समर्थ

सई एक अवखळ सहा सात वर्षांची पोर, रोज गंगा घाटावर आई सोबत धुणे धुण्यासाठी यायची आणि सवंगड्यासोबत खेळत असायची. कधी पाण्यात तर कधी मातीत आणि कधीतरी आईच्या भोवती घुटमळत राहायची. तिचा आणि तिच्या आई बरोबर असणाऱ्या सगळ्याच बायकांचा हा दिनक्रम ठरलेला होता. यात लक्षणीय असा काही बदल तिला कळायला लागलं तेंव्हापासून तरी झालेला नव्हता पण आताशा काही दिवसांपासून एक कोणीतरी मुलगा रोज पाण्यात एका पायावर उभा राहून दोन्ही हात वर जोडलेल्या स्थितीत दिसायचा. सुर्य माथ्यावर आला की त्याची समाधी उतरे मग तो पाण्यातून बाहेर येऊन टेकाडावरील घळीत जाई. “कोणाचं बाई लेकरु असेल? आपल्या लेकरांच्या वयाचच दिसतंय, गावातलं नाही वाटंत पण. कुठून आला आहे आणि हे काय करतोय काय कळत नाही. इथून निघतो आणि सरळ रामाचं दर्शन घेऊन पाच घरी भिक्षा मागून खातो म्हणे.” अशा चर्चा सुरू होत्या. ज्यांनी पाहिले ते सांगत होते आणि प्रत्येक जण आपापल्या परीने बोलत होते. सई आणि तिचे सवंगडी रोज त्याचं निरीक्षण करत असत. त्याची प्रत्येक हालचाल दुरूनच बघणं हा जणू नवा खेळ मिळाला होता मुलांना. आपल्या एवढाच हा मुलगा पाण्यात एका पायावर कसा उभा राहतो हा प्रश्न त्या बालसुलभ मनाला पडत असे. त्याच्या मागून मग ही चिमणी सेना तसा प्रयत्न करून बघे, पाय घसरून पडत असे आणि नाही जमत म्हणून एकमेकांची थट्टा मस्करी करत पुन्हा पाण्यात खेळणं सुरू ठेवे. बघता बघता दोन वर्ष झाली सई दहा वर्षांची झाली आता अवखळपणा थोडा कमी झाला आणि आईला मदत करणं सुरू झालं पण त्याचा दिनक्रम मात्र तोच होता. आता त्याला बऱ्यापैकी सगळेजण ओळखू लागले होते. भिक्षा मागण्या बरोबरच तो जुने ग्रंथ नवीन करून देतो ( हस्तलिखित स्वरूपात) समजले होते. गावातील लोक आनंदाने त्याला भिक्षा अर्पण करत होती. इकडे सईच्या घरी सईच्या लग्नाचे वेध लागले होते. लवकरच सईचे लग्न झाले, जवळच्याच गावात एका सुयोग्य कुटुंबात तिचा विवाह झाला. लग्न होऊन जेमतेम तीन एक वर्ष झाली आणि कसल्याशा आजाराचे निमित्त होऊन तीचा नवरा वयाच्या पंधराव्या वर्षी गेला. सई तेराव्या वर्षी विधवा झाली, आभाळ कोसळले. पायगुण चांगला नाही म्हणून सहा महिन्यांत तिला माहेरी पाठवून दिले. इथेही काही कौतुक झाले नाहीच पण इथे आई होती म्हणून किमान माणुसकी होती. घरात चुलीपुढे तिचा दिवस जात असे. घरकाम आणि चार भिंतीत ती दिवस ढकलत होती. आई प्रेमाने जवळ घेऊन मुक्त रडू द्यायची आणि स्वतः सुद्धा रडायची. पण हाय रे दुर्दैव वर्षभरात दुःखाने आई सुद्धा गेली. वडीलांनी दुसरे लग्न केले आणि मग तर हिला कुणीच वाली उरला नाही. कष्ट कष्ट आणि फक्त कष्टच हिच्या पदरी पडले त्यात पोटभर अन्न सुद्धा मिळेनासे झाले. वर्ष सरत होती घरात पाळणा हालला, हीला भावंड आली, त्या बाल लीला बघत ती त्यांना वाढवत होती. तेवढाच विरंगुळा मिळत होता. एक दिवस सई बाळाला खेळवीत असताना बघुन तीची एक मैत्रिण जी माहेरवाशीण म्हणून आली होती ती तिच्या जवळ येऊन चौकशी करू लागली. प्रेमळ शब्दांनी दुःखाची खपली निघाली आणि भळभळती जखम डोळ्यातून अश्रु रूपाने ओघळली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्या गंगेवरच्या मुलाची आठवण झाली. सई गावात असुनही गावातल्या घडामोडी बद्दल अनभिज्ञ होती. तिच्या मैत्रिणी कडून समजले की त्याला आता सगळेजण रामदास या नावाने ओळखतात आणि बारा वर्षे इथे राहून तो आता देशाटनाला गेला आहे. देशाटन म्हणजे काय हे काही उमगले नाही पण तो आत्ता गावात नाही इतकेच समजले. जाताना मी परत येईन असं सांगून गेला आहे हे ही कळले.

