रानफुल

तो चंद्र होता आणि ती रानफुल. रानफुलाने चंद्रावर प्रेम करायचं नसतं हे कळण्याचं वयही नव्हतं तेंव्हापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती. आपलं प्रेम त्याला समजतंय की नाही हा विचार सुद्धा तिने कधी केलाच नाही.
    त्याला चंद्र म्हणण्याचं कारण सुद्धा तसेच होते, तो खूप उंचावर होता आणि खरंच पंधरा  दिवसांनी एकदा कधीतरी दिसायचा आणि ती खूप खाली अगदी जमीनीवर राहायची म्हणून रानफुल.  ही  आईबरोबर चाळीत राहायची आणि तो बंगल्यात एका  उच्चभ्रू  कुटुंबात. आईबरोबर ती त्याच्या घरी शनिवारी आणि रविवारी पोळ्या करायला मदतीला म्हणून जायची. त्याची आई तिच्याशी फार प्रेमाने वागायची. लहानपणापासून त्याच्या वस्तू तिला वापरायला मिळायच्या. आवर्जून चांगल्या आणि पुन्हा वापरता येतील याची काळजी घेऊन वापरलेल्या. त्या वस्तू पिशवीत भरून ती घरी आणायची आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो मैदानात आवर्जून तिची वाट पाहत उभा असायचा हातात दुसरी पिशवी घेऊन. दोघांमध्ये फक्त पिशवीची देवाणघेवाण होत असे. मोकळं बोलणं कधीच नाही. दोघंही रोज मैदानावर खेळायला जात एवढेच काय ते साम्य. तो मुलांमध्ये आणि ती मुलींमध्ये खेळे.  त्याने दिलेली पिशवी घरी आणून त्यात काय आहे हे बघण्यात तिला फारसे स्वारस्य नसे कारण सकाळी मिळालेल्याच वस्तू पण नव्याकोऱ्या त्यात असत. “सकाळी दिलेले वापरू नकोस ते जुने आहे मी वापरलेलं हे घे नवीन आहे.” हे  एकच वाक्य तो बोलत असे आणि खेळायला जाई. का कोण जाणे पण त्याला त्याने वापरलेल्या वस्तू तिने वापरणं बहुतेक आवडत नव्हते. तो ही पिशवी आईसमोर न देता इथे आणून देतो यात नकळण्यासारखं काही नव्हतं.  तिला मात्र त्याच्या वापरलेल्या वस्तू वापरायला मनापासून आवडत होतं. याला त्याचा स्पर्श झाला आहे ही कल्पना तिला मोहरून टाकत असे. घरी आणलेल्या त्याच्या त्या वस्तूंवर ती तासंतास हात फिरवत बसायची, त्याला येणार वास घेत राहायची. हे सगळं तिच्या पुरतं होतं. कोणाला सांगणार होती आणि कोणाला समजलं असतं तिचं हे अव्यक्त प्रेम जे तिलाही पुरतं उमजलं नव्हतं.
