ते आले नाहीत म्हणून ……….

मीना नुकतीच आते बहिणीच्या लग्नाला जाऊन आली होती आणि साडी, दागिने आवरत होती. मनाने मात्र अजून ती तिथेच होती. सगळे माहेर भेटल्याने ती अगदी आनंदात होती. भेटलेल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा आठवत होती. सगळे भेटले पण काकू नाही, नेहमी प्रमाणे संदेश आणि सुगंधा मात्र आले होते. काकूची आठवण आली आणि ती विचारात हरवली, “माझी काकू गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याही कार्यक्रमाला गेली असल्याचे किंवा नातेवाईकांच्या लग्नकार्यात भेटल्याचे मला तरी आठवत नाही. तिला भेटायला तिच्या घरी जावं लागतं. गंमत म्हणजे तिने अजून माझेच काय पण माझ्या आत्त्यांची घरं सुद्धा एकदा किंवा फारतर दोन वेळा पाहिली असतील.” विचारांच्या तंद्रीत मीना, काकू या विषयावर कधी आली हे तिलाच कळलं नाही. खरंच काय कारण असावे काकूच्या या वागण्यामागे ? तिच्या न असण्याची चर्चा मात्र सगळ्या कार्यक्रमांत होत असे. बरेचदा काका एकटे किंवा संदेश आणि सुगंधा म्हणजे मीनाची चुलत भाऊ आणि वहिनी मात्र आवर्जून उपस्थित असत. अगदी सुगंधा एकटी तरी उभ्या उभ्या तरी येऊन जायचीच. काही वर्षांनंतर काकू कधी येत नाही हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलं आणि कोणी विचारेनासे झाले. याला अपवाद मीनाचा, ती सुगंधा जवळ जाऊन आवर्जून चौकशी करायची मग रात्री काकूचा फोन यायचा, ” मला सुगंधाने सांगितले की तू चौकशी केली ते. बरं वाटलं हो, आताशा कोणाला काही फरक सुद्धा पडत नाही मी नाही दिसले तरी.” “तसं काही नाही गं सगळे गडबडीत होते ना?” असं म्हणून वेळ मारून न्यायची. या सगळ्यात तिच्या न येण्याचं कारण विचारणं राहूनच गेलं. आता तर काय कुठे बाहेर पडण्यासाठी परिस्थिती पण नाही. वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी सुरू असतात. तरीही आज आपण या गोष्टीचा छडा लावायचा आणि कारण विचारायचच असं मनाशी पक्के करून तिने काकूला फोन लावला. काय म्हणतेस, कशी आहेस वैगरे चौकशी करून तिने थेट मुद्द्याला हात घातला. ” काकू बरेच दिवसांपासून नाही, खरंतर बरेच वर्षांपासून एक विचारायचं होतं पण हिंमत होत नव्हती, म्हणजे तू रागावशील म्हणून नाही पण माहित नाही का ते! आज मात्र मी तुला विचारणारच आहे.” अशी मोर्चेबांधणी करत मीनाने सुरवात केली, ” काकू अगदी खरं खरं सांगशील तू इतक्या वर्षात कधीच कोणाच्याही कार्यक्रमाला येण्याचं कायमच टाळत आलीस, काहीतरी फालतू कारण पुढे करत राहिलीस. हो ना पण का? असं का केलंस तू? बाकी बाहेर तिर्थक्षेत्र, मंदिर अगदी सगळीकडे जायचीस की मग फक्त नातलग टाळलेस का असं का? ” ” हो हो अगं मीना श्वास घे. मला माहित होतं कधीतरी हा प्रश्न मला तुच विचारशील. बाकी कोणाला फरक पडला किंवा नाही तरी मला प्रश्न विचारण्याची गरज वाटली नसतीच नाही तरी.” एक दीर्घ श्वास घेऊन काकूने बोलायला सुरुवात केली, ” संदेश माझा एकुलता एक मुलगा तुला तर माहीतच आहे. मला लग्नानंतर जवळपास पाच सहा वर्षांनी दिवस राहिले म्हणून सासुबाईंनी डोहाळजेवण