मिलिंद आजकाल सगळ्या छोट्यामोठ्या कार्यक्रमात सहभागी होतो, असं जवळपास सगळ्याच नातलगांनी आणि मित्रांनी ओबझर्व्ह केलं होतं. मिलिंद तसा रिझर्व्ह आणि शिष्ट म्हणून परिचित होता. हुशार,देखणा, भरपूर पगार, छान मुलं या सगळ्या गोष्टींमुळे जास्तच attitude दाखवायचा. कोणत्याही आणि कोणाच्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहाणं हा त्याचाच एक भाग होता. त्याची पत्नी मीता मात्र आवर्जून यायची,सगळ्यांशी बोलायची नवरा बिझी आहे म्हणून सांभाळून घ्यायची. मीताला मात्र मनापासून मिलिंदने सुद्धा यायला हवं होतं असं वाटायचं. मिलिंद मात्र मी फोनवरून शुभेच्छा देईन, तसेही मेसेज आला आहे फोन नाही अशी कारणं द्यायचा. “नुसतं जेवणासाठी काय जायचं?” असं त्याला वाटायचं. म्हणूनच एवढ्यात त्याचं सगळ्यांना भेटणं लक्षात येत होतं. खरंतर त्याला कारणही तसंच घडलं होतं. गेल्या वर्षी मिलिंद मीता च्या लग्नाचा २५ वा वाढदिवस दोन्ही मुलांनी हौसेने साजरा केला होता. दोघांच्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना बोलवून सरप्राइज दिलं होतं पण… मीताच्या जवळपास सगळ्या मैत्रिणी आणि नातलग आवर्जून आले होते आणि मिलिंदचे अगदी घरचे सोडून कोणीच आलं नव्हतं. जे आले होते ते सगळे सुद्धा मीता आणि मुलांशी संवाद साधत होते. नाही म्हणलं तरी मिलिंदाला ही गोष्ट जाणवली होती. दिवसभर त्यानं तसं दाखवलं नाही तरी तो नाराज आहे हे मीताच्या लक्षात आलंच. तो स्वतःहून बोलत नाही तोवर शांत राहायचं असं ठरवून मीता विषय निघायची वाट बघत होती. अपेक्षेप्रमाणे रात्री मिलिंदने, “एवढं बोलवून सुद्धा कोणी आलं नाही.” असं बोलून दाखवलं. त्याचा अंदाज घेत मीताने त्याचं कोणत्याही कार्यक्रमाला न जाणं कोणालाही न भेटणं यामुळेच त्याच्या आनंदात कोणी सहभागी झाले नव्हते, हे सांगितले. आपलं नेमकं काय चुकलं हे आता मिलिंदला लक्षात आलं आणि हा बदल झाला होता.
आजकाल खरंतर दुःखात, मृत्यू समयी स्मशानात, आजारपणात दवाखान्यात जाऊन भेटतात फोर्मेलिटी म्हणून का होईना पण लोक जातात पटलं नाही तरी हे सत्य आहे, आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहाण्यासाठी मात्र मानपान आडवा येतो, ” ते आपल्याला बोलवंत नाहीत, अमुक तमुक व्यक्तीनं फोन केला नाही, watsapp वरच आमंत्रण दिले इत्यादी इत्यादी अशी कारणं देऊन जावं की नाही असा विचार करत बसतो आणि आनंदाची देवाणघेवाण टाळतो. गिफ्ट,आहेर याही पुढे जाऊन उपस्थिती ही जास्त गरजेची असते. सुख असो किंवा दुःख दोन्ही प्रसंगी आपल्या माणसांमुळे आधार वाटतो ती जवळ असावीत असं वाटतंच. भेटिगाठी , गेट टुगेदर या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जग जवळ येतं. मोबाईल ही सोय आहे ओप्शन नाही हे समजायला हवं. पंजाबी लोक या बाबतीत फार सजग आहेत. मराठी सुशिक्षित कुटुंब थोडी मागे पडली आहेत. चित्रपटातील एन्जॉय बघून समाधान व्यक्त करत बसण्यापेक्षा तसे ते अमलात आणले पाहिजे. छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून रिलेशन्स मेन्टेन करायला हवे.
कोणतंही नातं टिकवण्यासाठी त्यावर काम करावं लागतं. नात्यांमध्ये शिरावं लागतं. टाळी एका हाताने वाजत नाही. कोणी केवळ खाण्यासाठी येत नाही ते एक निमित्त असते भेटण्यासाठी. हे कळलं तर बरीच कुटुंबे एकत्र राहातील खऱ्या अर्थाने समारंभ साजरे होतील.