   दिवस सरत होते वर्ष पुढे जात होती. मोठा असलेला चंद्र आता खरोखर मोठा झाला होता. वडिलांचा व्यवसाय होताच त्यातच पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो परदेशात गेला होता. ही सुद्धा हुशार होती स्वतःच्या हुशारीने स्कोलरशीप मिळवत M.A करत होती. तिची आई अजूनही त्यांच्याकडे पोळ्या करायला जात होती. चांगले लोक आहेत आपल्याला वेळेला मदत केली आहे, या कृतज्ञतेच्या भावनेतून आई त्यांचे काम करत होती तशी आता आर्थिक गरज फारशी उरली नव्हती पण त्याच्या आईला आताशा जरा बरं वाटत नव्हतं म्हणून तीची आई तिथे जात होती. चंद्र आणि रानफुलाची भेट आता होत नव्हती पण आईकडून त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तिला कळत होत्या, वरवर ती फार उत्सुकता दाखवत नसली तरी मनापासून ऐकायला आवडत होतं. आपल्या मनातल्या चंद्राविषयीची तीची ओढ आता तिच्या प्रमाणेच तारुण्यसुलभ भावनेतून वाढली असल्याचे तिच्या लक्षात आले होते पण या भावनांना आवर घातला पाहिजे म्हणून ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. बोलून चालून तो चंद्र आणि मी रानफुल आहे हे तीला विसरून चालणार नव्हते. काळाप्रमाणे विचार कितीही पुढारलेले असले तरी लग्न या विषयावर आर्थिक आणि सामाजिक तफावत लक्षात घेतली जाते हे सत्य आहे. तसेही रानफुलाच्या भावना एकतर्फी असण्याची शक्यता दाट होती किंबहुना आहेच हेही तितकेच महत्त्वाचे होते.” खरच हे एकतर्फी प्रेम असेल? पण मग एकमेकांच्या डोळ्यात दिसणारी ती ओढ! फक्त वाट बघण्यापुरती सिमीत होती की त्यापेक्षा काही वेगळी??” निवांत क्षणी चिमुटभर होणारी भेट आणि ती नजरानजर आठवून रानफुल विचारात हरवून जात होतं.” का?का? कधीच काहीच बोलू शकलो नाही आपण? निदान ही घुसमट तरी टळली असती.” 
      तिकडे चंद्र सुद्धा विचारात हरवून गेला होता.” कसं आणि कधी बोलणार होतो मी? कधी भेटणार होतो तरी बरं अजूनही काकू पोळ्यांना येतात नाही तर एवढ्या मोठ्या  जगात दुरावायला कितीसा वेळ लागला असता?”  ” कसलं  हे प्रेम एकमेकांच नावही ठाऊक नाही आणि ते विचारण्याची कधी हिंमतही झाली नाही असलं? पण ‘रानफुलच’ म्हणेन मी कायम तिला..पण कसं? तिला काय वाटतंय? की काहीच नाही हे तरी कसं कळेल??” ” मला तिच्या डोळ्यात दिसणारी ती ओढ खरी की खोटी??”  चंद्र आणि रानफुलाची दोघांच्याही नकळत चालणारी ही तगमग एकमेकांना मात्र माहीत नव्हती. हे कोडं नियतीच उलगडणार होती तिच्या पद्धतीने.
    शिक्षण पूर्ण करून चंद्र म्हणजेच नील दोन  दिवसांत भारतात परत येतोय हे आईकडून रानफुलाला म्हणजेच काव्याला समजले आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली तिचे कशातच लक्ष लागेनासे झाले आणि त्यातच आईने तिला त्याच्या आईचा निरोप दिला की दोन चार दिवस जरा मदतीला ये म्हणून. आता तर तिच्या अंगातले त्राण गळून पडले, “कसं शक्य आहे मी त्याच्या समोर जाणं?? इतक्या वर्षांनी भेटल्यावर कसं आणि काय बोलणार?? कसा दिसत असेल ओळखेल का आणि नाही ओळखलं तर पुन्हा वाईट वाटणार त्या पेक्षा नकोच ना ” असा विचार करून ती आईवर जवळजवळ ओरडलीच,” काहीही काय गं आई आता मी लहान का आहे मदतीला यायला?? तू सरळ नाही सांगायचं ना.”  