नवीन शीक, वाचन कर, नाहीतर ओनलाइन काही तुझ्या आवडीचं काम शोध, क्लासेस सुरू कर.” असे एक ना अनेक सल्ले आई, नवरा, सासू अगदी मैत्रीणी पर्यंत सगळेचजण देतात पण खरंतर ‘तीला’ यातलं काहीही करावं असं वाटतंच नसतं, म्हणजे काही जमणारच नाही असं नाही पण तिचं मन त्यात लागत नाहीये. चिडचिडेपणा वाढतो एकटेपणा नकोसा वाटतो आणि काही करायचीही इच्छा नाही, मग नेमकं हवंय तरी काय या फेज मधल्या स्त्रियांना?? तीला अटेंन्शन हवंय, तीची दखल घेतली जायला हवी आहे. शब्दांनी, कृतीतून मी हवीहवीशी वाटते हे तिला जाणवून द्यायला हवे आहे. माझ्या मध्ये अजून सगळ्यांना इंटरेस्ट आहे हे तिला कळायला हवंय. नवरा म्हणून नाही तर एक जवळचा मित्र म्हणून ती त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत असते. मुलाचं, मुलीचं विश्व वेगळं झालेलं असतं. अशा वेळी इतर मैत्रीणींपेक्षा तिला पती सोबत वेळ घालवायचा असतो मग ते भांडणं असेल, खरेदी असेल किंवा नुसते फिरायला जाणं, कधीतरी दोघांनी मिळून काही करणं असेल. पण तसं होत नाही.
आपण नेहमीच आपल्या माणसाला विशेषतः स्त्रियांना गृहीत धरतो ती च अस्तित्व घरात फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी उरतं. आईला, बायकोला काय येताजाता थँक्यू अन् सॉरी म्हणायचं. तीच्या अपेक्षा, आवडीनिवडी लक्षात घेतल्या जात नाहीत त्यात सो कॉल्ड मेनोपोझ मुळे हीची चिडचिड आता वाढणारच आहे हे अगाध ज्ञान सगळीकडे मिळतच असतं. ते सगळे खोटे नाही पण गंमत म्हणजे ते ही गृहीत धरले जाते आणि दुर्लक्ष केले जाते अगदी सगळ्या जणांकडून अगदी घरातल्या स्त्री वर्गाकडून सुद्धा. “सगळं तर हीच्या म्हणण्यानुसार चालू आहे तरी तोंड वाकडंच हीचं” बरेचदा हा दृष्टिकोन सगळ्यांचा असतो. मन मोकळा संवाद साधणं, समोर बसून तीचं सगळं म्हणणं ऐकून घेणं मग ती चिडचिड असो किंवा फ्रस्ट्रेशन. स्त्री ला हक्काचा श्रोता हवा असतो नाकी वैतागून घरातून बाहेर जाणारा, समोर येणं टाळणारा टिपिकल नवरा. राग, प्रेम चिडचिड या सगळ्या भावना शांतपणे वाहू देणारा तीला मोकळं होऊ देणारा एक मित्र, हो कारण ती तिचं मैत्रीणींचं विश्व सुद्धा त्या अपेक्षित असलेल्या मित्रासाठी मागं टाकून आलेली असते. ती नवरा नाही तर तो मित्र शोधत असते त्याच्यात. समजून घेणं म्हणजे काय हेही नकळलेल्या त्या नवऱ्याला कधी तरी हे समजेल अशी वेडी आशा प्रत्येक गृहीणीची असते. म्हणून असेल कदाचित ती आपल्या मुलाला तसं घडवण्याचा प्रयत्न करीत असते किमान माझ्या सुनेला तरी, “माझं जगून झालंय.” असं म्हणावं लागू नये ही एक अपेक्षा…..
सौ.मंजिरी जानोरकर