या गोष्टीला सुद्धा बरीच वर्षे लोटली. सईचा दिनक्रम मात्र तोच होता पण आता वडील नव्हते आणि आई जी तिच्या पेक्षा लहान होती ती सुद्धा तिच्या सोबत सुनेच्या ताब्यात असलेली एक मोलकरीण होती. दोन्ही मुले बायकोच्या तालावर नाचत होती. एक दिवस दुपारी दारासमोर हाळी आली,” जय जय रघुवीर समर्थ”. अचानक आलेल्या आवाजाने सई उठून बाहेर आली, “भिक्षा वाढा माई” हातात झोळी घेऊन शुभ्र वस्त्रात एक साधारण तिच्याच वयाचा योगी उभा होता. भराभरा हात पुसत सई भिक्षा घेऊन आली हा तोच मुलगा आहे हे तिने ओळखले पण नेहमी प्रमाणे काही बोलण्याची हिंमत झाली नाही. समर्थांनी मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव जाणले.

” मना मानसीं दुःख आणू नको रे| मना सर्वथा शोक चिंता नको रे|| विवेके देहे बुद्धी सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी||

हा श्लोक खणखणीत आवाजात म्हणला. ते ऐकून तिचं उसने अवसान गळून पडले आणि डोळ्यातून अश्रु बरसले. यावर समर्थ म्हणाले मठात या वेण्णा स्वामी भेटतील त्याच तुम्हाला मार्गदर्शन करतील. इतके बोलून समर्थ दृष्टीआड झालेही. दुपारच्या वेळी कोणी नाही असे पाहून सई मठात गेली आणि वेण्णा स्वामींची चौकशी केली. एक प्रौढ स्त्री तिच्या समोर आली, ” मीच वेणाबाई काय हवंय आपल्याला” समर्थांनी वेण्णा बाईंना बोलवून मी यांना तुमच्याकडे पाठवलं आहे. यांचीही परिस्थिती आपल्यापेक्षा वेगळी दिसत नाही तेंव्हा यांना सुद्धा आपल्या महीला दलात सामील करून घ्या असे सांगितले. वेणुताई म्हणजे साक्षात माऊलीच, समर्थ स्वतः त्यांना माई म्हणत. माईंनी पाठीवर हात ठेवला आणि आईच्या आठवणीने मन भरून आलं. न बोलताच मन शांत झालं. आता इथेच राहा माई प्रेमाने म्हणल्या. त्या दिवसापासून वेणुताईंच्या मार्गदर्शनात दिनक्रम सुरू झाला. घरचे कोणी विचारायला येणार नव्हतेच मग काय, सकाळी मठातील दोन तीन स्त्री शिष्या मिळून सुर्य नमस्कार घालायला लागल्या, मग सगळ्याजणी मिळून स्वयंपाक करत, पुरुष शिष्य पाणी भरण्याचे काम करत ही कामं सगळे जण हसत खेळत आणि आनंदाने करत. दुपारच्या वेळी थोडा आराम, वाचन,मनन चाले. संध्याकाळी समर्थ स्वतः रामरक्षा स्तोत्र आणि प्रवचन करत या किर्तनात जीवनात जगण्याची कला, उद्देश आणि प्रेरणा असे. जीवन अनमोल आहे ते रडण्यासाठी नसून घडवण्यासाठी आहे हे सांगत. आपल्या पेक्षा दुःखी व्यक्तीला आनंद द्यावा हा उपदेश समर्थांनी सर्व महिला शिष्यांना दिला. स्त्री ही अनंत काळची माता आहे आणि माते ची आवश्यकता सगळ्यांना आहे सगळ्यांची माता बनून आनंदाने जीवन जगण्यासाठी आहे. हे जीवन सार प्राशन करून सई आता समर्थ होत होती. तिच्या सारख्या अनेक स्त्रिया पुढे जाऊन देशाटन करणार होत्या आणि समर्थांनी स्थापन केलेल्या मठात समर्थांच्या आज्ञेनुसार मठाधिपती म्हणून समर्थांची धुरा सांभाळणा‌र होत्या.

“जय जय रघुवीर समर्थ!”