काव्या! वहिनींना आताशा बरं नसतं आणि आपले संबंध जुने आहेत म्हणून तुला हक्काने बोलावलय आणि मला नाही म्हणता येणार नाही तू येऊन काय ते सांग. असं म्हणून आईने विषय संपवला. नाईलाजाने काव्या दुसरे दिवशी सकाळी आईबरोबर तिकडे गेली बरेच वर्षांनी ती त्याच्या घरी येत होती. खरंतर काहीतरी कारण सांगून मी येणार नाही असं सांगायचं तिच्या मनात होतं पण किती मोठी झालीस गं आता काकूंची अठवण येत नाही वाटतं तुला असं म्हणून काकूंनी तिला त्याचीच खोली आवरण्यासाठी पाठवलं. आज प्रथमच ती चंद्राच्या खोलीत आली. नील, तिला त्याचं नाव माहीत होतं, पुसतकांवर असायचं म्हणून पण ती मात्र त्याला चंद्रच म्हणायची त्यापेक्षा समजायची कारण हाक मारण्याचा प्रसंग कधी आलाच नव्हता. त्या खोलीतला वास मात्र तिला ओळखीचा वाटला त्याच्या वस्तूंना यायचा अगदी तोच वास, तिने मन भरून श्वास घेतला आणि कामाला लागली. टेबलावर त्याचा आत्ताचा फोटो दिसला, हातात घेऊन तो न्याहाळला. काही बदलला नाही हा अगदी तसाच दिसतो अजूनही असा विचार करून फोटो ठेऊन ती टेबल आवरू लागली. टेबल आणि इतर पसारा आवरत असताना काकू आत आल्या आणि चल हातोहात कपाटही आवरून टाकू असं म्हणून कपाट उघडून आवरायला लागल्या. कपाट उघडले आणि तिला एकाचवेळी हवाहवासा वाटणारा आणि अस्वस्थ करणारा  तो गंध अधिकच प्रकर्षांने जाणवला. स्वतःला सावरत ती मदत करत राहीली. उद्या नील सकाळीच येणार होता त्यामुळे उद्या इथे काही झाले तरी यायचं नाही हे ठरवून ती खोली  बाहेर जाण्यासाठी  वळली तेवढ्यात एक वही तिच्या पायावर पडली ती उचलून ठेवताना ती खूप जुनी असल्याचं तिला जाणवलं. सगळं नवकोरं सामान आणि ही जुनी वही तिने सहज उघडली, “रानफुल” या शब्दाने सुरू होणारी एक कविता दिसली,
           ” निःशब्द, अव्यक्त भावना माझी
              तिला कळेल का
               प्रेम वेडे डोळे माझे कधी ती
                  वाचेल का
                 रानफुल ते बागे मधले
                  हृदयात माझ्या फुलेल का…..”
  “काव्या!” आईच्या हाकेला ओ देत हातातील वही टाकून ती बाहेर धावली. शब्द मात्र मनात घोळत राहीले.
   “आई मी उद्या येणार नाही नील असेल तिथे” कविता वाचून अधिकच अस्वस्थ झालेली काव्या म्हणाली. त्यावर आईने काही प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी आई एकटीच गेली. थोड्या वेळात काकूंचा फोन आला. काही कारण सांगून तिने टाळाटाळ केली.
    पोळ्या करायला काकू आलेल्या पाहून नील स्वयंपाक घरात पाणी पिण्यासाठी आला उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ,” तुमची मुलगी काय करते आता?” चौकशी करू लागला. काकू काही बोलणार इतक्यात आईने अरे मुलगी काय काव्या नाव आहे तिचं विसरलास का? म्हणाल्या. आज प्रथमच ती चं नाव त्याला कळत होतं. “आरे चांगली M.A करते आहे स्कोलरशीपवर हुशार आहे, एवढी शिकतेय पण तरी मला मदतीला आली काल फार आधार वाटला मला तिचा पण आज जमणार नाही म्हणाली. काय झालं कोण जाणे. तुझी खोली काल तिनच आवरली.” आईने असं म्हणताच गादीवर पडलेली वही आठवली त्याला, म्हणजे तिने ती वही बाप रे..