मोठं करायचा घाट घातला. सासर माहेर सगळीकडे आमंत्रणं गेली दोन्हीकडील मिळून चाळीस ते पन्नासजणी नक्की येणार हे गृहीत धरलं होतं कारण दोन्ही कुटुंबे मोठी होती. चुलत,मावस, आत्ते-मामे शिवाय जवळच्या मैत्रिणींना सुद्धा आग्रहाने बोलावलं होतं. प्रत्यक्षात मात्र दोन्ही मिळून पंधरावीस जण सख्खे हजर झाले. इकडून तिकडून न येण्याची जी कारण कळली ती फार काही मनावर घेण्यासारखी नव्हती. त्या वेळी नसेल जमलं म्हणून बारसं ठरवलं तरी तीच परिस्थिती बरं मुंज ठरवली तेंव्हाही तेच. किरकोळ आजारपणं नाही तर महत्वाची कामे ती कोणती असायची हे त्यांनाच ठाऊक पण प्रत्येकच वेळी, सगळ्यांना एकाच वेळी न येण्याची नेमकी कारणं कशी मिळाली. तू म्हणशील म्हणून सांगते पाच वर्षे मी एकटी सुटसुटीत अजून मुलाबाळांचे लचांड नाही म्हणून सगळ्यांच्या सगळ्या कार्यक्रमांत मी आणि तुझे काका आवर्जून पाठवले जायचे. मीही मिरवायला मिळते आणि नवऱ्या बरोबर फिरायला मिळे म्हणून कौतुकाने जायची हो पण तिथे मी आले या पेक्षा, ” अजून काही खबरबात नाही का??” हे असले प्रश्न. इतकं करूनही माझ्या कोणत्याही कार्यक्रमाला कोणी कौतुकाने आलं नाही हे माझ्या मनाला लागलं इतकं की या पुढे मी कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही हे ठरवून टाकले. आता तुला हे जरा बालिश वाटेल, फार काही विशेष नाही त्यात असं सुद्धा वाटेल. तुझ्या दृष्टीने ते योग्य असेलही पण मी मात्र दुखावले गेले होते आणि विशेष म्हणजे त्या बद्दल कधीच कोणी काही बोललं नाही की दिलगिरी व्यक्त केली नाही. आपल्या सुखदुःखाची, आनंदाची गोडी आपल्या लोकांत वाटण्यात आणि वाटून घेण्यात असते नाही का?? मी तिथे नाही याची चर्चा सुद्धा मनाला सुखद वाटते, माझी दखल घेतली म्हणून. कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आमंत्रणं दिली जातात ती तुम्ही यावं म्हणून ना? कारणं काय गं कायमच असतात वेळ, प्रसंग आणि आपलं तिथे असण्याचे महत्त्व जाणले पाहिजे. कारण या गोष्टी समोरचा माणूस कधीही विसरत नाही आणि दुखावला जातो हे ज्याला कळतं तोच आपला, जशी तू मला.” काकू नुसतंच बोलतं नव्हती तर मोकळी होत होती कधीपासून चिघळलेली आणि इतरांना किरकोळ वाटणारी तीची दुखरी नस आज भळाभळा वाहात होती असं मीनाला जाणवलं. ” मीना मी जे केलं ते चूक की बरोबर हे मला माहित नाही पण सुगंधाला मात्र मी आवर्जून जिथे आमंत्रण असेल तिथे काही वेळासाठी तरी जायलाच लावते. कारण आल्यागेल्या शिवाय नाती कळणार नाहीत आणि टिकणारही नाहीत हे तुम्हाला कळायला हवं. तुही हा नियम कटाक्षाने जप आणि इतरांना सांग.” फोन ठेवताना काकूने मला हे बजावले.

समाज समाज म्हणजे तरी काय ना?? समाज भान जपलं पाहिजे म्हणजे काय?? एकत्र येणं सुखदुःख वाटणं, आनंदात दुःखात सहभागी होणं हेच अजून काय. ही फक्त काळाची गरज नाही तर प्रत्येक माणसाच्या मनाची भूक आहे, गरज आहे हे काकूशी बोलून मला जाणवलं. कधीच कोणाला न कळणारे घाव माणसाच्या मनात कायमचे राहतात. लक्षात राहतं ते फक्त इतकंच की ते आले नाहीत म्हणून…….

सौ.मंजिरी जानोरकर.