पण काय कळणार तिला तिचं नाव थोडच लिहलंय मी, मलाच आत्ता कळतंय. असा विचार करून तो शांत झाला. चंद्र आणि रानफुलाची भेट अजून झाली नव्हती म्हणजे तारुण्यात पदार्पण केल्यापासून तरीही भावनिक ओढ टिकून होती उलट वाढली होती. काहीतरी कारण काढून तिला घरी बोलवावं असं नील ला वाटत होतं पण कसं ते समजत नव्हते.  परदेशातून रानफुलासाठी आणलेल्या काही वस्तू तिला द्यायच्या होत्या आणि डोळ्यातला भाव शब्दात मांडायचा होता. काकूंच्या पोळ्या झाल्यावर एक पिशवी त्याने काकूंना आई मार्फत दिली. सवयीने घरात आणून त्यांनी  ती ठेवली. काव्याचे लक्ष पिशवीकडे गेले आणि उगीच त्याचं संध्याकाळी मैदानात वाट पाहत उभे राहाणे आठवले आणि मनातच तिने स्वतःला त्या विचारांपासून परावृत्त केले. पिशवीत तसं फारसं काही नव्हतं म्हणून तिने आईला विचारले पिशवी कोणी दिली आणि का? काकूंनी दिली म्हणल्यावर तिने उघडून पाहिले तर त्यात काही नव्हतं मग ती मी चुकून उचलली असेल तिथे दुसरी पिशवी होती तिच्या ऐवजी, नील ने काही तरी आणलं आपल्यासाठी असं काहीतरी वहीनी म्हणाल्या पण मी गडबडीत विसरले. आईच्या उत्तराने काव्या अजून बेचैन झाली. संध्याकाळी काही तरी कारण काढून ती मैदानावर आली. सोबत मैत्रिण होती पण तिची नजर त्याला शोधत होती. का कोण जाणे पण तो येईल असे तिला मनापासून वाटत होते. न जाणो ते रानफुल म्हणजे मी असेन असं तिला कविता वाचल्यापासून वाटत होतं. खूप उशीर झाला आणि निराश होऊन ती  निघाली इतक्यात गाडी पार्क करून उतरताना तो चंद्र दिसला, रानफुल अधिकच मोहरलं, शहारलं त्याच्या येण्यानं बऱ्याच गोष्टी लक्षात येत होत्या. ती तिथेच थांबली असेल हे गृहीत धरून तो तिच्या दिशेने आला. “हाय काव्या!”  म्हणत त्याने हात पुढे केला. हसून तिनेही प्रतिसाद दिला. काही क्षण शांततेत गेले.” तू इकडे कसा?” असं काहीतरी  बोलायचं म्हणून तिने विचारालं. “तुलाच भेटायला” त्याने सरळ उत्तर दिलं. ती “म्हणजे?”   ” खरंच म्हणजे तुला माहीत होतं ना मी तुला इथे बोलवलं आहे हे?”  त्याच्या थेट प्रश्नावर मात्र ती गोंधळली. “अगं म्हणजे आईने सकाळी पिशवी दिली की मी नाही का तुला संध्याकाळी दुसरी पिशवी द्यायचो.”  या उत्तराने मात्र तिचा चेहरा उतरला म्हणजे आजही मी त्या नवीन वस्तू घेण्यासाठी आले आहे असं वाटलं का याला छे मी यायला नको होतं. तिच्या मनातील गोंधळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. तो मात्र तिच्या त्या चेहेऱ्याकडे मिश्किल नजरेने बघत होता. तिला रडू फुटणारच होते तेवढ्यात तोच म्हणाला रिकामी पिशवी पाठवली नसती तर तू इथे कशी आली असतीस आणि मी तुझ्यासाठी जे आणलं होतं ते तुला मी कसं देणार होतो?  आता तर तिला काही कळेना. त्याने त्या पिशवीतून एक फ्रेम अलगद बाहेर काढली त्यावर सुंदर अशी रानफुले काढली होती. ती फ्रेम तिच्या हातात देताना त्याने तिचा हात हातात घेऊन ,
” रानफुल हे आतातरी माझ्याशी बोलेल का??
निःशब्द, अव्यक्त भावना माझी
आजतरी त्याला कळेल का??”
या शब्दांनी लाजून चूर झालेली ती भानावर येत म्हणाली,” आणि आपल्या घरी??”
हतानेच तिला धीर देत तो म्हणाला माझ्या घरी आईला मी सगळं सांगूनच इकडे आलो आहे आणि मला आनंदाने परवानगी मिळाली आहे. म्हणून उशीर झाला मला यायला आणि हे रानफुल सुकून परत जात होतं.
  चंद्र आणि रानफुलाची ही प्रेम कथा फुलली आणि बहरली सुद्धा आता ते चंद्र आणि रानफुल नाही तर काव्यनील झाले होते.

                                                     सौ.मंजिरी जानोरकर